नवी मुंबई : मातृत्वालाच काळीमा फासणारी धक्कादायक घटना कळंबोली परिसरात उघडकीस आली आहे. एका महिलेने आपल्याच सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे. सुप्रिया प्रमोद म्हामुणकर (३०) असे आरोपी महिलेचे नाव असून, कळंबोली पोलिसांनी तिला मुलीच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे.
आरोपी सुप्रिया म्हामुणकर ही कळंबोली सेक्टर-१ ई येथील गुरू संकल्प सोसायटीत पती प्रमोद आणि सहा वर्षीय मुलगी मानसी हिच्यासह राहत होती. मानसी इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुप्रियाला मुलगा हवा होता. त्यामुळे मानसीचा जन्म झाल्यापासून ती तिच्याकडे दुर्लक्ष करत होती आणि तिला नकोशी मानत होती. मुलगी नीट बोलत नाही, कायम हिंदीत बोलते, अशा तक्रारी ती वारंवार पतीसमोर करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही सुप्रियाने मानसीला मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
२३ डिसेंबर रोजी सायंकाळी प्रमोद म्हामुणकर हे स्वामी समर्थांच्या बैठकीसाठी घराबाहेर गेले होते. दरम्यान, मानसी नेहमीप्रमाणे खासगी ट्युशनला गेली होती. याचवेळी सुप्रियाने मानसीला ट्युशनमधून लवकर घरी बोलावून घेतले. घरी आल्यानंतर सुप्रियाने मानसीचे नाक व तोंड दाबून तिची हत्या केली. त्यानंतर ती मृत मानसीच्या शेजारीच झोपून राहिली.
रात्री प्रमोद घरी परतल्यानंतर त्यांनी मानसीला आवाज दिला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला असता मानसी निपचित पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी मानसीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान, प्रमोद म्हामुणकर यांनी पत्नी सुप्रियावर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. चौकशीत सुप्रियाने मानसीचे नाक व तोंड दाबून तसेच पोटावर गुडघ्याने दाब देत हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार गुरुवारी मध्यरात्री सुप्रियाला अटक करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांनी दिली.