'एआय'ने बनविलेली प्रतिमा
संपादकीय

देशभक्तीची ज्योत पेटवणारे शिल्पकार

अमृत काळात विकसित भारत @2047 च्या उभारणीसाठी आपण स्वतःला समर्पित करूया आणि आपल्या राष्ट्राची प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्र येऊन काम करूया.

नवशक्ती Web Desk

विशेष

सी. पी. राधाकृष्णन

अमृत काळात विकसित भारत @2047 च्या उभारणीसाठी आपण स्वतःला समर्पित करूया आणि आपल्या राष्ट्राची प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्र येऊन काम करूया.

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या या महान घटनेच्या निमित्ताने, मी प्रत्येक भारतवासीयाला मनापासून शुभेच्छा देतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतःचे बलिदान दिले, त्या सर्वांनाही आदरपूर्वक अभिवादन करतो.

गेल्याच आठवड्यात मी अंदमान आणि निकोबार बेटांना भेट दिली. माझ्या या भेटीदरम्यान, 'हर घर तिरंगा' अभियानाचा एक भाग म्हणून मला आपला राष्ट्रध्वज फडकवण्याचा तसेच आपले थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा फडकवलेल्या तिरंग्याला वंदन करण्याचा तसेच त्यांचे स्मरण करण्याचा बहुमान मिळाला. ३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजींच्या आझाद हिंद सेनेने भारतीय भूभागावर जिथे पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता, अगदी त्याच पवित्र भूमीवर उभे राहणे हा माझ्यासाठी खरोखरच अत्यंत भावूक करणारा अनुभव होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पशुपॉन मुथुरामलिंग थेवर यांच्या निमंत्रणावरून सप्टेंबर १९३९ मध्ये मदुराईला भेट दिली होती, त्यांच्या या भेटीचे स्मरणही या घडामोडींनी मला करून दिले. त्यावेळच्या या ऐतिहासिक घडामोडीने या प्रदेशातील असंख्य देशभक्तांना प्रेरणा दिली होती.

राष्ट्रीय स्मारक असलेल्या सेल्युलर कारागृहाला दिलेली भेट हा देखील माझ्यासाठी दुसरा अत्यंत प्रेरणादायी क्षण ठरला. वसाहतवादी हुकूमशाहीने भारतमातेचे थोर सुपुत्र वीर सावरकर, योगेंद्र शुक्ला, बटुकेश्वर दत्त, शचिंद्र नाथ सान्याल आणि इतर अनेकांना या कारागृहात तुरुंगात डांबून एकांतात ठेवले होते. अगदी आजही या राष्ट्रीय स्मारकाच्या भिंती भारत स्वतंत्र व्हावा आणि सन्मानाने जगावा म्हणून आपले प्राण पणाला लावलेल्या त्या शूरवीरांच्या धैर्याच्या, त्यांनी भोगलेल्या यातनांच्या आणि त्यांच्या सर्वोच्च त्यागाच्या कथा आपल्याला सांगत असतात.

आज आपण भारत छोडो आंदोलनाचे स्मरण

करत आहोत आणि अशावेळी मला ९ ऑगस्ट रोजी अंदमान बेटांवर 'हर घर तिरंगा' अभियानाचा शुभारंभ करण्याचे लाभलेले भाग्य, ही मला असीम आनंदाची अनुभूती देणारी घटनाच ठरली. १९४२ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 'भारत छोडो' आंदोलनाला सुरुवात केली आणि त्यासोबतच देशाला 'करेंगे या मरेंगे' ही स्फूर्तिदायक घोषणा दिली. त्यांच्या या आवाहनामुळेच तर, देशभरात स्वातंत्र्य मिळवण्याच्या एका तीव्र इच्छेने जोर धरला. त्या काळात वसाहतवादी सत्तेविरुद्ध खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पिढीमुळेच, आज आपल्याला स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून श्वास घेण्याचे आणि लोकशाही व्यवस्थेअंतर्गत घटनात्मक हक्कांसह जगण्याचे भाग्य लाभले आहे. या देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो शूर स्वातंत्र्यसैनिकांनी आपली अढळ निष्ठा आणि त्यागाने लढा दिला, आपली भारतमाता मुक्त व्हावी यासाठी अनेकांनी आपल्या मौल्यवान प्राणांची आहुती दिली.

स्वातंत्र्यसैनिकांचे वैविध्यपूर्ण योगदान

स्वातंत्र्यसैनिक मग ते उत्तरेकडील काश्मीरमधील असोत की दक्षिणेतील तमिळनाडूमधील असोत, वा पश्चिमेकडील गुजरातमधील असोत की पूर्वेकडील आसाममधील असोत, सर्व प्रदेशांतील, वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या, वेगवेगळ्या वय आणि लिंगाचे लोक एका सामायिक ध्येयासाठी एकत्र आले होते आणि ते ध्येय होते भारतमातेच्या स्वातंत्र्याचे.

