नवी मुंबई : तळोजा मध्यवर्ती कारागृहातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ज्यांच्यावर कायद्याचे राज्य आणि सुरक्षेची जबाबदारी आहे, त्याच 'खाकी' वर्दीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीला आला आहे. कारागृहातील बंदिस्त कैद्यांना अमली पदार्थ पुरवण्यासाठी स्वतःच्या पॅन्टच्या खिशात लपवून चरस आणि प्रतिबंधित गोळ्या घेऊन जाणाऱ्या एका २४ वर्षीय तरुण कारागृह शिपायाला रंगेहात पकडण्यात आले आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी शिपायाला बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कारागृह शिपायाचे नाव आदित्य शेलार (२४) असे असून तो ४ महिन्यापूर्वीच तळोजा मध्यवर्ती कारागृहात कारागृह शिपाई म्हणून कामाला लागला होता. २२ जूनला दुपारी ३:१५ वाजण्याच्या सुमारास आरोपी आदित्य शेलार हा दिवसपाळीच्या कर्तव्यासाठी कारागृहात प्रवेश करत होता. यावेळी मुख्य प्रवेशद्वारावर कारागृहाचे हवालदार देवेंद्र सोळंकी यांनी आरोपी शिपायाची अंगझडती घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्या खाकी रंगाच्या पँटच्या डाव्या बाजूच्या खिशात ४५,९२० रुपये किमतीचा ४९.९२ ग्रॅम वजनाचा चरस हा अमली पदार्थ सापडला तसेच १,८०० रुपये किमतीचे नायट्रोझेपाम या प्रतिबंधित अमली गोळ्यांचे ३६ नग असा एकूण ४७,७२० रुपये किमतीचे अमली पदार्थ सापडले.
कारागृह प्रशासनाने हे अमली पदार्थ जप्त करून कारागृह शिपायाला खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले. खारघर पोलिसांनी आरोपी कारागृह शिपाई आदित्य शेलार याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ च्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
रॅकेटमध्ये मोठे मासे सामील असल्याचा संशय
हा शिपाई कारागृहातील न्यायबंदी (कैदी) यांना छुप्या पद्धतीने अमली पदार्थांचे सेवन आणि पुरवठा करण्यासाठी स्वतःच्या ताब्यात बेकायदेशीररित्या हे अमली पदार्थ बाळगून आत नेत होता. कारागृहाच्या तटबंदीच्या आतच अमली पदार्थांचे रॅकेट चालवण्याचा हा अत्यंत गंभीर प्रयत्न सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे उधळून लावला गेला आहे. हे अमली पदार्थ त्याला कोणी देत होते की, तो स्वत: कोणाकडून घेऊन येत होता, याबाबतचा तपास केला जात आहे. या रॅकेटमध्ये कारागृहातील इतर कोणी मोठे मासे सामील आहेत का, याचा कसून तपास खारघर पोलीस करत आहेत. कारागृह प्रशासनातील या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस आणि कारागृह वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.