नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या हवाई प्रवासी मागणीच्या पार्श्वभूमीवर सिडको कडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे तिसऱ्या धावपट्टीच्या विकासासाठी तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यास हाती घेण्यात आला आहे. या अभ्यासासाठी राईटस् लिमिटेड आणि क्रिएटीव्ह ग्रुप एलएलपी (संयुक्त उपक्रम) यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, हा अभ्यास पुढील सहा महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
१५ एप्रिल रोजी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई महानगर प्रदेशासाठी दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यासह दुहेरी विमानतळ प्रणालीचा भाग म्हणून कार्यरत आहे.
सुमारे ११६० हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या विमानतळात एकाच वेळी स्वतंत्रपणे कार्यरत राहू शकतील अशा दोन समांतर धावपट्ट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुढील दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने विकसित होणारी चार टर्मिनल्सही प्रस्तावित आहेत. पूर्ण क्षमतेनंतर दरवर्षी सुमारे ९० दशलक्ष प्रवासी (MPPA) आणि ३.२ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता विकसित केली जात आहे.
मुंबई महानगर प्रदेशाची लोकसंख्या २ कोटींहून अधिक असून, २०४० पर्यंत हवाई प्रवासी मागणी १५० एमपीपीएपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (६० एमपीपीए) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (९० एमपीपीए) यांच्या संयुक्त क्षमतेतून ही मागणी पूर्ण केली जाणार असली तरी २०४७-५० दरम्यान ती २४० एमपीपीए पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या बैठकीस सिडकोच्या सीजीएम (टी अँड ए) गीता पिल्लई, अतिरिक्त मुख्य परिवहन अभियंता बिंदू मुरलीधरन, अनिल असवानी तसेच क्रिएटीव्ह ग्रुप एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक गुरप्रीत सिंग शाह उपस्थित होते.
प्रस्तावित अभ्यासामध्ये तिसऱ्या धावपट्टीची तांत्रिक, कार्यकारी, पर्यावरणीय आणि आर्थिक व्यवहार्यता सर्वंकषपणे तपासली जाणार आहे. यामुळे प्रदेशातील विमानवाहतूक पायाभूत सुविधा अधिक सक्षम होऊन दीर्घकालीन क्षमतेत वाढ होण्यास मदत होईल, असे सिडकोकडून सांगण्यात आले.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील गरजांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. वाढत्या हवाई वाहतुकीचा विचार करता भविष्योन्मुख नियोजन आवश्यक असून, तिसरी धावपट्टी या दृष्टीने महत्त्वाची ठरेल.विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सिडको