Navi Mumbai : रॅपिडोच्या नावाखाली दुचाकी चोरणारा जेरबंद; ५ मोटारसायकलींसह २ मोबाईल जप्त करत ७ गुन्हे उघडकीस 
नवी मुंबई

Navi Mumbai : रॅपिडोच्या नावाखाली दुचाकी चोरणारा जेरबंद; ५ मोटारसायकलींसह २ मोबाईल जप्त करत ७ गुन्हे उघडकीस

नवी मुंबईतील वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले असून, नेरूळ पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबईतील वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले असून, नेरूळ पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. आकाश रामदास नवले असे २५ वर्षीय आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून १ लाख ९६ हजार रुपये किमतीच्या ५ मोटारसायकल आणि २ मोबाईल फोन असा एकूण ७ गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तो व्यवसायाने डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा, मात्र या कामाच्या आड त्याने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपी हा मूळचा जुन्नर येथील रहिवासी असून सध्या नेरूळ आणि सीवूड्स परिसरात वास्तव्य करत होता.

शहरात चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे कडक आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आकाश ठाकरे, तुषार बच्छाव आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून नवले याला अटक केली. या कारवाईमुळे नेरूळ पोलीस ठाण्यातील ५, सानपाडा येथील १ आणि सीबीडी बेलापूरमधील १ असे एकूण ७ गुन्हे उघड झाले आहेत. आरोपी चोरलेल्या दुचाकीचा वापर रॅपिडो बाईक टॅक्सी म्हणून करत असे. विशेष म्हणजे, जोपर्यंत दुचाकीत पेट्रोल असायचे तोपर्यंतच तो ती वापरायचा आणि पेट्रोल संपल्यावर गाडी तिथेच सोडून पसार व्हायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

Truecaller शिवाय कळणार कोण करतंय फोन? रिंग वाजताच स्क्रीनवर दिसणार नाव; १ नोव्हेंबरपासून नवा नियम

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

मराठवाड्यात भूजलपातळीत घट; संभाजीनगरात १६९ टँकर सुरू

लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'