विशेष लेख
नरेंद्र मोदी/जॉर्जिया मेलोनी
भारत आणि इटली हे दोन्ही देश जागतिक अर्थव्यवस्थेच्या दोन महत्त्वपूर्ण केंद्रांच्या अगदी मध्यभागी वसलेले आहेत. हे असे प्रदेश आहेत ज्यांच्याकडे स्वतंत्र क्षेत्र म्हणून पाहिले जाऊ शकत नाही, तर त्याऐवजी ते वाढत्या प्रमाणात परस्परांशी जोडलेले अवकाश आहेत.
भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. अलीकडील वर्षांमध्ये आमच्यातील बंध एका अभूतपूर्व गतीने दृढ झाले असून या मैत्रीपूर्ण संबंधांचे रूपांतर स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या मूल्यांमध्ये रुजलेल्या आणि भविष्यासाठीच्या समान दृष्टिकोनावर आधारित धोरणात्मक भागीदारीत झाले आहे.
आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन होत असताना भारत आणि इटली यांच्यातील भागीदारीला उच्चस्तरीय राजकीय आणि संस्थात्मक संवादांद्वारे मार्गदर्शन लाभले आहे. या भागीदारीला एक नवीन आणि उच्च पैलू प्राप्त झाला असून आमची आर्थिक गतिशीलता, सामाजिक सर्जनशीलता आणि हजारो वर्षांपासूनच्या संस्कृतीचे ज्ञान यांचा संगम झाला आहे. आमचे सहकार्य हे आपल्या सामायिक जाणिवेचे प्रतिबिंब आहे की, २१व्या शतकातील समृद्धी आणि सुरक्षितता या राष्ट्रांच्या नवोन्मेष क्षमतेवर, ऊर्जा संक्रमणाचे व्यवस्थापन करण्याच्या कौशल्यावर आणि धोरणात्मक सार्वभौमत्व अधिक बळकट करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल. यासाठी आम्ही आमचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ आणि विविधतेने समृद्ध करण्यास कटिबद्ध आहोत. जेणेकरून नवीन उद्दिष्टांचा पाठपुरावा करता येईल आणि परस्परपूरक सामर्थ्यांचा एकत्रित उपयोग करता येईल.
औद्योगिक महासत्ता म्हणून इटलीचे स्थान प्रतिबिंबित करण्याच्या हेतूने इटालियन डिझाईन, उत्पादकतेतील उत्कृष्टता आणि जागतिक दर्जाचे सुपर कॉम्प्युटर्स यांचा आणि भारताची वेगवान आर्थिक वृद्धी, अभियांत्रिकी नैपुण्य, व्याप्ती आणि १०० युनिकॉर्न आणि दोन लाख स्टार्टअप्स असलेली नवोन्मेष आणि उद्योजक परिसंस्था, यांच्यात एक शक्तिशाली समन्वय साधण्याचे आमचे ध्येय आहे. हे केवळ एकत्रीकरण नसून मूल्यनिर्मितीची सह-प्रक्रिया आहे, ज्यामध्ये आपल्या परस्पर औद्योगिक सामर्थ्यांमुळे एकमेकांची क्षमता अधिक वृद्धिंगत होते.
युरोपियन युनियन आणि भारत यांच्यातील मुक्त व्यापार करार, वाढता व्यापार आणि गुंतवणूक या दोन्ही दिशांनी मार्ग खुला केला आहे. संरक्षण आणि अंतराळ, हरित तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, वाहन उद्योगातील घटक, रसायने, औषधनिर्माण, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने, पर्यटन आणि इतर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून आम्हाला २०२९ पर्यंत भारत आणि इटली यांच्यातील व्यापार २० अब्ज युरोपर्यंत वाढवून त्याहीपेक्षा जास्त विस्तार करायचा आहे.
जगभरात ‘मेड इन इटली’साठी प्रचलित असलेला समानार्थी शब्द म्हणजे उत्कृष्टता हा होय आणि त्याने आज ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील उच्च गुणवत्तेच्या उद्दिष्टांशी निसर्गतः समन्वय साधला आहे. या संदर्भात, इटालियन उद्योगांना भारतात उत्पादन करण्यात वाढलेले स्वारस्य आणि भारतीय उद्योगांची इटलीमधील वाढलेली संख्या, जी सध्या दोन्ही बाजूंनी एक हजारपेक्षा अधिक आहे, ही एक अत्यंत सकारात्मक गोष्ट असून त्यामुळे आपल्या पुरवठा साखळीतील समन्वय वृद्धिंगत होईल.
तांत्रिक नवोन्मेष आमच्या भागीदारीचा गाभा आहे. येणारी दशके अमर्याद व्याप्ती असलेल्या तांत्रिक क्रांतीने आकाराला येतील आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कंप्युटिंग, प्रगत उत्पादकता, महत्त्वपूर्ण खनिजे आणि डिजिटल पायाभूत सुविधा अशा क्षेत्रांतील प्रगतीने ओळखली जातील. भारताची गतिशील नवोपक्रम परिसंस्था अतिशय कुशल व्यावसायिक प्रतिभासंपन्न मनुष्यबळाने युक्त असून इटलीच्या प्रगत औद्योगिक क्षमतांचा संगम झाल्याने वरील क्षेत्रातील आमचे सहकार्य अधिक नैसर्गिक आणि धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.
या कार्यात आमची विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांमधील वाढत्या भागीदारीचा मोठा पाठिंबा मिळेल. भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा याआधीच विविध देशांमध्ये विशेषतः ग्लोबल साऊथमधील अनेक देशांमध्ये व्यापक प्रतिसाद मिळवत आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव आपल्या समाजावर आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर आधीच दिसू लागला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास हा जबाबदार आणि मानवकेंद्रित असावा हे सुनिश्चित करण्यासाठी इटली आणि भारत दीर्घकाळापासून सहकार्य करत आहेत. या दृष्टिकोनातून पाहिले तर भारत आणि इटली, कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सर्वसमावेशक विकासाचे एक प्रभावी साधन म्हणून पाहत आहेत. विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये जिथे डिजिटल पायाभूत सुविधा आणि सहज उपलब्ध बहुभाषिक तंत्रज्ञान दरी वाढवण्याऐवजी ती कमी करण्याचे कार्य करू शकते.
भारताच्या मानव - अर्थात मानवाला तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी ठेवण्याच्या दृष्टिकोनावर आणि मानवतावादी परंपरेत रुजलेल्या ‘मानव केंद्रित अल्गोरिदमिक नीतिशास्त्रा’ला प्रोत्साहन देणाऱ्या इटलीच्या नेतृत्वावर आधारित आमची भागीदारी कृत्रिम बुद्धिमत्तेला सामाजिक सक्षमीकरणासाठी एक प्रभावी प्रेरक शक्ती बनवण्याचा प्रयत्न करते. सुरक्षित डिजिटल सहकार्य, क्षमता-विकास आणि सक्षम सायबर पायाभूत सुविधांमधील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करून, प्रत्येक राष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासात सहभागी होता येईल आणि त्याचा लाभ घेता येईल असे खुले, विश्वासार्ह आणि न्याय्य डिजिटल क्षेत्र निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हा दृष्टिकोनच इटलीच्या जी-७ अध्यक्षपदाचा गाभा आणि नवी दिल्लीत झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट २०२६ ची फलनिष्पत्ती आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे मानवाने मानवासाठी विकसित केलेले साधन म्हणून पाहणे म्हणजे तंत्रज्ञान कधीही मानवाची जागा घेऊ शकत नाही किंवा त्यांच्या मूलभूत अधिकारांना बाधा पोहोचवू शकत नाही, तसेच सार्वजनिक चर्चेला प्रभावित करण्यासाठी किंवा लोकशाही प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी त्याचा वापर होऊ नये, हे ठामपणे अधोरेखित करणे होय. अधिकाधिक परस्परसंलग्न होत चाललेल्या जगात स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याचा आमचा दृष्टिकोन याच मूलभूत आव्हानावर आधारित आहे.
आमच्या सहकार्यात अंतराळ क्षेत्राचाही समावेश आहे. भारताने अंतराळ संशोधन आणि उपग्रह तंत्रज्ञानात केलेली उल्लेखनीय प्रगती, तसेच इटलीची एरोस्पेस इंजिनिअरिंगमधील उत्कृष्टता, संयुक्त उपक्रम आणि पुढच्या पिढीतील तंत्रज्ञान विकासासाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देतात.
राष्ट्रांची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा आणि स्थैर्य आवश्यक आहे. संरक्षण, सुरक्षा आणि धोरणात्मक तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपले सहकार्य अधिक बळकट करण्याचा इटली आणि भारताचा मानस आहे. आमचे सहकार्य महत्त्वपूर्ण सागरी मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत करेल, तसेच दहशतवाद, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क, अमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे आणि मानवी तस्करी यांसारख्या धोक्यांचा सामना करण्यासाठी प्रतिरोधक क्षमता बळकट करेल.
