विशेष
डॉ. जितेंद्र सिंह
आज मागे वळून पाहताना, कोणीही खात्रीने म्हणू शकतो की, तंत्रज्ञानावर आधारित ११ वर्षांमधील परिवर्तन भविष्यातील प्रगतीची चाहूल देत आहे. आता या प्रवासाला एक दशकाहून अधिक काळ लोटला असून, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग त्या दृष्टिकोनाची साक्ष देत आहे.
प्राचीन भारतातील महाभारत या महाकाव्यात महर्षी व्यास म्हणतात की, ज्ञान हे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. अकरा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी त्यांनी भारताला केवळ ग्राहकच नव्हे, तर जागतिक विज्ञानाचा उत्पादक बनवण्याचा आधुनिक संकल्प सोडला. त्यामुळे या शाश्वत सत्याचे पुनरुज्जीवन झाले. आज मागे वळून पाहताना, कोणीही खात्रीने म्हणू शकतो की, तंत्रज्ञानावर आधारित ११ वर्षांमधील परिवर्तन भारताच्या भविष्यातील प्रगतीची चाहूल देत आहे आणि आता या परिवर्तनकारी प्रवासाला एक दशकाहून अधिक काळ लोटला असून, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) त्या दृष्टिकोनाची साक्ष देत आहे, जिथे प्रयोगशाळा लाँचपॅड बनल्या आहेत आणि नवोन्मेष हा राष्ट्रीय विकासाचा नवा परवलीचा शब्द बनला आहे.
जेव्हा मी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा मंत्री म्हणून पदभार स्वीकारला, तेव्हा मला वारशासारखा केवळ एक विभाग मिळाला नाही, तर एक आश्वासन देखील मिळाले- विज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविणे, नवोन्मेषाचे विकेंद्रीकरण करणे आणि त्याचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही मी दिले होते.
२०१४ साली भारताची वैज्ञानिक परिसंस्था ऊर्जामय होती, पण विखुरलेली होती; महत्त्वाकांक्षी होती, पण तिथे साधनसंपत्तीची कमतरता होती. संशोधन बहुतेकदा उच्चभ्रू संस्थांपुरते मर्यादित होते आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात वैज्ञानिक प्रगतीचा आत्मा क्वचितच गवसत असे. असा संदर्भ होता. त्यानंतर राष्ट्रउभारणीत विज्ञानाची भूमिका नव्याने मांडण्याचा जाणीवपूर्वक, संतुलित आणि धाडसी प्रयत्न झाला.
परिवर्तनाची सुरुवात सोपी, मात्र आमूलाग्र बदल : स्वतःच्या प्रतिभेवरील विश्वासामुळे बदल घडला. २०२३ मधील अनुसंधान नॅशनल रिसर्च फाऊंडेशनची (एएनआरएफ) स्थापना ही एक महत्त्वाची घटना होती. भारताने प्रथमच धोरणात्मक दृष्टिकोनासह संशोधन आणि विकास परिसंस्था चालवण्यासाठी एक वैधानिक संस्था स्थापन केली. ‘प्रधानमंत्री अर्ली करिअर रिसर्च ग्रँट’च्या माध्यमातून ६,९००हून अधिक युवा शास्त्रज्ञांना सक्षम बनवण्यासाठी आणि समावेशक संशोधन अनुदानांतर्गत १,७५४ अनुसूचित जाती/जमाती समुदायाच्या संशोधकांना सहाय्य करून, वैज्ञानिक उत्कृष्टता ही काही मोजक्या लोकांची मक्तेदारी नसून, अनेक जणांच्या प्रतिभेचा शोध घेणे आहे, याची आम्ही खात्री दिली आहे. पण आम्ही लोकांना अनुदान देऊन थांबलो नाही, तर आम्ही संस्था निर्माण केल्या. आयआयटी आणि आयआयएससी येथे चार थीमॅटिक केंद्रे असलेले राष्ट्रीय क्वांटम मिशन, क्वांटम कॉम्प्युटिंग, कम्युनिकेशन आणि सेन्सिंगमध्ये भारताला आघाडीवर ठेवत आहे. राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशनने देशभरात आधीच २८ उच्च-कार्यक्षमता असलेल्या कार्यप्रणाली तैनात केल्या आहेत, ज्यामुळे पुराच्या भाकितापासून ते औषधांच्या शोधापर्यंत प्रत्येक क्षेत्रात यश मिळाले आहे. ही केवळ यंत्रे नाहीत, तर नव्या भारताची साधने आहेत.
