नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह 
नवी मुंबई

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

आरोग्यदायी वातावरणात सकाळची सुरुवात करता यावी, यासाठी वाशी येथील प्रसिद्ध मिनी सी शोर परिसरात पहाटेपासून नागरिकांची मोठी गर्दी होत असते. ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत अनेक जण येथे चालणे, धावणे, योगासने, व्यायाम आणि सायकलिंग करण्यासाठी येतात.

Swapnil S

नवी मुंबई : आरोग्यदायी वातावरणात सकाळची सुरुवात करता यावी, यासाठी वाशी येथील प्रसिद्ध मिनी सी शोर परिसरात पहाटेपासून नागरिकांची मोठी गर्दी होत असते. ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत अनेक जण येथे चालणे, धावणे, योगासने, व्यायाम आणि सायकलिंग करण्यासाठी येतात. मात्र, शुक्रवारी पहाटे या परिसरात धुक्यासारखे दिसणारे वातावरण नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरले. काही वेळाने हे धुके नसून हवेत पसरलेले प्रदूषण असल्याचे जाणवताच नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.

नवी मुंबईतील मोकळ्या आणि सार्वजनिक जागांपैकी मिनी सी शोरला विशेष महत्त्व आहे. पहाटे पाच ते साडेपाच वाजल्यापासून येथे ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण, धावपटू, सायकलस्वार आणि नियमित व्यायाम करणाऱ्यांची गर्दी सुरू होते. मात्र, आरोग्य चांगले राहावे म्हणून घराबाहेर पडलेल्या नागरिकांनाच प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागत असेल, तर हा व्यायाम कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिनी सी शोरवर नियमित मॉर्निंग वॉकसाठी येणारे नितीन कांबळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मी येथे नियमित मॉर्निंग वॉकसाठी येतो. शुक्रवारी धुक्यासारखे दिसणारे वातावरण प्रत्यक्षात प्रदूषणाचे असल्याचे जाणवले. त्यामुळे चिंता वाटली.

आरोग्य चांगले राहावे म्हणून घराबाहेर पडायचे आणि प्रदूषित हवा श्वासातून घ्यायची, अशी परिस्थिती असेल तर व्यायामासाठी जायचे तरी कुठे ? महापालिकेने तातडीने दखल घेऊन या परिसरातील हवेची गुणवत्ता तपासावी आणि प्रदूषणाचे नेमके कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.

नवी मुंबई निरोगी नागरिकांचे शहर कधी होणार?

मिनी सी शोरसारख्या जागा केवळ सुशोभीकरणासाठी नसून नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. 'स्मार्ट सिटी'सोबत नवी मुंबई 'स्वच्छ हवा आणि निरोगी नागरिकांचे शहर' कधी होणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या परिसरात कायमस्वरूपी हवा गुणवत्ता मापक यंत्रणा (AQI मॉनिटर) बसविण्याची गरज आहे. तसेच प्रमुख प्रदूषकांचे प्रमाण नागरिकांना प्रत्यक्ष पाहता यावे, यासाठी डिजिटल डिस्प्ले बसवावा. हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर गेल्यास नागरिकांना व्यायाम टाळण्याबाबत सूचना देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नवी मुंबईत सुरू असलेली मोठ्या प्रमाणावरील बांधकामे, रस्त्यांवरील धूळ, वाढती वाहनसंख्या, वाहतूककोंडी तसेच विविध विकासकामांमधून निर्माण होणारे धूलिकण यांचा हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिनी सी शोर परिसरातील हवेच्या स्थितीचे प्रशासनाने गांभीर्याने परीक्षण करणे आवश्यक आहे.
बी. एन. कुमार, संचालक, नॅटकनेक्ट फाऊंडेशन

Mumbai : गणेशोत्सवासाठी BMC सज्ज; महापौर, उपमहापौरांकडून विसर्जनस्थळांची पाहणी

Ulhasnagar : बाप्पा येणार... पण खड्ड्यांतूनच? महापौरांचा संकल्प गेला खड्ड्यात! अजूनही विघ्न कायम; नागरिकांचा संतप्त सवाल

बदलापुरात सुरू होणार शेतकरी आठवडे बाजार; पूर्व-पश्चिम भागात चार ठिकाणी बाजारपेठ

Thane : गणरायाच्या सुरक्षेसाठी मंडळे सज्ज! मोठ्या मूर्तीना पट्ट्यांचा आधार; खड्डेयुक्त रस्त्यांची खरी अडचण

Mumbai : महामुंबई मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू