विशेष
रामानंद सुळे
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) एक उच्चशिक्षित, पुढारलेली ज्ञाती म्हणून आपली ओळख आहे. पण जर आपलेच घर आपल्याला सावरता येणार नसेल तर आपल्या व्यवस्थापन कौशल्याच्या कथा व्यर्थ आहेत.
सीकेपी म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु. या समाजाची/ज्ञातीची माहिती साधारणपणे १० व्या शतकापासून आहे. आज सीकेपी लोकांची संख्या तीन ते साडेतीन लाखांच्या आसपास असू शकते म्हणजे अल्पसंख्यांक. सीकेपी समाज हा व्यवस्थापन क्षेत्रात माहीर गणला जातो. अत्यंत प्रामाणिक व हिशेबात चोख अशी ख्याती असलेला हा समाज.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या समाजाच्या व्यवस्थापन कौशल्याची महती गायली जाते. पुढे पेशवाईत आणि नंतर ब्रिटिश कालातही या ज्ञातीतील लोक मोठ्या हुद्द्यांवर होती. पानिपतच्या युद्धात सीकेपी समाजाला सोबत न घेतल्याने पेशव्यांचा पराभव झाला, असे दाखले काही इतिहास संशोधक देतात. युद्धशास्त्र व युद्धकाळातील रणनीतीत हाच समाज प्रगत राहिला. तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत होता. याबाबतच्या दाखल्यांकरिता अनेक नावे देता येतील. पण विस्तार भयास्तव देत नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही सनदी आणि सैन्यदलात सीकेपी मंडळी होती.
हा सर्व इतिहास असताना गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटना बघता आपली व्यवस्थापन क्षेत्रातील सीकेपी समाजाची महती खालावली की लयास गेली, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. सीकेपी बँक अवसायानात गेली. सीकेपी कंझ्युमर स्टोअर्स बंद पडले. तसेच अनेक छोट्या-मोठ्या पतसंस्था बुडाल्या. अगदी अलीकडची गोष्ट म्हणजे दादर सीकेपी हॉलचा लिलाव होण्याची वेळ आली. सीकेपी समाज वैयक्तिक पातळीवर सधन आहे. कोकणस्थांइतकीच आपली मुले-मुली अमेरिका, युरोपात स्थिरावली आहेत. तेथे अनेकांनी आपले उद्योग, व्यवसाय उभे करून नावलौकीक प्राप्त केला आहे. वैयक्तिक पातळीवर जर सीकेपी समाज इतका व्यवस्थापन कुशल असेल तर सीकेपी समाजातील चार डोकी एकत्र येऊन जेव्हा एखादी संस्था, हॉल चालवतात तेव्हाच अशी घसरण व लिलावाची नामुष्की का येते? याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, वैयक्तिक पातळीवर उद्योग, व्यवसाय किंवा नोकरीत आपण जेवढी काळजी, प्रामाणिकपणा व डोळसपणे निर्णय घेतो तेवढे ते सार्वजनिक संस्थांचे व्यवस्थापन करताना घेत नाही.
शतकोत्तर अस्तित्वात असलेल्या हॉलचा लिलाव ही माझ्यासारख्या सर्व सीकेपी ज्ञाती बांधवांना धक्का देणारी व शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब आहे. हे का घडत आहे हा मोठा प्रश्न आहे. आपण व्यवस्थापन क्षेत्रात पुढारलेले असल्याच्या इतिहासातील कथांमध्ये किती काळ आनंद मानून स्वतःची पाठ स्वतः थोपटून घ्यायची. वेगवेगळ्या संस्थांची सीकेपी समाजातील मंडळींच्या अधिपत्याखाली धूळधाण झालेली दिसत असताना समाजाचे व्यवस्थापन क्षेत्रातील कौशल्य ही एक भ्रामक समजूत आहे की काय?
