संपादकीय

कार्यकर्त्यांचा आधार, विकासाची दिशा

महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने ‘कार्यकर्ता हाच आधार आणि विकास हीच दिशा’ हा विचार प्रत्यक्ष कृतीतून मांडला. सामान्य, निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देत विकासकेंद्रित राजकारणाचा नवा आदर्श ठेवला आहे.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

केशव उपाध्ये

महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने ‘कार्यकर्ता हाच आधार आणि विकास हीच दिशा’ हा विचार प्रत्यक्ष कृतीतून मांडला. सामान्य, निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देत विकासकेंद्रित राजकारणाचा नवा आदर्श ठेवला आहे.

यावेळची महानगरपालिकांची निवडणूक अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली  आहे. ५ वर्षांची नियत मुदत संपून ४ वर्षे झाल्यानंतर या निवडणुका होत असल्याने महानगरांमधील सर्व पक्षांच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आढळून आला. हा लेख लिहीत असताना या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला होता. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांबद्दल प्रसार माध्यमांमधून बरीच उलटसुलट चर्चा झाली. या गदारोळात भाजप नेतृत्वाने अनेक सामान्य स्थितीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली याकडे प्रसार माध्यमांनी लक्ष दिले नाही. अशा कार्यकर्त्यांना मी भेटून आलो. त्यांची स्थिती प्रत्यक्ष पाहिली. भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व तळागाळातील कार्यकर्त्यांना शोधून शोधून संधी देतो हे यातून सिद्ध झाले. पक्षनेतृत्वाला प्रत्येक इच्छुकाला उमेदवारी देता येत नाही, हे इच्छुकांनाही माहीत असते. कार्यकर्त्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले असते. त्याशिवाय वर्षभर सामान्य माणसाच्या अनेक छोट्या-मोठ्या तक्रारी सोडविण्याचे कामही कार्यकर्ते करत असतात. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. बूथ पातळीवर काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा असतात. पक्षनेतृत्वाच्या मर्यादा जाणून घेऊन अनेकांनी पक्षाचा निर्णय आनंदाने स्वीकारला. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्या ही गोष्ट मान्य करावी लागेल. ज्या कार्यकर्त्यांना राजकारणाचा कोणताही वारसा नाही, ज्यांच्याकडे उत्पन्नाची साधने अत्यंत मर्यादित आहेत, पण पक्षनिष्ठा हे ज्यांचे एकमेव भांडवल आहे अशा कार्यकर्त्यांना पक्षनेतृत्वाने मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे. वसई-विरार महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक १७ मध्ये शरद सुर्वे हे गेली अनेक वर्षे पक्षकार्य करीत आहेत. यावेळी त्यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केल्यानंतर प्रारंभी स्थानिक नेतृत्वाने उमेदवारी देणे अवघड असल्याचे त्यांना कळविले होते. अंतिम उमेदवार निवडताना मात्र सुर्वे यांना संधी देण्यात आली. पुणे महापालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मुलाला पक्षाने संधी दिली आहे, अमर आवळे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. नाशिकमध्ये खासगी कंपनीत काम करणाऱ्या मकरंद वाघ यांनाही पक्षाने संधी दिली. तीच गोष्ट ठाणे येथील उषा वाघ यांची आहे. पावसाळ्यात घर गळू नये म्हणून घरावर प्लास्टिकची ताडपत्री टाकलेली, अशा घरात राहणाऱ्या उषा विशाल वाघ या निष्ठावंत या एकाच निकषावर पक्षाच्या उमेदवार बनल्या आहेत. राजकारण आणि निवडणुका म्हणजे श्रीमंताचे काम, फार्महाऊस, बंगले असणाऱ्यांनीच निवडणुका लढवायच्या असे चित्र निर्माण केले जात असताना उषा वाघ, अमर आवळे यांसारख्या सामान्य आर्थिक स्थितीतील कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाने आवर्जून उमेदवारी दिली आहे. १९८० आणि १९९० च्या दशकात भारतीय जनता पक्षाचे काम करणे ही सामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रचंड अवघड गोष्ट होती. त्या प्रतिकूल स्थितीतही पक्षाची विचारधारा जपण्यासाठी कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या खपल्या आहेत. या कार्यकर्त्यांचे पक्षनेतृत्वाला कधीच विस्मरण होणार नाही.

