संपादकीय

कावड यात्रा : बहुजन चालती समरसतेची वाट

बहुसंख्य असलेला बहुजन समाज कायम आपल्या मुठीत राहावा म्हणून कावड यात्रेत त्यांना अनिर्बंध स्वातंत्र्य दिले की आपला उद्देश साध्य होतो हे त्यांनी ओळखले आहे. म्हणूनच कावडीयांच्या उन्मादावर अभिजन वर्ग मौन बाळगून राहतो.

नवशक्ती Web Desk

दृष्टिक्षेप

उत्तम जोगदंड

बहुसंख्य असलेला बहुजन समाज कायम आपल्या मुठीत राहावा म्हणून कावड यात्रेत त्यांना अनिर्बंध स्वातंत्र्य दिले की आपला उद्देश साध्य होतो हे त्यांनी ओळखले आहे. म्हणूनच कावडीयांच्या उन्मादावर अभिजन वर्ग मौन बाळगून राहतो.

श्रावण महिन्यात खांद्यावरील कावडीच्या पात्रांमध्ये गंगा नदीचे पवित्र जल अनवाणी पदयात्रा करून आणायचे, शिवमंदिरातील शिवलिंगावर त्याचा अभिषेक करायचा, अशी ही उत्तरेकडील राज्यांत प्रचलित असलेली 'कावड यात्रा' प्रथा. पूर्वी कावड यात्रा हिंदू साधू-संत करीत असत. परंतु गेल्या काही दशकात सामान्यजन यात सामील होऊ लागल्याने आणि विशेषतः गेल्या दहा बारा वर्षात हिंदू धार्मिकतेला प्रोत्साहन देणारे सरकार सत्तेत आल्यापासून या यात्रेने विराट स्वरूप धारण केले आहे. साधारणतः तीन ते पाच कोटी शिवभक्त कावडीये, दरवर्षी या यात्रेत सहभागी होतात असा अंदाज आहे. भारतीय संविधानाने अनुच्छेद २५ ते २८ अनुसार नागरिकांना श्रद्धा आणि धर्माचे मूलभूत स्वातंत्र्य बहाल केले असल्याने या प्रथेवर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. परंतु हे मूलभूत स्वातंत्र्य अमर्याद नसून सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य आणि अन्य तरतुदींच्या अधिन आहे. प्रत्यक्षात मात्र संविधानाने घालून दिलेल्या या मयदिचा उघड उघड भंग, सरकारी यंत्रणांच्या साक्षीने, कावड यात्रांमध्ये केला जात असल्याने त्यावर दृष्टिक्षेप टाकणे, त्याची चिकित्सा करणे आवश्यक ठरते.

कावड यात्रेत हिंदू धर्मातील कोणत्याही जातीचे लोक सामील होऊ शकतात. परंतु, प्रत्यक्षात बहुजनांची (अनुसूचित जाती-जमाती-ओबीसी), गरीब शेतकरी-कष्टकऱ्यांची मुलेच यात उत्साहाने सामील होताना दिसतात. महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत सामील झाल्यावर या मुलांच्या शिक्षणाचे, रोजगार-व्यवसायाचे काय होत असेल असा प्रश्न तुम्हा-आम्हाला पडू शकतो. परंतु 'उच्च'वर्षीय अभिजन वर्गाला, लोकप्रतिनिधींना, श्रीमंतांना असे प्रश्न पडत नाहीत. कारण त्यांची मुले या यात्रेत सामील न होता आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय यावर लक्ष केंद्रित करतात. बहुजनांसाठी मात्र शिक्षण, रोजगार, व्यवसाय यापेक्षा आपली परंपरागत धार्मिक समरसता हीच प्राथमिकता असावी. त्यामुळे त्यांना असे प्रश्न पडत नसावेत. कावड यात्रेत सामील झालेले बहुजन, धार्मिकतेत आकंठ बुडून 'समरस' झाले असल्याने आपल्यामुळे अन्य लोकांना, व्यवस्थेला काय सहन करावे लागते याचे तसेच संविधानाने धार्मिक स्वातंत्र्यावर घातलेल्या मयदिचे भान नसते. या यात्रेत काय काय घडते यावर नजर टाकणे उद्बोधक ठरेल.

कावड यात्रेच्या वेळी कावडीये मार्गावर एका बाजूने शिस्तीत चालत नाहीत, रस्ता अडवून चालतात, कधी रस्त्याच्या मध्यभागी बसतात, भजन करतात. वाहनचालकांची त्यामुळे अडचण होते. वाहतूककोंडी होते. एवढेच नाही, तर कोणी गाडीचा हॉर्न वाजवला किंवा गाडीचा किंचितसा स्पर्श कावडीस झाला तर हे कावडीये गाडीच्या चालकाला बेदम मारहाण करतात, गाडीची तोडफोड करतात. पोलीस त्यांच्या कृत्यांकडे हतबल होऊन बघत राहतात. या वर्षी तर त्यांनी अक्षरशः पोलिसांनाच बुकलून काढून त्यांची गाडीही फोडली.

भांग हा अमली पदार्थ भगवान शंकराचा प्रसाद म्हणून ग्रहण करण्यास भाविकांमध्ये मान्यता आहे असे म्हणतात. परंतु या यात्रेत भांगेसोबत गांजा, चरस या अमली पदार्थांचे, मदिरेचे सेवन काही कावडीये मुक्तपणे करताना दिसतात. नशेत धुंद होऊन भेलकांडत चालणारे, तोल जाऊन पडणारे कावडीये (मुले आणि मुलीही) व्हायरल व्हिडीओत दिसतात. यात्रेत मोठ्या डीजेवर फिल्मी गीतांच्या चालीवरील भक्तिगीते कर्कशपणे वाजवून त्यावर हिडीस नाच करताना कावडीये (मुले-मुली) दिसतात. निष्काळजीपणामुळे अनेकदा अपघात होऊन काही कावडीयांना जीव गमवावा लागतो. कावड यात्रेच्या मार्गावरील बऱ्याच गाव/शहरांमध्ये शाळा आणि महाविद्यालये अनेक दिवस बंद ठेवावी लागतात. इथे धर्म हीच प्राथमिकता ठरते.

सगळेच कावडीये असे वर्तन करतात असे नाही. परंतु जे करतात त्यांच्यावर कायद्याचा किंवा धर्माचा कसलाही धाक नसल्याने, अन्य कावडीये याबाबत गप्प राहत असल्याने एकूणच कावड यात्रेची प्रतिमा मलीन झालेली आहे हे नाकारता येत नाही. एवढे सारे प्रकार घडत असताना, नागरिकांना प्रचंड गैरसोयी सोसाव्या लागत असताना, संवैधानिक मूल्यांचे अवमूल्यन होत असताना, अमली पदार्थांचा मुक्त वापर होत असताना, संबंधित सरकारी यंत्रणा गप्प का असतात? बहुजनांवर अन्याय करण्याची एकही संधी न सोडणारी पोलीस यंत्रणा कावडीयांवर कायदेशीर कारवाई न करता त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्याचे आणि सोयीसुविधा पुरवण्याचे लाड करून धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याचे अवमूल्यन का करते? एखाद्या देवाचा कोणी एकेरीत उल्लेख केल्यास धार्मिक भावना दुखावल्याचा बहाणा करणाऱ्या आणि धर्म धोक्यात आल्याची आवई उठवणाऱ्या लोकांना इथे धार्मिकतेचे धिंडवडे निघत असलेले दिसत कसे नाहीत? आरक्षणावरून बहुजनांची वेळोवेळी लायकी काढणाऱ्या, त्यांना हिणवणाऱ्या अभिजनांना बहुजनांचा हा उन्माद, उच्छाद कसा चालतो? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे.

या प्रश्नांची उत्तरे शोधताना आठवतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी बहुजनांना आपल्या प्रगतीसाठी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिला. तसेच म. फुलेही आठवतात. जे म्हणतात,

विद्येविना मती गेली।

मतीविना नीती गेली।

नीतीविना गती गेली।

गतीविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले॥

म. फुले आणि आंबेडकर यांचे हे विचार आणि संवैधानिक मूल्यांचा अंगीकार केल्यामुळे बहुजन समाज आपली पारंपरिक गुलामी सोडून, वर्ण-जातीव्यवस्थेची चौकट मोडू लागला आहे आणि हीच बाब जात-वर्ण-वर्चस्वाची फळे उपभोगणाऱ्या सनातनी प्रवृत्तीला पसंत नाही. म्हणून एकीकडे गेल्या दहा वर्षांत ९४ हजार शाळा सरकारकडून बंद करून बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना इकडे कावड यात्रेसारख्या माध्यमातून त्यांना धार्मिकतेच्या नशेत गुंगवून, 'समरस' ठेवून उदात्तीकरण केलेले आधुनिक 'शूद्र-अतिशुद्र' बनवले जात आहे असे म्हणायला वाव आहे. धर्मात सर्वात 'खाल'चे स्थान असलेल्या शूद्र-अतिशूद्रांचे कावड यात्रेच्या निमित्ताने एवढे लाड केले जात असतील तर बहुजनांनी हुरळून जाणे स्वाभाविकच आहे. परंतु असे हुरळून जाणे 'हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या पाठी' या म्हणीतील मेंढीसारखे आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की आपले शिक्षण, रोजगार, व्यवसाय याकडे लक्ष न देऊन स्वतःचेच नुकसान करून घेत आहोत आणि सनातनी प्रवृत्तीच्या सापळ्यात अडकत आहोत. तसेच ज्या संविधानाने आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये बहाल केली त्या संविधानाशीच आपण प्रतारणा करीत आहोत. संविधानविरोधी सनातनी प्रवृत्तीच्या लोकांना हेच तर हवे आहे. बहुसंख्य असलेला बहुजन समाज कायम आपल्या मुठीत राहावा म्हणून कावड यात्रेत त्यांना अनिर्बंध स्वातंत्र्य दिले की आपला उद्देश साध्य होतो हे त्यांनी ओळखले आहे. म्हणूनच कावडीयांच्या उन्मादावर अभिजन वर्ग मौन बाळगून राहतो. दुसरे असे की कावडीयांच्या उच्छादामुळे 'हे लोक' असंस्कृत, बेमुर्वतखोर असल्याची प्रतिमा निर्माण करून त्यांच्याविषयी समाजात तिरस्कार खोलवर रुजवता येतो. अशा प्रकारे सनातनी प्रवृत्ती एका दगडात दोन पक्षी मारत आहेत. हे जेव्हा बहुजनांच्या लक्षात येईल, समरसतेपेक्षा फुले-आंबेडकरांची समता त्यांना कळेल, तेव्हा हे बहुजन आपल्या शिक्षण, रोजगार, व्यवसायाकडे, मूलभूत प्रश्नांकडे वळतील.

uttamjogdand@gmail.com

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

Independence Day 2026 : 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमला लाल किल्ला; ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक क्षण, Videos

इंडोनेशिया पुन्हा हादरले! ७.७ तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा हाय अलर्ट; VIDEO

'आपण सोशल मीडियावर कमी पडतोय'; रविंद्र चव्हाण यांच्याकडून नेते, कार्यकर्त्यांना कानपिचक्या

मुंबई अग्निशमन दलाच्या १३ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक