नवी मुंबई : अपहरण, अवयव तस्करी, अवैध सावकारी गुन्हे नोंदवल्यानंतर अटकेची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला ३७ लाख २९ हजार ८४० रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अलोक शुक्ला हे ७५ वर्षीय व्यक्ती असून नेरूळ येथे राहतात. १३ मार्चला राजवीर सिंग नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतः सीआयडी अधिकारी असल्याचे सांगत शुक्ला यांच्याविरोधात अपहरण, अवयव तस्करी, अवैध सावकारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंदविण्यात आल्याचे सांगितले. फोनवरील अशा माहितीने शुक्ला हादरले, त्यात त्यांच्या व्हॉट्सॲपवर गुन्हे अन्वेषण सेल सीआयडी नवी दिल्ली या कार्यालयाच्या लेटर हेडवर समन्स पाठवण्यात आले. हे समन्स आल्यानंतर सिंगने पुन्हा अलोक शुक्ला यांना फोन करून याप्रकरणी अटक टाळण्यासाठी पैशांची मागणी केली. याबाबत सिंगने विविध खात्यात ३७ लाख २९ हजार ८४० रुपयांची रक्कम जमा करून घेतली. हा सर्व प्रकार १३ मार्च ते १९ मार्च दरम्यान घडला.
एवढे पैसे देऊनही पैशांची मागणी कमी होत नसल्याने आपली फसवणूक होत असल्याची खात्री अलोक शुक्ला यांना झाली. या प्रकाराला कंटाळून शुक्ला यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. या अर्जाची दखल घेत सायबर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.