नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरातील हिंदुस्तान प्लॅटिनम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून ११ लाख रुपयांचा पॅडेनियम धातू चोरी केल्याप्रकरणी अनिल भालेराव या उत्पादन पर्यवेक्षकाला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. चोरीचा सर्व ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भालेराव (३७) मार्च २०२५ पासून कंपनीत पर्यवेक्षक पदावर कार्यरत होता. कंपनीत डागदागिने, आभूषण, संगणक, मोबाईल यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरण्यात येणारा पॅडेनियम धातू वापरला जातो. ठरावीक कालावधीनंतर कंपनीकडून करण्यात येणाऱ्या मालाच्या तपासणीत धातूच्या प्रमाणात तफावत आढळून आली.
याबाबतची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली. प्रारंभी भालेराव हा पर्यवेक्षक असल्यामुळे त्याच्यावर कुणीही संशय घेतला नव्हता, मात्र सखोल तपास आणि त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या नजरातून भालेराववर संशय बळावला.
हिंदुस्तान प्लॅटिनम कंपनीत काम करणारे रवी प्रकाश यादव यांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भालेरावला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत फक्त पॅडेनियमच नव्हे, तर रोडियम आणि रुथीनियम हे देखील मौल्यवान धातू चोरून इतरत्र विकल्याचे त्याने उघड केले. पोलीस तपासानंतर सर्व चोरीचा माल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.