नवी मुंबई : स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून नेरूळ सेक्टर-२ भागात राहणाऱ्या एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्ञानेश्वर बाबाजी आव्हाड (२६) असे या तरुणाचे नाव असून गुरुवारी सकाळी घरामध्ये कोणी नसताना त्याने आत्महत्या केली.
या घटनेतील मृत ज्ञानेश्वर आव्हाड हा नेरूळ सेक्टर-२ मधील जैन अपार्टमेंटमध्ये आई-वडील आणि लहान भावासह राहात होता. ज्ञानेश्वरचे आई-वडील आपल्या मूळ गावी गेले होते. त्यामुळे सध्या घरामध्ये ज्ञानेश्वर व त्याचा भाऊ आनंद हे दोघेच होते. गुरुवारी सकाळी पावणे पाचच्या सुमारास ज्ञानेश्वर झोपला असताना, आनंद हा ॲकेडमीसाठी बाहेर गेला होता. या दरम्यान घरामध्ये एकटाच असलेल्या ज्ञानेश्वरने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास आनंद घरी परतल्यानंतर त्याला ज्ञानेश्वर गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
ज्ञानेश्वर हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, मात्र त्यात त्याला यश येत नव्हते, त्यामुळे आलेल्या नैराश्येतून त्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता त्याच्या कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार नेरूळ पोलिसांनी या प्रकणात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. ज्ञानेश्वरने नुकताच त्याने मंत्रालय क्लर्कची गट-क ची परीक्षा दिली होती. त्याची फक्त स्किल टेस्ट शिल्लक होती.