X
संपादकीय

नाझींच्या मार्गानेच सुरू इस्रायलची वाटचाल

नरसंहाराच्या, अत्याचाराच्या वेदना काय असतात याचा अनुभव ज्यू लोकांना आहे. त्यांनी भोगलेल्या यातनांबद्दल जग नेहमीच सहानुभूती दाखवते. यातना भोगलेले लोकच जेव्हा पॅलेस्टिनी जनतेवर अत्याचार करून, मुक्तपणे नरसंहार करतात तेव्हा ते भूतकाळातून शिकले नाहीत हेच स्पष्ट होते.

Swapnil S

दृष्टिक्षेप

उत्तम जोगदंड

नरसंहाराच्या, अत्याचाराच्या वेदना काय असतात याचा अनुभव ज्यू लोकांना आहे. त्यांनी भोगलेल्या यातनांबद्दल जग नेहमीच सहानुभूती दाखवते. यातना भोगलेले लोकच जेव्हा पॅलेस्टिनी जनतेवर अत्याचार करून, मुक्तपणे नरसंहार करतात तेव्हा ते भूतकाळातून शिकले नाहीत हेच स्पष्ट होते.

"ऑक्टोबर २०२५ च्या युद्धबंदीपासून पॅलेस्टिनी मुला-मुलींशी लिंगभेदात्मक वर्तन केल्याचे, लैंगिक अत्याचार केल्याचे, त्यांना अमानवी आणि अपमानकारक वागणूक दिल्याचे, जाणीवपूर्वक, लक्ष्य करून त्यांच्या हत्या केल्याचे, तसेच मुलांसाठी अत्यावश्यक असलेल्या अनाथालये, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक पायाभूत सेवासुविधांना लक्ष्य करून दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान मोठ्या प्रमाणात मुलांची पद्धतशीरपणे हत्या केल्याचे, त्यांना जखमी केल्याचे निर्विवाद पुरावे आयोगाला मिळाले आहेत. २०,००० मुले मारली गेल्याचे आणि ४४,००० पेक्षा अधिक मुले जखमी झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. ‘व्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशात’ (ओपीटी) हत्या झालेल्यांमध्ये ३० टक्के मुले आहेत आणि मुलांना मारणे तसेच जखमी करणे हे सातत्याने चालू आहे." संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) मानवाधिकार परिषदेतील ‘स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशी आयोगाचे’ अध्यक्ष न्या. एस. मुरलीधर यांची वरील धक्कादायक माहिती देणारी व्हिडीओ क्लिप जगभरात व्हायरल झाली आहे.

या दोन वर्षांच्या काळात ‘व्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशात’ नरसंहार करणारे आहेत इस्रायलच्या सैन्यदलांचे (आयडीएफ) सैनिक. या नरसंहाराच्या चौकशीसाठी युनोने नेमलेल्या स्वतंत्र चौकशी आयोगाच्या दि. १८ जून २०२६ च्या अहवालावर एक दृष्टिक्षेप टाकल्यास एकेकाळी जगाची प्रचंड सहानुभूती लाभलेल्या ज्यू लोकांच्या देशाचा आणि त्यांच्या सेनेचा अत्यंत भेसूर चेहरा आपल्याला दिसून येईल.

