उरण : तालुक्यातील निसर्गरम्य पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने पर्यटक समुद्राच्या पाण्यात अडकण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शनिवारी संध्याकाळी मुंबईहून पर्यटनासाठी आलेले एक जोडपे किनाऱ्यापासून समुद्राच्या पाण्यात सुमारे १५० मीटर आत अडकले होते.
हे जोडपे दुपारी ५ च्या सुमारास पिरवाडी बीचवर आले तेव्हा ओहोटी असल्याने किनारा पूर्ण सुका होता. त्यामुळे ते समुद्रात बरेच पुढे गेले, मात्र संध्याकाळी अचानक भरती सुरू झाल्याने संपूर्ण परिसर पाण्याने वेढला गेला. दोघेही मध्यभागी अडकल्याने त्यांनी मदतीसाठी हाका मारण्यास सुरुवात केली. सुदैवाने स्थानिक सागरी सुरक्षारक्षक आणि उरण पोलिसांच्या तत्परतेमुळे या जोडप्याला २० ते २५ मिनिटांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
समुद्रात अडकलेल्या या जोडप्याला पाहून स्थानिक सागरी सुरक्षारक्षक आणि पोलीस मित्रांनी तातडीने उरण पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर उरण पोलिसांचे बीट मार्शल आणि सागरी रक्षक लाइफ जॅकेट घेऊन तत्काळ मदतीसाठी धावले. पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून गेल्या वर्षभरात पाण्यात अडकलेल्या १० ते १२ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
या ठिकाणी पर्यटकांना धोक्याची पूर्वकल्पना देण्यासाठी कोणतेही धोक्याचे फलक लावण्यात आलेले नाहीत, तसेच प्रशासनाकडून अधिकृत सुरक्षारक्षक किंवा जीवरक्षक तैनात करण्यात आलेले नाहीत. स्थानिक नागरिक आणि पोलीस मित्र स्वतःचा जीव धोक्यात घालून, कोणतीही आधुनिक साधने नसताना हे बचावकार्य करत असल्याने प्रशासनाने येथे कायमस्वरूपी जीवरक्षक आणि सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी केली जात आहे.