उरण : सातबारा पत्रकावर वारसाची नोंद करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना कोप्रोलीचे मंडळ अधिकारी, सजा चिरनेर तलाठी आणि कार्यालयातील कोतवाल यांच्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. यात मंडळ अधिकारी आणि कोतवाल रंगेहाथ जाळ्यात सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे चिरनेर येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीच्या सातबारा उतारावर वारस नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. ही नोंद करून देण्यासाठी कोप्रोलीचे मंडळ अधिकारी के. डी. मोहिते, सजा चिरनेरचे तलाठी जयहिंद कोळी यांनी संगनमताने शेतकऱ्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतकऱ्याने तात्काळ नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच एसीबीचे उप अधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. मागणी सिद्ध झाल्यानंतर आज, मंगळवारी (दि. ६) सजा चिरनेर तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात अत्यंत गुप्तपणे सापळा रचला. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने झडप घालून संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, कारवाईच्या वेळी सजा चिरनेरचे तलाठी जयहिंद कोळी हे प्रकृती ठीक नसल्याचे सांगून तेथून निसटल्याचे समजते. ताब्यात घेतलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी उरण पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारी
कोप्रोली मंडळ अधिकारी यांच्याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. साध्या वारस नोंदीसाठी लाखो रूपये ते घेत असत. पूर्व भागात होत असलेल्या अनधिकृत भरावांबाबत देखील त्यांनी लाखो रूपये उकळून त्यांना अभय दिल्याचे बोलले जात आहे.