देश-विदेश
भावेश ब्राह्मणकर
हा देश आहे जगातील सर्वाधिक तरुणांचा. नागरिकांचे सरासरी वयोमान १९ वर्षे, तर राष्ट्राध्यक्षांचे वय तब्बल ९२ वर्षे. गेल्या ४३ वर्षांपासून ते देशाचे नेतृत्व करीत आहेत. जगभरात ‘जेन झी’चे प्रस्थ वाढत असताना देशाची सूत्रे वयोवृद्धाकडे जाणे विसंगत आहे.
तरुणांचे नेतृत्व सर्वात वयोवृद्धाने करण्याची उदाहरणे तशी दुर्मिळच. खासकरून देशाची धुरा सांभाळायची तर त्यासाठी प्रमुखही तसा बहुआयामी असायला हवा. आफ्रिकेतल्या कॅमरून देशात मात्र वेगळेच घडते आहे. तेथील सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पौल बिया हे आठव्यांदा राष्ट्रपती बनले आहेत. त्यांना ५३.६६ टक्के मते मिळाली. त्यांचे विरोधक इसा तेचिरोमा बाकेरी यांना ३५.१९ टक्के. बिया हे १९८२ पासून कॅमेरूनचे नेतृत्व करीत आहेत. कॅमेरून हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश आहे. कारण, तेथील सरासरी वय १९ वर्षे एवढे आहे. असे असतानाही गेल्या ४३ वर्षांपासून बिया यांचा करिष्मा कसा काय कायम आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जगातील सर्वाधिक वृद्ध राष्ट्रपती हा बहुमान सुद्धा बिया यांना प्राप्त झाला आहे. आताही त्यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण केला तर ते वयाच्या ९९ व्या वर्षापर्यंत प्रमुख असतील. तो सुद्धा एक जागतिक विक्रमच ठरेल.
कॅमरूनची निवडणूक पारदर्शकपणे झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, निर्णायक निकाल पूर्णपणे अधिकृत झाला असून, त्यावर अपील करता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. विरोधकांनी संघर्षाची तयारी केलेली दिसते. तेथे मोर्चे, निदर्शने सुरू झाली आहेत. काही ठिकाणी हिंसक आंदोलनही झाले आहे. त्यामुळे सध्या तेथील राजकीय वातावरण गंभीर बनले आहे. मात्र, सर्वाधिक चर्चा बिया यांच्या नेतृत्वाची आणि देशांतर्गत स्थितीची सुद्धा होत आहे. देशात २६० स्थानिक मूळ भाषा आहेत. मात्र प्रामुख्याने तिथे इंग्रजी आणि फ्रेंच बोलली जाते. त्यामुळे तेथे भाषेवरून मोठा वाद आहे. इंग्रजी भाषिक ‘अँग्लोफोन’ प्रदेश हा वायव्य आणि नैऋत्य भागात आहे, तर फ्रेंच भाषिक प्रदेश हा ‘फ्रँकोफोन’ म्हणून ओळखला जातो. तो उत्तर भागात आहे. फ्रँकोफोन प्रदेशाला कमी प्रतिनिधित्व दिले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच या प्रदेशांमध्ये विभाजनवादी आंदोलन सुरू आहे. सुरक्षा बल आणि आंदोलक यांच्यात अनेकदा संघर्ष झाला आहे. त्यात काही नागरिक ठार झाले आहेत. उत्तर भागातील ‘फर नॉर्थ’ प्रदेशात इस्लामी-जिहादी गटांची सक्रियता असल्याचेही बोलले जाते. म्हणजेच भाषिक संघर्षाचीही किनार येथील वादाला आहे.
निवडणुकीत भ्रष्टाचार, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य हे मुद्देही कळीचे होते. बिया यांचे दीर्घकाळ सत्ताकेंद्रित नेतृत्व अनेकांना खटकते आहे. बिया यांच्या ‘कॅमरून पिपल्स डेमोक्रेटिक मुव्हमेंट’ (सीपीडीएम) या पक्षाने सत्ता जवळपास पूर्णपणे नियंत्रित केली आहे. सीपीडीएम आणि सत्ताधारी यांनी निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोग यांच्या कार्यावर आक्षेप घेतला आहे. काही संस्थांच्या मते, कॅमरूनमध्ये लोकशाही असली तरी राजकीय हक्क व नागरी स्वातंत्र्य मर्यादित आहेत. माध्यम स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता या सर्व बाबतीत सुधारणा अपेक्षित आहेत. यंदाच्या निवडणूक निकालानंतर काही ठिकाणी हिंसाचार उसळला आहे. देशात तरुणांची संख्या मोठी असताना त्यांच्या आशा-अपेक्षा मात्र जाणून घेतल्या जात नाहीत. त्यांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत, अशी भावना तयार होत आहे. बिया हे अद्यापही निवृत्ती स्वीकारण्याच्या मानसिकतेत नाहीत. तसेच, त्यांच्या पश्चात कोण धुरा सांभाळेल, असा प्रश्न विचारला जात आहे. देशात निवडणुकीची पारदर्शकता वाढवणे, माध्यम व अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाढवणे व न्यायव्यवस्थेची स्वायत्तता मजबूत करणे हे सुधारणेचे भाग आहेत. त्यादृष्टीने फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक व विकासासाठी राजकीय स्थिरता गरजेची आहे. त्यामुळे सरकारला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सामाजिक व राजकीय विश्वासार्हता वाढवणे आवश्यक आहे. तसे झाले तरच उद्योग-व्यवसायात वाढ होईल. याद्वारे तरुणांच्या हाताला काम मिळेल.
कॅमरूनचे भूराजकीय महत्त्व केवळ आफ्रिका खंडापुरते नाही. हा देश पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या संयोगबिंदूवर आहे. नायजेरिया, चाड, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, इक्वेटोरियल गिनी, गॅबॉन आणि काँगो या देशांच्या सीमा लागून आहेत, तर गिनीच्या आखाताचा सागरीकिनाराही या देशाला लाभला आहे. या भौगोलिक स्थानामुळे कॅमरून पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या व्यापार व राजकीय संपर्कात सेतूचे कार्य करतो. कॅमरूनकडे तेल, नैसर्गिक वायू, ॲल्युमिनियम, लाकूड आणि कृषी उत्पादने यांचा मोठा साठा आहे. कॅमरून हे ऊर्जेच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. चीन, रशिया, फ्रान्स आणि अमेरिका यांनी ऊर्जा व गुंतवणुकीसाठी कॅमरूनला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कॅमरून भूराजकीय स्पर्धेचे केंद्र बनले आहे. राजधानी याऊंडे आणि आर्थिक केंद्र डुआला ही मध्य आफ्रिकेतील सर्वात महत्त्वाची व्यापारी बंदरे आहेत. कॅमरूनचे वाहतूक नेटवर्क आफ्रिकेतील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करते.
कॅमरूनला नायजेरिया सीमेलगतच्या ‘बोको हराम’ या दहशतवादी गटांचा धोका आहे. त्यामुळे कॅमरून पश्चिम आफ्रिकेतील दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये महत्त्वाचा भागीदार आहे. तसेच, अँग्लोफोन-फ्रँकोफोन संघर्ष आणि अंबाझोनिया विभाजनवादी चळवळ ही आफ्रिकन युनियन व संयुक्त राष्ट्र संघासाठी चिंताजनक आहे. कॅमरूनने फ्रान्स, चीन आणि रशिया यांच्यात संतुलनाची नीती अवलंबली आहे. फ्रान्सबरोबर ऐतिहासिक संबंध असूनही, चीनने मागील दशकात आधारभूत प्रकल्पांमध्ये कॅमरूनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे कॅमरून हा चीन-फ्रान्स-अमेरिका यांच्या प्रभाव स्पर्धेत सापडला आहे. भौगोलिक स्थान, बंदर आणि ऊर्जा साठ्यांमुळे कॅमरून भविष्यात आफ्रिकेतील भूराजकीय नकाशावरील ‘कळीचा दुवा’ राहण्याची चिन्हे आहेत.
भारत आणि कॅमरून हे दोन्ही देश अलिप्ततावादी (नाम) चळवळीपासून परस्परांशी जोडले गेले आहेत. भारत-आफ्रिका भागीदारी या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातही कॅमरून सहभागी आहे. कॅमरूनच्या मुख्य व्यापार भागीदारांपैकी भारत हा एक महत्त्वाचा भागीदार आहे. कॅमरूनकडून भारत कच्चे तेल, लाकूड, कोको आणि ॲल्युमिनियम आयात करतो, तर भारतातून कॅमरूनमध्ये औषधनिर्मिती उत्पादने, यंत्रसामग्री, लोखंडी माल, वाहने, माहिती तंत्रज्ञान सेवा, जेनेरिक औषध पुरवठा, हॉस्पिटल उपकरणे, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रांत निर्यात केली जाते. २०२४च्या आकडेवारीनुसार, दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापार सुमारे १.२ अब्ज डॉलर इतका होता. भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य या उपक्रमांतर्गत कॅमरूनच्या विद्यार्थ्यांना व सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
पॅन आफ्रिका ई-नेटवर्क प्रोजेक्टच्या माध्यमातून भारताने कॅमरूनमध्ये टेली-मेडिसिन आणि टेली-एज्युकेशन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भारतीय विद्यापीठांमध्ये तंत्रज्ञान, औषधशास्त्र व व्यवस्थापन या विषयांत अनेक कॅमरून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भारताच्या ओएनजीसी विशेष आणि इरकॉन इंटरनॅशनल या कंपन्यांनी कॅमरूनमध्ये तेल शोध, रेल्वे प्रकल्प आणि बंदर विकास यामध्ये रस दाखवला आहे. कॅमरून सरकार भारतासोबत सौरऊर्जा, वीज वितरण व जलपुरवठा सुधारणा प्रकल्प राबवण्याच्या तयारीत आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये कॅमरून हा सदस्य आहे. भारत व कॅमरून यांनी संयुक्त राष्ट्रसंघ, आफ्रिकन युनियन आणि जी-७७ मध्ये एकमेकांना पाठिंबा दिला आहे. दहशतवाद, सायबर सुरक्षा आणि समुद्री सुरक्षा या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. कॅमरूनची भौगोलिक स्थिती ही भारतासाठी लॉजिस्टिक, संसाधन मिळवणे आणि पश्चिम आफ्रिकन बाजारपेठेत प्रवेश यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे भारताचे राजनैतिक धोरण हे कॅमरूनसारख्या देशांत स्थिर आर्थिक सहकार्य निर्माण करणे हे आहे.
राष्ट्रपती पौल बिया यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. खासकरून ‘जेन झी’सारखी तरुणाई आणि त्यांचे प्रश्न. वयातील अंतर, आशा-आकांक्षा, विचार, स्वप्न अशा सर्वच पातळ्यांवर बिया यांना काम करावे लागेल. देशातील अशांतता दूर करून त्यांनी पारदर्शक कारभार करून दाखविला आणि गेल्या चार दशकांमधील सत्ताधाऱ्यांचा अहंपणा कमी केला तर जनतेत आश्वासकता निर्माण होईल. या सर्वाकडे केवळ कॅमरून नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध अभ्यासक.