ज्यू लोकांचा इस्रायल हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला तेव्हापासूनच पॅलेस्टिनी आणि इस्रायली यांच्यात कायम हिंसक चकमकी होत आल्या आहेत. परंतु ७ ऑक्टोबर २०२३ नंतर ६७,००० पॅलेस्टिनी लोकांचे बळी घेणारा नरसंहार कोणाही संवेदनशील व्यक्तीस अस्वस्थ करणारा आहे. हा नरसंहार सुरू होण्यास कारणीभूत झाले गाझा पट्टीतून हमास या दहशतवादी संघटनेने नियोजनबद्धपणे जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने इस्रायलवर दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेले तीव्र हल्ले. त्यांनी इस्रायली सैनिकांच्या संरक्षक भिंती पार करून सामान्य लोकांवर, उत्सवाचा आनंद घेणाऱ्या लोकांवर भीषण गोळीबार केला. इस्रायलवर हजारो रॉकेट्स सोडली. मोटरबोटींमधून येऊन हल्ले चढवले. यात ११४० इस्रायली नागरिकांचा बळी गेला, तर सुमारे २५० लोकांना पळवून नेऊन हमासने ओलीस ठेवले. हा हल्ला इस्रायलला अनपेक्षित होता आणि हमासने इस्रायल बेसावध असताना आपला डाव साधला होता. इस्रायल हे सार्वभौम राष्ट्र असल्याने त्यांनी हल्ल्याला चोख उत्तर देणे, हमासला धडा शिकवणे क्रमप्राप्त होते. म्हणून गाझा पट्टीवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्याबद्दल इस्रायलला दोष देता येणार नाही. परंतु, हमासला धडा शिकवणे मागे पडून गाझा पट्टीत नरसंहार करून तिथले जनजीवन, मालमत्ता नष्ट करण्याकडे झालेली इस्रायलची वाटचाल चिंताजनक आहे.

हमास आणि इस्रायल यांच्यात ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या युद्धविरामानंतर देखील या नरसंहारात खंड पडलेला नाही. या काळात त्यांनी बळी घेतलेल्या पॅलेस्टिनी लोकांची संख्या ६७,००० जरी असली तरी बॉम्ब/क्षेपणास्त्र हल्ले करून उद्ध्वस्त केलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली दबून मेलेल्या हजारो लोकांची कसलीही मोजदाद नाही. मृतांमध्ये २०,००० लहान मुलांचा समावेश आहे. १,६९,००० लोक जखमी झालेले आहेत. युनिसेफच्या अंदाजानुसार तीन ते चार हजार मुलांनी आपले एक किंवा अधिक अवयव गमावले आहेत. १०,८०० पेक्षा अधिक पॅलेस्टिनी लोक इस्रायली तुरुंगात खितपत पडले आहेत, ज्यात ४५० मुले आणि ८७ स्त्रियांचा समावेश आहे. माध्यमे आणि पत्रकारितेतील ३०० लोक मृत्युमुखी पडले आहेत.

या नरसंहारातील आयडीएफने केलेल्या क्रूर अत्याचारांची वर्णने अंगावर काटा आणणारी आहेत. त्यातील काही प्रातिनिधिक उदाहरणे पाहूया. सहाय्यता छावणीतील एका तंबूमध्ये एका दहा दिवसांच्या बाळाला आई दूध पाजत असताना एका पॉडकोप्टरमधून (लहान ड्रोनचा एक प्रकार) त्या बाळाच्या डोक्यात दिवसाढवळ्या गोळी घातली गेली. १२ एप्रिल २०२४ रोजी घडलेल्या या घटनेत ते बाळ वाचले असले तरी त्याला आता सतत झटके येऊ लागले आहेत.

दि. २४ जानेवारी २०२४ रोजी इस्रायली सैनिकांनी स्थानिक लोकांनी परिसरातून निघून जावे अशी घोषणा केली. त्यानुसार एका कुटुंबातील १६ वर्षांचा मुलगा हातात पांढरे निशाण घेऊन बाहेर पडत असताना त्याला गोळ्या घालण्यात आल्या. त्याला वाचवायला त्याचा २० वर्षांचा भाऊ धावला, तेव्हा त्याला तिथल्या तिथे गोळ्या घालून संपवले. मुलांच्या आईवडिलांनी मुलांचे प्रेत ताब्यात घेण्यासाठी थोडीशी हालचाल केली तरी त्यांच्यावर गोळीबार केला जात होता. दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी एकाच कुटुंबातील सात जणांचा बळी आयडीएफच्या सैनिकांनी घेतला होता.

आयडीएफचे सैनिक वेगवेगळ्या दिवशी निष्पाप युवकांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर ठरवून गोळ्या घालण्याचा गेम खेळत होते आणि नेमबाजीचा सराव करीत होते, असेही आयोगाच्या निदर्शनास आले आहे. एका दिवशी एक अवयव ठरवायचा आणि दिसणाऱ्या मुलांच्या त्याच अवयवावर सैनिकांनी गोळ्या घालायच्या, दुसऱ्या दिवशी दुसरा अवयव... असा एक पॅटर्न आयोगाच्या निदर्शनास आला आहे. हे अत्यंत अमानवी आणि विकृत आहे. मुलींवर अत्यंत विकृत पद्धतीने अत्याचार केले गेले.

गाझा पट्टीतील ९२ टक्के निवासी आणि ८८ टक्के व्यापारी इमारती नष्ट झालेल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांशी संबंधित २,३०० पेक्षा अधिक इमारती नष्ट झालेल्या आहेत. ८६ टक्के पाणी आणि सांडपाणी व्यवस्था नष्ट झालेली आहे. १२५ इस्पितळे आणि दवाखाने क्षतिग्रस्त झालेले आहेत. १,७२२ आरोग्य आणि सहाय्यताकर्मी मृत झालेले आहेत. या उद्ध्वस्त नगरीत राहणाऱ्या लोकांपर्यंत मदत पोहोचू दिली जात नाही. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात अन्नटंचाई आहे. उपासमारीमुळे १५४ मुलांसह ४५९ लोक मृत्युमुखी पडले आहेत. काही ठिकाणी रेशनिंग पद्धतीने अपुरा अन्नपुरवठा केला जात असला तरी असे अन्न मिळवण्यासाठी धडपड करताना २,६०० लोक मारले गेले आहेत, तर १९,००० लोक जखमी झाले आहेत. युनो समर्थित एका संघटनेच्या अंदाजानुसार सप्टेंबर २०२६ अखेपर्यंत गाझा पट्टीतील जवळपास एक तृतीयांश (६,४१,०००) लोकसंख्येला अन्नटंचाईच्या भीषण आपत्तीला सामोरे जावे लागणार आहे.

क्रूरकर्मा हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझींनी ज्यू लोकांचा अनन्वित छळ केला. गॅस चेंबर्समध्ये घालून आणि गोळीबार करून ६० लाख ज्यूंचा नरसंहार केला. एवढी दिव्ये पार करून ज्यू लोकांनी १९४८ साली आपले इस्रायल हे स्वतंत्र राष्ट्र मिळवले. नरसंहाराच्या आणि अत्याचाराच्या वेदना काय असतात याचा भयंकर अनुभव ज्यू लोकांना आहे. त्यांनी भोगलेल्या यातनांबद्दल जग त्यांच्याबाबतीत नेहमीच सहानुभूती दाखवते. असे भोग अन्य कोणत्याही समुदायाच्या वाट्याला येऊ नयेत अशीच अपेक्षा असते. परंतु हे सर्व भोगलेले लोकच जेव्हा आपल्या आयडीएफच्या माध्यमातून नाझींना लाजवतील असे अत्याचार पॅलेस्टिनी जनतेवर, मुलांवर करून, त्यांचा मुक्तपणे नरसंहार करतात तेव्हा नाझींनी केलेल्या त्यांच्या नरसंहारातून ते काहीही शिकले नसून उलट त्यांच्याच मार्गाने जात आहेत, असे खेदाने म्हणावे लागते.

भारताची स्थिर आणि भक्कम वाटचाल

जुलै महिना कसा जाईल? बघा तूळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ४ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

कमी तेलात बनवा कुरकुरीत आलू कॉर्न कटलेट; चहासोबत लागेल भन्नाट

Mumbai Rain : पुढील ४८ तास मुंबईसह उपनगरांसाठी रेड अलर्ट; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा