Navi Mumbai : मोरबे धरणात ८५ दिवसांएवढा पाणीसाठा; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आयुक्तांचे आवाहन 
नवी मुंबई

Navi Mumbai : मोरबे धरणात ८५ दिवसांएवढा पाणीसाठा; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आयुक्तांचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरबे डॅम प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा केला जात असून, धरणात सध्या आणखी ८५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरबे डॅम प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा केला जात असून, धरणात सध्या आणखी ८५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. हवामान विभागाने यंदा अल निनोमुळे भारतातील मोसमी पावसावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार यंदा सरासरी पर्जन्यमान ९२ ते ९४ टक्के राहण्याचा अंदाज असून पावसालाही उशीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मोरबे धरण प्रकल्पस्थळी भेट देऊन जलसाठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी धरण परिसराच्या दोन्ही बाजूंनी पाहणी करत जमिनीची मोजणी व सीमांकन निश्चित करून आवश्यक ठिकाणी तातडीने कुंपण घालण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करताना सांगितले की, यंदा पर्जन्यमान नेहमीपेक्षा ६ ते ८ टक्के कमी राहण्याची शक्यता आहे.

या पाहणीदरम्यान आयुक्तांनी धरण क्षेत्राच्या एका बाजूने आंबेवाडीपर्यंत ७.५ किलोमीटर आणि दुसऱ्या बाजूने पिरकटवाडी, उंबरणेवाडीपर्यंत ११ किलोमीटर क्षेत्राची पाहणी केली. धरण क्षेत्रालगत काही खासगी बांधकामे आढळल्याने हद्द तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मोजणी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या दौऱ्यात आयुक्तांसोबत अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, मालमत्ता विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संजय शिंदे तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मोरबे धरण परिसरातील वृक्षारोपणासाठी योग्य भागांमध्ये देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाची कार्यवाही करावी. तसेच सभोवतालच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी. धरणाच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या तसेच त्यावेळी पुनर्वसनास नकार दिलेल्या पिरकटवाडी आणि तीन वाड्यांतील कुटुंबांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक तपासणी करावी.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

उद्याची TET रद्द; पेपरफुटीच्या संशयावरून राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय, भिवंडीत तिघांना अटक

फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले

५२ वर्षांनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? मुंबईत समुद्रकिनारी सहा मजली नव्या घराची तयारी

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

अचानक झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने दुचाकीस्वार कोमात, घटना सीसीटीव्हीत कैद