पहिल्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान प्रतिकाराचे एक अमर प्रतीक बनलेल्या झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचे शौर्य, मंगल पांडे यांचे धैर्य, 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' या घोषणेने राष्ट्राला जागे करणाऱ्या बाळ गंगाधर टिळक यांनी निर्भीडपणे दिलेली हाक, अशा प्रत्येक अभिव्यक्तीने स्वातंत्र्याच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीला बळकटी दिली. व्ही. ओ. चिदंबरम पिल्लाई यांनी भारताचा पहिला स्वदेशी जहाजबांधणी उद्योग सुरू करून वसाहतवादी आर्थिक वर्चस्वाला आव्हान दिले. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या क्रांतिकारी साहसाने पिढ्यान्पिढ्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचा त्याग करण्याची प्रेरणा दिली. त्याचवेळी राणी गाइदिनल्यू यांच्या अदम्य साहसाने ईशान्य भारतात ब्रिटिश राजवटीविरोधातली प्रतिकाराची ज्योत धगधगत ठेवली. आसाममध्ये, कनकलता बरुआ जी या तरुण महिला स्वातंत्र्यसैनिकाने अढळ धैर्यान राष्ट्रध्वज हातात धरून भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व करताना आपले प्राण अर्पण केले. भगवान बिरसा मुंडा आणि इतर अनेक आदिवासी नेत्यांनी वसाहतवादी राजवटीविरोधातल्या ऐतिहासिक प्रतिकाराचे नेतृत्व केले. इतिहासाच्या पानांमधून अशा प्रतिकाराच्या, धैर्य आणि दृढनिश्चयाच्या कितीतरी कथा समोर उलगडल्या जाऊ शकतात.

स्वातंत्र्यसैनिक तिरुप्पूर

स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानिमित्त, मी कोडी काथा कुमारन (ध्वजरक्षक, कुमारन) म्हणून सुपरिचित असलेल्या तिरुप्पूर कुमारन यांना आदरांजली अर्पण करतो. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान तिरुप्पूर (माझे मूळ गाव) येथे, मृत्यू समोर असतानाही त्यांनी राष्ट्रध्वज खाली पडू दिला नाही. यासाठी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यानंतर ते या नावाने ओळखले जाऊ लागले. अगदी लहान वयात कुमारनच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रखरपणे तेवत होती. महात्मा गांधी यांच्या आदर्शानी खोलवर प्रभावित होऊन, कुमारन यांनी लोकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी 'देशबंधू युवा संघटने'ची स्थापना केली. कुमारन यांचा ठाम विश्वास होता की, जेव्हा लोकांना वसाहतवादी राजवटीच्या अन्यायाची जाणीव होईल आणि त्यांच्यामध्ये त्याचा प्रतिकार करण्याचे धैर्य आणि स्पष्टता निर्माण होईल, तेव्हाच खरे स्वातंत्र्य मिळू शकेल. गांधीवादी सामाजिक सुधारणेच्या तत्त्वांशी वचनबद्ध राहून, त्यांनी दारूबंदीला सामाजिक आणि राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या दिशेने एक आवश्यक पाऊल मानले आणि त्या ध्येयाचे सक्रियपणे समर्थन केले. कुमारन यांनी १० जानेवारी १९३२ रोजी सविनय कायदेभंगाच्या चळवळीदरम्यान एका मोर्चाचे नेतृत्व केले. हातात राष्ट्रध्वज घेऊन आणि काही शूरवीरांच्या साथीने तिरुपूरच्या रस्त्यांवर 'वंदे मातरम'च्या जोरदार घोषणा घुमत होत्या. कुमारन यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे २७ वर्षे होते. तिरुप्पूर कुमारन यांच्याबद्दल लिहिताना, आज मला अशा अनेक तरुणांची आठवण येते, ज्यांनी भारतमातेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. काही नावे अशी आहेतः भगतसिंग (२३), सुखदेव (२३), राजगुरू (२२), खुदीराम बोस (१८), कनकलता बरुआ (१८), अनंत लक्ष्मण कान्हेरे (१९), वनचीनाथन (२५) आणि इतर अनेक जणांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ते अमर झाले. आपल्या राष्ट्रीय चळवळीतील अनाम वीरांना केंद्रस्थानी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकाराची मी प्रशंसा करतो. अशा सर्व ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना मी वंदन करतो.

या महत्त्वाच्या प्रसंगी आपण आपल्या मातृभूमीप्रति वचनबद्धता नव्याने व्यक्त करूया. या अमृत काळात विकसित भारत @2047 च्या उभारणीसाठी आपण स्वतःला समर्पित करूया आणि आपल्या राष्ट्राची प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्र येऊन काम करूया. हाच निर्धार करण्याची आज गरज आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अढळ धैर्याने लढणाऱ्या आणि आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना हीच खरी आदरांजली ठरेल.

जय हिंद! भारत माता की जय !

(लेखक भारताचे उपराष्ट्रपती आहेत)

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

Independence Day 2026 : 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमला लाल किल्ला; ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक क्षण, Videos

इंडोनेशिया पुन्हा हादरले! ७.७ तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा हाय अलर्ट; VIDEO

'आपण सोशल मीडियावर कमी पडतोय'; रविंद्र चव्हाण यांच्याकडून नेते, कार्यकर्त्यांना कानपिचक्या

मुंबई अग्निशमन दलाच्या १३ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक