महागाईचा आगडोंब! मेमध्ये घाऊक चलनवाढ ९.६८ टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर 
राष्ट्रीय

महागाईचा आगडोंब! मेमध्ये घाऊक चलनवाढ ९.६८ टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर

पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जेच्या संकटामुळे मे महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई ९.६८ टक्क्यांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात हा दर ८.२६ टक्के होता. इंधन आणि ऊर्जेच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे हा भडका उडाला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जेच्या संकटामुळे मे महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई ९.६८ टक्क्यांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात हा दर ८.२६ टक्के होता. इंधन आणि ऊर्जेच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे हा भडका उडाला आहे.

विशेष म्हणजे, २०२२-२३ हे नवीन आधारभूत वर्ष लागू केल्यावर चालू मालिकेतील हा महागाईचा सर्वोच्च स्तर आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी मे महिन्याची आकडेवारी जाहीर करताना, नऊ वर्षांनंतर पहिल्यांदाच आधारभूत वर्ष २०११-१२ वरून बदलून २०२२-२३ असे केले आहे.

सलग दुसऱ्या महिन्यात घाऊक महागाई ही किरकोळ किंवा ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईपेक्षा खूप जास्त राहिली आहे. मे महिन्यात किरकोळ महागाई ३.९३ टक्क्यांच्या १६ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.

मे २०२६ मधील घाऊक महागाईची आकडेवारी

वाणिज्य मंत्रालयाच्या मते, खनिज तेल (पेट्रोलियम उत्पादने), कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रसायने आणि मूलभूत धातूंचे उत्पादन हे एप्रिल आणि मे २०२६ मधील महागाईचे मुख्य कारण राहिले आहेत.

घाऊक महागाई निर्देशांकात या गटाचा वाटा १४.१ टक्के आहे. जागतिक स्तरावर वाढलेल्या ऊर्जेच्या किमतींमुळे या गटातील महागाई एप्रिलमधील २४.८९ टक्क्यांवरून मे महिन्यात ३०.३३ टक्क्यांवर गेली.मे महिन्यात कच्च्या तेलाचा महागाई दर ६१.५१ टक्के होता, जो एप्रिलमध्ये ५६.३१ टक्के होता.

अन्नपदार्थांमधील महागाई मे महिन्यात ३.६० टक्के (एप्रिलमध्ये २.४३ टक्के) झाली, तर उत्पादित वस्तूंची महागाई वाढून ७.४८ टक्के (एप्रिलमध्ये ६.६८ टक्के) झाली. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती घसरल्या आहेत. याचा फायदा आगामी काळात दिसेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

नवीन घाऊक निर्देशांकात बदल

निर्देशांकातील प्रमुख बदल एकूण वस्तूंची संख्या ६९७ वरून वाढवून ९५७ करण्यात आली हा आहे. 'विद्युत' गटामध्ये आता सौरऊर्जा, पवन ऊर्जा आणि अणुऊर्जा यांचा समावेश करण्यात आला आहे. कारखान्यांमधील उत्पादनाचा आणि कच्च्या मालाचा खर्च मोजण्यासाठी सरकारने पहिल्यांदाच 'उत्पादक किंमत निर्देशांक' जाहीर केला आहे. ७ प्रमुख सेवांसाठी 'सर्व्हिस पीपीआय' जारी करण्यात आला आहे.

पश्चिम आशियातील संघर्ष निवळल्यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. यामुळे जून २०२६ मधील घाऊक महागाईचा दर किंचित घसरून ९.३ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. मात्र, युद्धपूर्व काळातील २.५ टक्क्यांच्या खाली महागाई येण्यासाठी अजून काही वेळ लागेल. तसेच यंदाच्या मान्सूनवर 'एल निनो'चे सावट असल्याने अन्नधान्याचे दर तूर्तास चढेच राहू शकतात.
मेघा अरोरा (डायरेक्टर, इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च)

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे ५५ टक्के काम पूर्ण; ७६.४८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे जानेवारी २०२७ पर्यंत लोकार्पण होण्याची शक्यता

Mumbai : वांद्रेतील मेट्रो २बीच्या बांधकामस्थळी आग; जळते अवशेष रस्त्यावर पडल्याचा व्हिडीओ व्हायरल, MMRDA चे स्पष्टीकरण

Kalyan : मोठागाव रेल्वे उड्डाणपुलासाठी निविदा जारी; २४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

एकनाथ शिंदेंचे नाव वगळल्याने महायुतीत संघर्ष; शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमुळे वाद