ऊर्जा हा आमच्या भागीदारीचा आणखी एक महत्त्वाचा स्तंभ आहे. वैविध्यपूर्ण ऊर्जास्रोतांकडे जागतिक स्तरावर होणाऱ्या संक्रमणासाठी नवोन्मेष, गुंतवणूक आणि सहकार्याची आवश्यकता आहे. भारत आणि इटली नूतनीकरणक्षम ऊर्जेपासून ते हायड्रोजन तंत्रज्ञानापर्यंत आणि स्मार्ट ग्रीड्सपासून ते लवचिक पायाभूत सुविधांपर्यंत सहकार्य करत आहेत. हरित हायड्रोजन निर्यातीचे केंद्र बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि ते अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधांमधील इटलीच्या प्रगत तंत्रज्ञानाला तसेच युरोपसाठी ऊर्जा प्रवेशद्वार म्हणून असलेल्या तिच्या धोरणात्मक भूमिकेला उत्तम प्रकारे पूरक ठरते. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA), आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी (CDRI) आणि जागतिक जैवइंधन आघाडी (GBA) या भारताच्या नेतृत्वाखालील प्रमुख आघाड्यांमध्ये इतर देशांसोबतचे आमचे सहकार्यही या संदर्भात महत्त्वाचे आहे.
भौतिक, डिजिटल आणि मानवी जोडणी म्हणजे आपल्याला एकत्र विणणारा एक धागा आहे. भारत आणि इटली हे दोन्ही देश जागतिक अर्थव्यवस्थेच्या दोन महत्त्वपूर्ण केंद्रांच्या अगदी मध्यभागी वसलेले आहेत, म्हणजेच इंडो-पॅसिफिक आणि भूमध्य समुद्र (Mediterranean) हे असे प्रदेश आहेत ज्यांच्याकडे स्वतंत्र क्षेत्र म्हणून पाहिले जाऊ शकत नाही, तर त्याऐवजी ते वाढत्या प्रमाणात परस्परांशी जोडलेले अवकाश आहेत. वास्तविक, आपण ज्याला 'इंडो-मेडिटेरेनियन' म्हणू शकतो त्याचा उदय आपण पाहत आहोत, जो व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, डेटा आणि विचारांसाठी हिंदी महासागराला युरोपशी जोडणारा एक महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. याच परस्परांशी जोडलेल्या अवकाशात आपले नाते नैसर्गिकरीत्या एका विशेष धोरणात्मक भागीदारीत विकसित होते जे दोन खंडांना जोडते. नवीन जागतिक गतिमानतेला आकार देते. या संदर्भात, इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC) आधुनिक वाहतूक आणि पायाभूत सुविधा, डिजिटल नेटवर्क्स, ऊर्जा प्रणाली आणि लवचिक पुरवठा साखळी याद्वारे आपल्या प्रदेशांना जोडण्याच्या उद्देशाने असलेल्या एका दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करत आहे. हा दृष्टीिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी भारत आणि इटली इतर भागीदारांसोबत एकत्र काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत.
आपल्या राष्ट्रांमधील प्रगल्भ भागीदारी आणि शाश्वत सांस्कृतिक संबंधांचा आधार घेऊन आपण आपल्या सामायिक आव्हानांना तोंड देऊ शकतो. भारतीय संस्कृतीत “धर्म” ही संकल्पना आपल्या कृतींना दिशा देणाऱ्या कर्तव्यभावनेचे प्रतीक आहे; तर “वसुधैव कुटुंबकम्” अर्थात संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे हा सिद्धांत आजच्या परस्परांशी जोडलेल्या डिजिटल युगात अत्यंत प्रभावीपणे प्रतिध्वनित होतो. अशा मूल्यांना इटलीच्या मानवतावादी परंपरेत एक नैसर्गिक प्रतिसाद मिळतो, ज्याची मुळे प्रबोधन युगातील आहेत, जी प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर आणि लोकांना व समाजाला एकत्र आणण्याच्या संस्कृतीच्या शक्तीवर भर देत आहेत. त्यामुळे, आमचा सामायिक दृष्टिकोन आपल्या लोकांना केंद्रस्थानी ठेवून एक मजबूत आणि भविष्यवादी भारत-इटली भागीदारीचा पाया घालण्याचा प्रयत्न करत आहे.
(लेखक भारताचे पंतप्रधान आणि इटलीच्या पंतप्रधान आहेत)