विसर्जित पीओपी मूर्तींपासून ७६० स्टडी टेबल तयार; नवी मुंबई महापालिकेचा अनोखा पर्यावरणपूरक प्रयोग 
नवी मुंबई

विसर्जित पीओपी मूर्तींपासून ७६० स्टडी टेबल तयार; नवी मुंबई महापालिकेचा अनोखा पर्यावरणपूरक प्रयोग

नवी मुंबई महापालिकेने यंदा एक अनोखा आणि कौतुकास्पद प्रयोग यशस्वी केला आहे. गणेशोत्सवात कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित झालेल्या ‘पीओपी’च्या मूर्तींवर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्यापासून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ‘स्टडी टेबल’ तयार करण्यात आले आहेत.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने यंदा एक अनोखा आणि कौतुकास्पद प्रयोग यशस्वी केला आहे. गणेशोत्सवात कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित झालेल्या ‘पीओपी’च्या मूर्तींवर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्यापासून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ‘स्टडी टेबल’ तयार करण्यात आले आहेत.

श्रीगणेशोत्सवात १४६ कृत्रिम तलावांमधून गोळा झालेल्या सुमारे ८ हजार पीओपी मूर्ती सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्या पाठपुराव्यामुळे या मूर्तींच्या पुनर्प्रक्रियेचा प्रकल्प हाती घेण्यात आला.

टाकाऊतून टिकाऊ निर्मिती अंतर्गत हेन्केन इंडिया आणि बिच प्लिझ इंडिया यांच्या सीएसआर निधीतून, तसेच रोटरी क्लब नवी मुंबईच्या सहकार्याने ७०० विसर्जित मूर्तींवर प्रक्रिया करण्यात आली. यातून मिळालेल्या १५०० किलो पीओपीपासून ७६० आकर्षक स्टडी टेबल तयार झाले. सदर सर्व स्टडी टेबल रबाले (आंबेडकर नगर) येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज महापालिका माध्यमिक शाळा क्र. १०४ मधील गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले आहेत.

आगामी काळात मूर्तींच्या ‘पीओपी'पासून पुन्हा वापरण्यायोग्य पीओपी तयार करण्याचा महापालिकेचा विचार आहे. या संदर्भात ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ (आयसीटी, मुंबई) या नामांकित संस्थेच्या शास्त्रज्ञांशी आणि मूर्तीकार संघटनेशी चर्चा सुरू असून, लवकरच पुढील प्रकल्प राबवला जाईल.

'माझी वसुंधरा' अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या नवी मुंबई शहराने या उपक्रमाच्या माध्यमातून प्रदूषणावर मात करत निसर्ग जपण्याचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.

पीओपीचा असाही वापर

सध्या गणेशोत्सव जवळ आला आहे. पीओपीच्या मूर्तींमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. मात्र, पीओपीच्या मूर्तींचा पुनर्वापर केल्यास उपयुक्त वस्तू बनवल्या जाऊ शकतात, हेच यातून दिसून आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मीरा-भाईंंदरकरांनो, पाणी जपून वापरा; १ जुलैपासून २४ ते ४८ तास पाणी पुरवठा बंद

लेखी आदेशाशिवाय नवीन काम स्वीकारू नका! मोटरलोडर कामगारांना कामगार सेनेचे आवाहन

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७१७ कोटी रुपये मंजूर; मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची माहिती

राज्यात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीस बंदी; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती

कर्जमाफीचा लाभ ५ जुलैनंतरच; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती