मुंबई : अंधेरी पश्चिम येथे शुक्रवारी (दि. १०) बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बसने एकामागोमाग अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात किमान २ ते ३ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचा दावा चालकाने केला आहे
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, या साखळी अपघातात सुमारे १४ वाहने नुकसानग्रस्त झाली. त्यामध्ये १२ ते १३ रिक्षांचा समावेश आहे. धडकेची तीव्रता इतकी होती की, अनेक रिक्षा आणि इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान, BEST बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसने एकामागोमाग अनेक वाहनांना धडक दिली. अपघातानंतर चालकाने पोलिसांसमोरही ब्रेक फेल झाल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे.
वाहतुकीवर परिणाम
अपघातानंतर नुकसानग्रस्त वाहने रस्त्यावरच उभी राहिल्याने अंधेरी पश्चिम परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी वाहतूक सुरळीत करत नुकसानग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम हाती घेतले.
अपघाताचे व्हिडीओ व्हायरल
या अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये चेंगराचेंगरी झालेल्या रिक्षा, नुकसानग्रस्त वाहने आणि घटनास्थळी जमलेली नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.
ब्रेक निकामी झाल्यामुळेच हा अपघात झाला की त्यामागे अन्य काही कारण होते, याचा पोलीस तपास करत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.