

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा पती असल्याचा दावा करत फोटोग्राफी शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर करण्यात आला. या बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ५५ वर्षीय शिक्षक राजेश वासुदेव तावडे यांना २६ ऑगस्ट रोजी या व्हिडीओची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. २३ ऑगस्टला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओद्वारे आपली बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
व्हॉट्सॲपवरून मिळाली व्हिडीओची माहिती
राजेश तावडे लालबाग येथे राहतात. ते फोटोग्राफीचे क्लास आणि स्टुडिओ चालवतात. तसेच फोटोग्राफीशी संबंधित फोटो आणि जाहिराती ते यूट्यूब आणि फेसबुकवर पोस्ट करतात.
तावडे यांच्या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांना व्हॉट्सॲपवर यूट्यूब शॉर्ट्सची लिंक पाठवली. लिंक उघडल्यानंतर त्यांना gk-shorts-videos या चॅनेलवर त्यांच्याबाबतचा एक व्हिडीओ आढळला.
महापौरांसोबत फोटो अन्...
पोलिसांच्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये राजेश तावडे यांचा फोटो आणि महापौर रितू तावडे यांचा फोटो एकत्र दाखवण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये राजेश तावडे हे महापौरांचे पती असल्याचा दावा करण्यात आला.
तावडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, त्यांचा फोटो फेसबुक अकाउंटवरून घेतला असावा, तर महापौरांचा फोटो सोशल मीडियावरून घेतल्याचा संशय व्यक्त केला आहे.
व्हिडीओत वैयक्तिक माहितीही
तक्रारीनुसार, व्हिडीओमध्ये तावडे यांच्या नावासोबत त्यांचे शिक्षण, व्यवसाय, धर्म, छंद आणि कुटुंबाची माहितीही देण्यात आली होती. कोणतीही पडताळणी न करता हा व्हिडीओ तयार करून प्रसारित करण्यात आल्याने आपली आणि महापौरांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.
यूट्यूब चॅनेलचा शोध सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, gk-shorts-videos हे यूट्यूब चॅनेल १५ एप्रिल रोजी तयार करण्यात आले असून, त्याचे सुमारे १,५३० सब्सक्राइबर्स (Subscribers) आणि २४३ व्हिडीओ आहेत. या चॅनेलवर राजकीय नेते आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनाविषयी माहिती देणारे व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत.
या चॅनेलमागील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. चॅनेल चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी इंटरनेट प्रोटोकॉल (IP) संबंधित माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून, तावडे यांनी व्हिडीओचे स्क्रीनशॉटही पोलिसांकडे सादर केले आहेत.
अज्ञात व्यक्तीविरोधात FIR
या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संबंधित व्हिडीओ कोणी तयार केला, तो कोणत्या उद्देशाने प्रसारित करण्यात आला आणि त्यामागे नेमकी व्यक्ती कोण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.