नवी मुंबई : ‘तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांकडे जायचंय’ असे म्हणणाऱ्या अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याच्या या निष्पाप हट्टाचा संताप अनावर होऊन सावत्र पित्याने त्याची निर्घृणपणे हत्या केली. हत्या केल्यानंतर मुलगा खेळताना पलंगावरून पडून जखमी झाल्याचा बनाव रचून गुपचूप अंत्यसंस्कार उरकण्याचा सावत्र पित्याचा डाव होता; मात्र पोलिसांच्या सतर्कतेने आणि शवविच्छेदन अहवालाने या हत्येचा पर्दाफाश झाला. त्यानंतर पित्याला बेड्या ठोकल्या.
आई काव्यासह तिचा साडेतीन वर्षांचा मुलगा मोक्ष राहत होता. काव्याने जितेंद्र भिसे (२८) याच्याशी दुसरा विवाह केला होता. उरण-मोरा येथील फणसवाडी येथे हे कुटुंब राहत होते. १४ ऑगस्टला दुपारी घरात मोक्ष आणि जितेंद्र दोघेच होते. यावेळी मोक्षने जितेंद्र याला ‘तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांजवळ जायचे आहे’, असा हट्ट धरला. त्यावर चिडलेल्या जितेंद्रने मोक्षचे डोके थेट भिंतीवर आपटले आणि लाकडी काठीने मारहाण केली तसेच छातीवर ठोसा मारला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
दिशाभूल करण्याचा प्रयत्न
आरोपीने मुलाच्या हत्येनंतर अपघाताचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वैद्यकीय अहवाल आणि तांत्रिक तपासामुळे सत्य समोर आले. त्यानुसार आरोपी जितेंद्र भिसे याला हत्या आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कटवाणी यांनी दिली. न्यायालयाने आरोपीला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शवविच्छेदनाने उघड केली क्रूरता
या संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच मोरा सागरी पोलिसांचे पथक फणसवाडी येथे दाखल झाले. पोलिसांना पालकांच्या भूमिकेवर संशय आल्याने त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून सुरुवातीला अकस्मात मृत्यू दाखल केला. प्राप्त झालेल्या ॲडव्हान्स डेथ सर्टिफिकेटमध्ये मोक्षच्या डोक्याला गंभीर दुखापत, बरगड्या फ्रॅक्चर आणि मारहाणीत मृत्यू, असे डॉक्टरांनी निष्कर्ष नोंदवले.
अपघाताचा बनाव आणि अंत्यसंस्काराची घाई
मोक्षचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी जितेंद्रने दुपारी मुलगा घरात खेळताना अचानक पलंगावरून खाली पडला व बेशुद्ध झाला, असा बनाव रचला. त्यानंतर मोक्षला तातडीने उरणमधील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारी ४ वाजता मोक्षला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर जितेंद्रने शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्काराची घाई सुरू केली.