या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक संपूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर लढवली. राजकीय टीका-टिप्पणी करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने सत्तेत असताना काय केले आणि या पुढील काळात आम्ही काय करू इच्छितो, हे प्रचार सभांमधून सांगण्यावर भाजप नेतृत्वाने भर दिला. महानगरांचे वाढते स्वरूप लक्षात घेऊन भविष्यकाळातील महानगरांच्या गरजा ओळखून कोणकोणत्या सुविधांना प्राधान्य देणे गरजेचे आहे आणि वेगवेगळे नागरी प्रश्‍न, समस्या केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने कशा सोडविता येतील, या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचार सभांमधून भाष्य केले. भारतीय जनता पक्षाने प्रत्येक महापालिकेसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित केला. प्रत्येक महापालिकेचे प्रश्‍न, नागरी समस्या यांचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यानुसार प्रत्येक महापालिकेसाठी स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात आला. २०१४ पासून भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेत आहे. राज्यात २०१४ पासून अडीच वर्षांचा काळ सोडला तर भाजप सत्तेत आहे. या काळात निवडणुका होत असलेल्या महापालिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य सरकारने काय केले, याचा हिशोब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभांच्या माध्यमातून जनतेपुढे ठेवला. लातूरमधील भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन एप्रिल २०१६ मध्ये फडणवीस सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने मिरज येथून रेल्वेने पाणी पाठवले. सुमारे दोन-अडीच महिने या पद्धतीने लातूरला पाणीपुरवठा करण्यात आला. त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना लातूरला रेल्वेने पाणी पाठवण्याच्या पर्यायावर चर्चा झाली होती, मात्र काहीच घडले नव्हते. देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेने पाणी पुरवण्याचा पर्याय प्रत्यक्षात आणला आणि लातूरकरांची तहान भागवली. लातूरचा पाणीप्रश्‍न कायमचा सोडवण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळच्या निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. सोलापूरला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ८९२ कोटींची पाणी योजना, सोलापूरसाठी १०० दिवसांत १०० ई-बसेस, ठाण्याची मेट्रो २ वर्षांत पूर्ण करणे, बोरिवली ते ठाणे बोगदा तयार करणे, पश्‍चिम द्रुतगती महामार्गाला समांतर असा कोस्टल रोड भाईंदरपर्यंत आणि पुढे विरारपर्यंत नेणे, सांगलीसाठी आयटी पार्क अशा वेगवेगळ्या प्रस्तावित योजनांची माहिती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून प्रचार सभांमधून देण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्याकडे विकासासंदर्भात बोलण्यासारखे काहीच नसल्याने त्यांचा प्रचार नेहमीप्रमाणे टोमणे आणि शिव्याशाप यापुरताच मर्यादित राहिला. राज्य सरकारच्या कामाचे प्रगती पुस्तक मतदारांपुढे ठेवण्याची चांगली संधी नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या माध्यमातून मिळाली होती. या संधीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फायदा घेत विकास केंद्रित प्रचार केला. आगामी निवडणुकीतही मतदार या सकारात्मक प्रचार मोहिमेला मतपेटीच्या माध्यमातून भरभरून कौल देतील, अशी खात्री आहे.

भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते

मुंबई महापालिकेत 'नवा भिडू, नवे राज्य'

आजचे राशिभविष्य, ३१ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

हिवाळ्यात अंजीर खा आणि निरोगी राहा; वाचा महत्त्वाचे फायदे

Mumbai : १ फेब्रुवारीपासून मुंबईत नवीन वाहतूक नियम; कोंडी कमी करण्यासाठी निर्णय, कोणत्या वाहनांना परवानगी? कोणाला नो एंट्री?

"दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय..."; अजित पवारांच्या आठवणीत रोहित पवारांची भावूक पोस्ट