तथापि, वैज्ञानिक प्रगतीचा खरा मापदंड केवळ पेटाफ्लॉप अथवा पेटंटमध्ये नसून, त्याद्वारे प्रभावित झालेल्या जीवनात आहे. आयआयटी मुंबई येथे विकसित केलेल्या स्मार्ट कृषी केंद्राचेच पाहा ना, जे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मृदा आणि हवामानाच्या स्थितीची तत्काळ माहिती घेण्यासाठी सक्षम बनवते, आयआयटी भिलाईचे दिव्यांग एटीएम, जे अंध व्यक्तींना सन्मानाने बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी सक्षम बनवते किंवा ४६ वुमन टेक्नॉलॉजी पार्क्स, ज्यांनी ११,००० हून अधिक महिलांना वैज्ञानिक व्यवसायांचे प्रशिक्षण दिले असून, गृहिणींना उद्योजक बनवले आहे. हे सर्व सक्षम समाजाचा पाया आहेत.
आपल्या काळातील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक असलेला हवामान बदल- भारतीय विज्ञान हा याचा एक दृढ सहयोगी आहे. हवामान बदलावरील राष्ट्रीय मोहिमांच्या माध्यमातून, आपण २९ राज्यांमध्ये हवामान बदल केंद्रे स्थापन केली आहेत आणि २,००० हून अधिक संशोधनपत्रे आणि १,००० अहवालांमध्ये योगदान दिले आहे. हिमालयातील हिमनद्यांचे मॅपिंग करण्यापासून ते १.८ लाखांहून अधिक लाभधारकांना प्रशिक्षण देण्यापर्यंत, आपण केवळ हवामान बदलाचा अभ्यास करत नाही, तर भारताला परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी, प्रतिसाद देण्यासाठी आणि नेतृत्व करण्यासाठी सज्ज देखील करत आहोत.
मनुष्यबळामधील आपली गुंतवणूकही तेवढीच परिवर्तनकारी ठरली आहे. इन्स्पायर कार्यक्रमाने विद्यापीठांमधील ७५,००० हून अधिक विद्यार्थी आणि ६,८०० डॉक्टरेट करणाऱ्या संशोधकांना पाठबळ दिले आहे, तर मानक योजनेने २.५ लाखांहून अधिक शालेय स्तरावरील नवोन्मेषाला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. आपण विज्ञानाच्या मदतीने भूगोलाचीही नव्याने व्याख्या बनवली आहे. एकेकाळी दुर्लक्षित समजला जाणारा ईशान्य भाग आता केशराची लागवड आणि ड्रोन-आधारित भू-स्थानिक मॅपिंगचे केंद्र बनला आहे. नेक्टर आणि भारतीय सर्वेक्षण विभागाच्या प्रयत्नांमुळे, दोन लाखांहून अधिक गावांचे १० सेमी रिझोल्यूशनसह मॅपिंग करण्यात आले आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जमिनीवरील कायदेशीर अधिकाराची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या आकड्यांमागे एक मोठी कथा आहे. श्रद्धा, प्रतिभा आणि चिकाटीची कहाणी आहे. आपल्या शास्त्रज्ञांवरचा विश्वास आहे, तरुणांमधील प्रतिभा आहे आणि आपल्या धोरणांमधील दृढता आहे. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेला एक लाख कोटी रुपयांचा संशोधन, विकास आणि नवोन्मेष (आरडीआय) निधी ही केवळ आर्थिक वचनबद्धता नसून, उद्दिष्टांची घोषणा आहे. आम्ही खासगी क्षेत्राला भारताच्या वैज्ञानिक भवितव्याचे सहलेखन करण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. भविष्याकडे पाहताना, पुढचा मार्ग आव्हानात्मक आणि रोमांचक असल्याचे दिसून येत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि स्पेस सायन्ससारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी केवळ गुंतवणुकीची नव्हे, तर कल्पनाशक्तीची देखील आवश्यकता असेल. शेवटी, विज्ञान म्हणजे केवळ समस्यांवर उपाय शोधणे नसून, शक्यतांचा विस्तार करणे आहे. समाजाचा सर्वात अंध:कारमय कोपरा उजळून टाकणे आणि करुणा व धैर्याने प्रेरित ज्ञान कोणत्याही राष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवू शकते हे सिद्ध करणे, हे यामागील उद्दिष्ट आहे.
आता, जेव्हा आपण मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कारकीर्दीची यशोगाथा सांगत आहोत, तेव्हा मला पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी काय म्हणतात ते आठवते: हे केवळ एक सरकार नाही, तर एक चळवळ आहे- भारताला स्वावलंबी, जगभरात आदरणीय आणि मानवतावादी बनवण्याची चळवळ आणि त्या चळवळीत विज्ञान हा केवळ प्रेक्षक नाही, तर तो अग्रदूत आहे. चला, स्वप्ने पाहूया, नवे शोध लावूया आणि स्वप्ने साकारूया. कारण लोकशाहीच्या प्रयोगशाळेत विज्ञानाचा प्रत्येक प्रयोग हा आशेचा प्रयोग असतो.
विज्ञान व तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री