व्यवस्थापन कौशल्य हे व्यक्तिगत असते ती कुठल्या जातीची, समाजाची मक्तेदारी असू शकत नाही. आधीच्या काळात आपल्या बाबतीत हे म्हटले गेले, कारण आपला समाज हा फार लवकर शिक्षित झाला. अनेक शतकांपासून आपण स्त्रियांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. वेळच्या वेळेस हिशेबाची नोंद करणे, आपले काम वेळेवर पूर्ण करणे, त्यात कोणतीही गफलत-गैरव्यवहार न करणे ही त्या वेळेस असलेल्या व्यवस्थापनाची अंग होती. ही मूलभूत सवय आहे आणि ती शिक्षणामुळे अधिक चांगल्या प्रमाणात अंगीकारली जाते. मग आताच सीकेपी समाजाच्या संस्था बुडू का लागल्या? हितसंबंध, गैरव्यवहार आणि आर्थिक बेशिस्त यांच्या चर्चा का कानी येतात.
आज जग बदलत आहे. आज व्यवस्थापन क्षेत्रात कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा मोठा भाग आहे. आज आपण जेव्हा व्यवस्थापन क्षेत्रातील आपले स्थान कुठले याचा विचार करतो तेव्हा कल्चरल कॅपिटल विरुद्ध कॉर्पोरेट गव्हर्नन्स याचा विचार केला पाहिजे. आज कुठल्याही क्षेत्रात व्यवस्थित नियोजन जोखीम घेण्याची, ती पेलण्याची ताकद, केलेले नियोजन जर चुकीचे ठरत असेल तर त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची व्यावहारिक क्षमता आणि हुशारी याची गरज आहे.
व्यवहारात पारदर्शकता असणे, योग्य माणसांची निवड करणे, प्रसंगी त्यांच्याकडून काम नीट होत नसेल तर त्या जागी दुसरा सक्षम माणूस नेमणे ही आजच्या व्यवस्थापन कौशल्याची गरज आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी जरी घेतली असली तरी प्रत्यक्षात काम करताना अनेकदा परिस्थिती वेगळी असते आणि पटकन निर्णय घेण्याची गरज असते. आपली माणसे नेमण्याची आपली मानसिकता असते, पण व्यवहारात आपला गोतावळा जमवून चालत नाही. संस्था चालवणे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालवणे यासाठी वेगळीच मानसिकता लागते. आपलाच हेका चालवणे योग्य नसते. आपल्या समाजात अहंकार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. रास्त अभिमान, सार्थ अभिमान आणि अहंकार यात अत्यंत सूक्ष्म रेषा असते आणि भावनेच्या भरात ती कधी ओलांडली जाते ते कळत नाही आणि विसंवादाला सुरुवात होते. समोरच्यापेक्षा मी कसा योग्य आहे हे सांगायला सुरुवात होते.
'मेरे कमीज से उसकी कमीज ज्यादा सफेद क्यूं' आपल्या सीकेपी लोकांना 'चिंबोरीची' उपमा दिली जाते. कोणी पुढे जात असेल तर त्याला मागे खेचणे. आजही आपल्यात काही मंडळी निश्चितच आहेत की ते दादर सीकेपी हॉलवर ओढवलेल्या परिस्थितीचे निराकरण करू शकतात. राजकारणापासून उद्योग क्षेत्रात सीकेपी समाजाची अनेक मातब्बर मंडळी असताना काही कोटी रुपयांकरिता लिलाव पुकारला जातो हे दुर्दैवी आहे. आज बँकेचे आणि मुंबई महापालिकेचे देणे एकत्रितपणे १२ कोटींच्या घरात जाते. एवढे पैसे तातडीने उभे करण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही.
जे कर्ज घेतले आहे त्याचे पुनर्गठन करून घेता येईल. कर्जदाराला कर्ज घेण्याची जेवढी गरज आहे तेवढीच गरज बँकेला कर्ज देण्याची आहे. आज लिलाव टळला असला तरी पुढे काय करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. काही मार्ग निश्चितच आहेत पण त्यासाठी, जे मदत करण्यास तयार आहेत त्यांची मदत घेण्याची इच्छा असली पाहिजे. तरच मार्ग निघू शकतो. आपल्याकडे विचार करण्याची आणि मार्ग काढण्याची क्षमता नक्कीच आहे. एक उच्चशिक्षित, पुढारलेली ज्ञाती/समाज म्हणून आपली ओळख आहे. पण जर आपलेच घर आपल्याला सावरता येणार नसेल तर आपले हे पुढारलेपण आणि इतिहासातील आपल्या व्यवस्थापन कौशल्याच्या कथा व्यर्थ आहेत.