नवी मुंबई : नवी मुंबई महानगर-पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बुधवारी अचानक शहरातील आरोग्य सेवेचा आढावा घेण्याच्या हेतूने मनपाच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील कामकाजाचा बारकाईने आढावा घेतला व सुधारणेच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. यात सर्वात महत्वाचे म्हणून रुग्णालयात रुग्ण येणे-जाणे त्याचे उपचार आदी सर्व नोंदी डिजिटल करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, त्यामुळे आता एका क्लिकवर रुग्णाची पूर्ण माहिती याच सोबत औषधे स्टोक आदी सर्व माहिती मिळू शकेल.
नवी मुंबई मनपा क्षेत्रात वाशी, नेरुळ व ऐरोली या तीन ठिकाणी मनपाचे सुसज्ज रुग्णालयात असून प्रत्येक नोंड मध्ये नागरी आरोग्य सुविधा केंद्र आहेत. या सर्व रुग्णालयांपैकी वाशी रुग्णालयामध्ये नागरिक सर्वाधिक संख्येने म्हणजे रोज सुमारे दोन ते अडीच हजार ओपीडी असते. यात केवळ नवी मुंबई नव्हे, तर मानखुर्द, चेंबूर पनवेल उरण परिसरातील नागरिक उपचारासाठी येत असतात. त्यादृष्टीने तेथे नागरिकांसाठी पुरेशी बैठक व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध असावे तसेच तेथील प्रदर्शनी भागात आरोग्यविषयक माहिती देणारे पोस्टर्स, डिजीटल फलक अशी आरोग्य सूचनांची प्रचारसाधने वाढवावीत असे निर्देश त्यांनी दिले.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, शहर अभियंता संजय देसाई, उपआयुक्त योगेश कडुसकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रविंद्र म्हात्रे, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय गडदे, वाशी विभाग अधिकारी सागर मोरे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नवजात बाळांसाठी दूध बँक
नवजात अतिदक्षता विभागाची पाहणी करताना तेथील बाळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दूध बँक सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे थॅलेसेमिया डे केअर कक्षाची पाहणी करताना आयुक्तांनी सिकल सेल ॲनेमियाचे सेंटर अदययावत करण्याच्या सूचना केल्या.
नेरुळ, ऐरोली रुग्णालयांचे सक्षमीकरण
वाशी येथील रुग्णालय हे महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील सर्वात जुने व सर्वात जास्त सेवा देणारे असल्याने या रुग्णालयावरील रूग्णांचा ताण विभागला जावा यादृष्टीने नेरुळ व ऐरोली रुग्णालयांचे अधिक सक्षमीकरण करण्याची जलद कार्यवाही करण्याबाबतही आरोग्य विभागास सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे वाशी रुग्णालयात येणारे विविध प्रकारचे रुग्ण लक्षात घेता त्या ठिकाणी २४ तास पोलीस कक्ष असावा यादृष्टीनेही कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी सूचित केले.