संपादकीय

अजूनही ‘नरबळी’: देशाची अंधारयुगाकडे वाटचाल

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे शाळेची प्रगती व्हावी म्हणून संस्थाचालकाने एका विद्यार्थ्याचा 'नरबळी' दिला. सध्या शिक्षण संस्था या धंद्यासाठी उघडल्या जातात, त्यामुळे धंद्याची प्रगती व्हावी म्हणून अनेक अघोरी, अमानुष प्रथांचा अवलंब केला जातो. त्यातीलच 'नरबळी' हा एक अमानुष प्रकार आहे.

नवशक्ती Web Desk

प्रासंगिक

- राहुल थोरात

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे शाळेची प्रगती व्हावी म्हणून संस्थाचालकाने एका विद्यार्थ्याचा 'नरबळी' दिला. सध्या शिक्षण संस्था या धंद्यासाठी उघडल्या जातात, त्यामुळे धंद्याची प्रगती व्हावी म्हणून अनेक अघोरी, अमानुष प्रथांचा अवलंब केला जातो. त्यातीलच 'नरबळी' हा एक अमानुष प्रकार आहे.

प्राचीन काळापासून एखादी अशक्यप्राय गोष्ट मिळवण्यासाठी मनुष्याचा बळी दिला जातो. याचे अनेक संदर्भ जगभरातील अनेक संस्कृतीमध्ये मिळतील. भारतातही पूर्वी युद्ध जिंकावी म्हणून, मोठे बांधकाम सुरक्षित राहावे, गुप्तधन मिळावे, घरातील वाईट शक्तीचा नायनाट व्हावा म्हणून त्या शक्तीला 'नरबळी' दिला जात असे. डॉ. श्रीराम लागू नेहमी म्हणत की, आजच्या माणसाचा मेंदू काही प्रमाणात जनावराच्या मेंदूप्रमाणेच काम करतो. त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये अजूनही काही अघोरी अनिष्ट प्रथा, परंपरा या खऱ्याच आहेत, असे बसले आहे. त्यामुळे आपले एखादे अशक्यप्राय काम होण्यासाठी एखाद्या अघोरीशक्तीला साकडे घालून तिला जर 'नरबळी' दिला, तर आपले काम होईल, असा (अंध) विश्वास काही माणसाच्या मनामध्ये आजही घर करून आहे. या विश्वासाचा फायदा घेऊन काही मांत्रिक त्यांना 'नरबळी' देण्याचा सल्ला देतात.

'नरबळी' या अघोरी प्रथेची आजची भयानकता जाणून घ्यायची असेल, तर उत्तर भारतात कशाला आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात जरा डोकावून पाहुयात... मागील दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये दरवर्षी एक-दोन केसेस नरबळीच्या घडतात. त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील कृष्णा इंगोले या बालकाचा बळी त्याच्या नात्यातीलच व्यक्तीने दिला. घरातील एका व्यक्तीचे सततचे आजारपण बरे होण्यासाठी कृष्णाचा बळी दिला गेला. लहान मुलाच्या रक्तात बोटे बुडवल्यास अलौकिक शक्ती प्राप्त होते असा समज करून संत शंकर महाराज आश्रम, पिंपळखुटा, अमरावती येथील आश्रम शाळेतील प्रथमेश जगणे (वय वर्ष ११) याचा 'नरबळी' आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी दिला होता. सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील भाग्यश्री माने हिचा बळी नात्यातीलच व्यक्तीने गुप्तधनाच्या लालसेपोटी दिला होता. एका बहाद्दर पोलीस अधिकाऱ्याने तब्बल आठ वर्षांनंतर या केसचा अत्यंत कुशलतेने तपास करून भाग्यश्रीच्या नात्यातीलच मारेकऱ्यांना अटक केली. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील सपना पळसकरचा बळी नवरात्रीच्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी दिला होता. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सुरज भोईर (वय वर्षे १०) या बालकाचा बळी त्याला शाळेतून बोलावून मांत्रिकाच्या आहारी गेलेल्या एका माथेफिरू दिला होता. त्याला अजून चार बालकाचे बळी हवे होते. परवा-परवा कोल्हापूर जिल्ह्यातील कौलव आणि सातारा जिल्ह्यातील वाई येथे गुप्तधन आणि नरबळीसाठी घरामध्ये मोठे खड्डे काढून अघोरी पूजा करताना काही लोक आढळून आले होते.

या सर्व 'नरबळी' प्रकरणांमध्ये वय वर्षे पाच ते पंधरापर्यंतची लहान मुले बळी ठरतात. या लहान मुलांना बळी देणारे हे त्यांच्या ओळखीचे, नात्यातीलच असतात. अत्यंत अघोरी पद्धतीने लहान मुलांना मारले जाते. पुरोगामी महाराष्ट्रात आजही असे नरबळीचे प्रकार घडले की, महाराष्ट्राची वाटचाल अंधार युगात सुरू आहे, असे वाटते. या अघोरी प्रथेविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोकांचे प्रबोधन, संघर्ष आणि कायदा ही शस्त्रे वापरून कार्य करत आहे. नरबळीचा सल्ला देणाऱ्या मांत्रिकांवर धाड टाकून त्यांना गजाआड करण्यासाठी अंनिस कार्यकर्ते नेहमी सज्ज असतात.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर महाराष्ट्रामध्ये जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला आहे, त्याचे नावच 'नरबळी' या शब्दाने सुरू होते. ते असे 'महाराष्ट्र 'नरबळी' आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३' आहे. या कायद्यात 'नरबळी'संदर्भात एक कलम आहे. या कायद्यानुसार, आजपर्यंत महाराष्ट्रात २ हजारपेक्षा जास्त केसेस नोंद झालेल्या आहेत. दहापेक्षा जास्त प्रकरणांमध्ये मांत्रिकांना या कायद्यानुसार सजा झालेल्या आहेत. याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सतत प्रयत्नशील असतात.

समाजातील नरबळीची प्रथा नष्ट व्हावी, म्हणून अंनिसच्या या कार्याला समाजातील सर्व घटकांनी पाठिंबा द्यायला हवा. 'नरबळी' हे मानवी संस्कृतीला लागलेला कलंक आहे. 'नरबळी' देऊन कोणतेही अशक्य काम होत नाही, हे लोकांच्या मनामध्ये बिंबवायला हवे. लोकांचा स्वकर्तृत्वावरील विश्वास कमी झाला की, लोक अशा अघोरी अंधश्रद्धेचा आधार घेतात.

'नरबळी' देण्याचा सल्ला देणाऱ्या मांत्रिकांना कायद्याचा धाक हवा. पोलिसांनी 'नरबळी' प्रकरणाकडे फक्त खून म्हणून न बघता अंधश्रद्धेच्या नजरेतून पाहून मुळापर्यंत तपास करायला हवा. त्याबाबत पोलिसांचे प्रशिक्षण व्हायला हवे. गावोगावी असणाऱ्या मांत्रिकांची यादी पोलीस पाटलांच्याकडून मागून घेऊन अशा मांत्रिकांना या जादुटोणा विरोधी कायद्याबद्दल जाणीव करून द्यायला हवी. देशभरात घडणाऱ्या अशा अघोरी प्रथेविरोधात 'देशव्यापी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा' होणे हे गरजेचे आहे.

'अंधश्रद्धा निर्मूलनाचा एकमेव मार्ग हा तर्कशुद्ध विचार करणे हा होय!' असे पेरियार रामासामी म्हणत. तर्कशुद्ध विचार करणे हे माणूस असण्याचे पहिले लक्षण आहे, असे 'डॉ. नरेंद्र दाभोलकर' नेहमी म्हणत. असा 'तर्कशुद्ध विचार करायला शिका!' असा संदेश आपल्या महाराष्ट्रात महात्मा जाेतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांनी दिला आहे. या महामानवांचे विचार जोपर्यंत आपण अंगीकारणार नाही, तोपर्यंत आपली सामाजिक प्रगती होणार नाही.

हजारो वर्षांपासून आपल्या समाजाच्या मनामध्ये 'नरबळी' सारख्या अघोरी प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी लोकांना तर्कशुद्ध विचार करायला शिकवणे ही आता काळाची गरज झाली आहे.

(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ता आहेत)

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले