नवी मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खारघरमध्ये मतदारांच्या गोपनीय डेटाबाबत अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या ‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेंतर्गत गोळा करण्यात आलेले मतदारांचे मूळ गोपनीय गणना पत्रक एका खासगी झेरॉक्स दुकानात अनधिकृतपणे झेरॉक्स करताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले.
या घटनेनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद आणि झटापट झाली. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची तत्काळ गंभीर दखल घेतली. पनवेलचे नायब तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून भाजप पदाधिकारी सुरज पाटील याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर सेक्टर-१९ मधील झेरॉक्स दुकानात निवडणूक आयोगाचे हजारो गोपनीय ‘एसआयआर’ फॉर्म मोठ्या प्रमाणावर झेरॉक्स केले जात असल्याची माहिती शिवसेना(उबाठा) पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, महानगरप्रमुख ॲड. समाधान काशिद, बालेश भोजने यांच्यासह शिवसैनिकांनी सेक्टर १९ मधील झेरॉक्स दुकानात धाव घेतली. त्यावेळी भाजपचा स्थानिक पदाधिकारी सुरज पाटील हा मतदारांच्या मूळ गोपनीय गणना पत्रकाचे हजारो फॉर्मच्या झेरॉक्स प्रती काढताना आढळून आला.
ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक
दरम्यान, याप्ररणी दोन्ही गटांत जोरदार बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरज पाटील यालाताब्यात घेतले. तसेच हजारो मतदारांचे मूळ गोपनीय गणना पत्रक फॉर्म जप्तकरून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर काही वेळातच भाजप पदाधिकारी सुरजपाटील हा संशयास्पदरीत्या पोलिस ठाण्यातून फरार झाल्याचा आरोप ठाकरेगटाचे पदाधिकारी बालेश भोजने यांनी केला. त्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवरप्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील फॉर्म
या घटनेचे गांभीर्य ओळखून पनवेलचे उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांच्याआदेशानुसार, नायब तहसीलदार सुनील जाधव यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने खारघर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलिसांनी झेरॉक्स दुकानातून जप्त केलेल्या फॉर्मची तपासणी केली असता ते १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघातील विविध यादी भागांतील अधिकृत मूळ अर्ज असल्याचे निष्पन्नझाले. या फॉर्मवर मतदारांचे मूळ रंगीत फोटो, भरलेले तपशील आणि संबंधितमतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आढळून आल्या. याशिवायभारत निवडणूक आयोगाचा लोगो व नाव असलेल्या आणि ‘स्पेशल इन्टेन्सीव्ह रिव्हीजन ऑफ इलेक्टोरल रोल्स’ लिहिलेल्या कापडी पिशव्या आढळून आल्याने महसूल विभागाच्या पथकाने सर्व फॉर्म आणि साहित्य जप्त केले.
निवडणूक गोपनीयतेचा भंग प्रकरणी गुन्हा
त्यानंतर नायब तहसीलदार सुनील जाधव यांनी खारघर मुर्बी गाव येथील भाजपाचायुवा पदाधिकारी सुरज पाटील याच्या विरोधात खारघर पोलिस ठाण्यात शासकीयगोपनीय दस्तऐवजांची अनधिकृत हाताळणी करणे, त्यांची छायांकित प्रत काढणेआणि मतदारांच्या डेटाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ – कलम ३१४ लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५०/१९५१/१९८९ कलम १२८ (निवडणूक गोपनीयतेचा भंग) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मतदारांच्या खाजगी माहितीचा गैरवापराचा संशय
निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अत्यंत संवेदनशील आणि अधिकृत बीएलओकडेअसणारे मतदारांचे मूळ गोपनीय मूळ फॉर्म थेट एका राजकीय पदाधिकाऱ्याच्याहातात कसे पोहोचले, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मतदारांच्या खाजगी माहितीचा गैरवापर करण्याचा प्रयत्न होता का, तसेच यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास खारघर पोलीस करत आहेत.