राष्ट्रीय

अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना मज्जाव; देशभरातून संताप

दिल्लीतील अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना येऊ दिले नाही यावरून आता नवीन वाद सुरू झाला आहे. मात्र दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत भारताची कोणतीही भूमिका नव्हती आणि हा कार्यक्रम केवळ अफगाण दूतावासाने आयोजित केला होता, अशी सारवासारव केंद्र सरकारने केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीतील अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना येऊ दिले नाही यावरून आता नवीन वाद सुरू झाला आहे. मात्र दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत भारताची कोणतीही भूमिका नव्हती आणि हा कार्यक्रम केवळ अफगाण दूतावासाने आयोजित केला होता, अशी सारवासारव केंद्र सरकारने केली आहे.

शुक्रवारी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना उपस्थित राहण्यापासून रोखण्यात आल्याने वाद निर्माण झाला. महिला पत्रकारांना प्रवेशबंदीमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त झाला. दरम्यान, अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारचा कोणताही सहभाग नव्हता, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि मुत्ताकी यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर कोणतीही संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली नव्हती, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. फक्त अफगाणिस्तानने त्यांच्या दूतावासाच्या परिसरात स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेदरम्यान, मुत्ताकी यांनी भारत-अफगाणिस्तान संबंध, मानवतावादी मदत, व्यापार मार्ग आणि सुरक्षा सहकार्य यासारख्या प्रादेशिक मुद्द्यांवर भाष्य केले. पत्रकार परिषदेत फक्त निवडक पुरुष पत्रकार आणि अफगाण दूतावासाचे अधिकारी उपस्थित होते.

शुक्रवारी अफगाणिस्तान दूतावासात झालेल्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना वगळण्यात आल्याने देशभरात राजकीय संताप निर्माण झाला. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वढेरा यांनी शनिवारी नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आणि हा "भारतातील महिला पत्रकारांचा अपमान" असल्याचे म्हटले.

मोदी दुबळे असल्याचा राहुल यांचा हल्ला

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आता यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र शब्दात टीका केली. जेव्हा पंतप्रधान अशा भेदभावावर मौन बाळगतात, तेव्हा ते देशभरातील महिलांबद्दल कमकुवतपणा आणि असंवेदनशीलतेचा संदेश देतात, अशी टीका राहुल यांनी केली आहे. जेव्हा तुम्ही महिला पत्रकारांना सार्वजनिक कार्यक्रमातून वगळण्याची परवानगी देता, तेव्हा तुम्ही देशातील प्रत्येक महिलेला सांगत आहात की, तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहण्यास दुबळे आहात, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

महानगरामध्ये आणखी परवडणारी घरे; उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

विधिमंडळातील आश्वासने ९० दिवसांत होणार पूर्ण; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा विश्वास

नवाजुद्दीन सिद्दीकीला न्यायालयाचा झटका; भावाविरोधातील मानहानीचा खटला फेटाळला

जमीन मोजणीचा निपटारा आता 30 दिवसांत! प्रकरणे मार्गी लागणार; खासगी भूमापकाची मोजणी सरकारी अधिकारी करणार

संघासारखी संघटना नागपूर शहरातच राहू शकते; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन