संपादकीय

लोकशाहीच्या नावे जुगाराचा पट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणाला वेग आलेला आहे. या पक्षातून त्या पक्षात आवक-जावक सुरु आहे. एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षात दाखल झाले आहेत. बंडखोरांची संख्या वाढत आहे. पक्षशिस्त अस्तित्त्वात राहिलेली नाही. सत्तेचा पट कोणाबरोबर मांडायचा, याच्या आकडेमोडीत निवडणुकीचा जुगार झालेला आहे. तरीही आम्ही लोकशाहीसाठी लढतोय, असेच प्रत्येकजण सांगत आहे.

रविकिरण देशमुख

मुलुख मैदान

रविकिरण देशमुख

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणाला वेग आलेला आहे. या पक्षातून त्या पक्षात आवक-जावक सुरु आहे. एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षात दाखल झाले आहेत. बंडखोरांची संख्या वाढत आहे. पक्षशिस्त अस्तित्त्वात राहिलेली नाही. सत्तेचा पट कोणाबरोबर मांडायचा, याच्या आकडेमोडीत निवडणुकीचा जुगार झालेला आहे. तरीही आम्ही लोकशाहीसाठी लढतोय, असेच प्रत्येकजण सांगत आहे.

महाराष्ट्राची नवी विधानसभा कशी असेल हे २३ तारखेला निकालातून समजणार आहे. पण तिचा रागरंग कसा असेल हे सध्या सुरू असलेल्या प्रचारातून दिसून येऊ लागले आहे. सत्ताधारी महायुतीने प्रचाराचा धडाका उडवून दिला आहे. रेडिओवर सुरू असलेल्या जाहिरातीत लाडकी बहीण, भाऊ या योजनांचा मारा आहे. त्यात शेवटी एक प्रश्न विचारला जातो – ‘दुसरं सरकार आलं तर?’ किंवा ‘त्यांचं सरकार असतं तर?’ हे ऐकल्यानंतर सामान्य माणसाला प्रश्न पडेल की विरोधी पक्षाची भीती दाखवून मत मागायची असतात, की आपल्या कामगिरीचा डंका पिटून?

भाजपाच्या जाहिरातीत भाजपा महायुतीला मतदान करा, असे आवाहन केले जाते. अन्य दोन सहयोगी पक्षांचा थेट उल्लेख टाळून फक्त ‘महायुती’ असे म्हटले जाते. उद्या या महायुतीत आणखी नवा भिडू तर अपेक्षित नाही ना, अशी शंका येते आणि त्याला बळ मिळते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी चाललेल्या खटाटोपींचे. या पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांच्यासाठी माहीम मतदारसंघ सुरक्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न दिसून आलाच आहे. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर रिंगणात आहेतच. पण तरीही काही करता येईल का, याचा खटाटोप सुरू आहे.

माहीममध्ये नाही तर किमान शिवडीत हा प्रयत्न झालाच आहे. तिथे महायुतीचा कोणीही उमेदवार मनसेच्या बाळा नांदगावकर यांच्या समोर नाही. त्यांचा मार्ग शक्य तेवढा प्रशस्त करून उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अजय चौधरी यांची वाट बिकट करण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेचे जुणे जाणते संजय नाना अंबोले यांचीही अपक्ष म्हणून उमेदवारी इथे आहेच. ते कोणाची मते घेतात यावर निकाल अवलंबून असणार आहे. पण मनसेला सोबत घेण्याचे भाजपाचे प्रयत्न दिसून येत आहेत आणि निवडणुकीनंतर भाजपाचा मुख्यमंत्री असेल हे राज ठाकरे यांचे विधान बरेच सूचक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिंदे यांच्या गोटात काहीशी अस्वस्थता आहे.

हे का झाले असावे, असा प्रश्न पडू शकतो. याची दोन कारणे दिसून येतात. एक तर एकनाथ शिंदे याची राजकीय पकड जेवढी ठाण्यात आहे तेवढी मुंबईत नाही. मुंबईत ‘ठाकरे’ या नावाला वलय आहे, महत्त्व आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेला शह द्यायचा असेल तर ठाण्याचे शिंदे यापेक्षा मुंबईतलेच ठाकरे हवेत हा विचार झालेला दिसतो. यातून दुसरी गोष्ट साध्य होते ती म्हणजे शिंदे यांच्या सेनेला आपोआप थोडासा का असेना शह बसतो. सध्या शिंदे यांच्या निवडणूक तयारीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या तयारीने अनेकांच्या तोंडात बोटे जात आहेत. ते त्यांच्या सहयोगी पक्षाला किती रुचत असेल हा प्रश्नच आहे.

राजकारणात युती असो वा आघाडी, यातील कोणी एकच पक्ष फार मोठा, मजबूत होऊ देणे परवडत नसते - मग ते राजकीयदृष्ट्या असो वा साधनसामुग्रीने सुसज्ज असणे असो!

राज यांनी आपला दांडपट्टा फिरवायला सुरूवात करताना थेट मूळ मुद्द्याला हात घातला. शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह ही बाळासाहेबांची मालमत्ता आहे, असे निक्षून सांगत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेच्या सर्व दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठाकरे घराण्यातील व्यक्तीने इतर कोणी बाळासाहेबांचा वारसा सांगण्यावर आक्षेप घेतला आहे, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे उद्धव यांच्या आजवरच्या भूमिकेलाही एका अर्थाने बळ प्राप्त होते. यापुढची लढाई कशी असेल याची ही चुणूक आहे.

केवळ विधानसभेपुरता हा विचार नाही. तर उद्या मुंबईसकट सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. मुंबई कोणाची हा प्रश्न उपस्थित होणार आहे. ठाण्यापेक्षा मुंबईत राहणाऱ्याने त्याला उत्तर दिलेले केव्हाही चांगले, असा विचार झालेला आहे. तो विचार करून भाजपाने काही वेगळे धोरण आखल्याची ही झलक तर नाही ना, असे वाटल्यास गैर नाही.

शिंदे यांना महायुतीत हा नवा भिडू आवडेल का, हा प्रश्न आहे. ‘मला हलक्यात घेऊ नका. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी पळणारा नाही तर पळवणारा आहे’, असे ते दसरा मेळाव्यात बोलून गेले आहेत. ‘मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे’, हे ते बाळासाहेबांच्या सुपुत्राला तर सांगणार नाहीत. कारण त्यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेबांचेच शिवसैनिक आहेत. दोघांचे भांडण सत्तेचा पट कोणाबरोबर मांडायचा एवढेच आहे. मग हा इशारा कोणाला आणि तो कशा अर्थाने घेतला गेलाय, यावर पुढच्या राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत.

त्याचेच प्रतिबिंब निवडणुकीत उमटू लागले आहे. सर्व २८८ मतदारसंघ आणि त्यातील उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तर बंडखोरीला उत आला आहे हे स्पष्टपणे दिसून येते. यावेळच्या बंडखोरीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. पक्षशिस्त नावाच्या शब्दाचा भरदुपारी लिलाव करून टाकला आहे. असे उगाच होत नसते. कारण पक्षासोबत काम करणाऱ्या कुटुंबातील काही सदस्यांनी भलत्याच पक्षाकडून उमेदवारी आणली तरी फारसा फरक पडलेला नाही. तुमचा मुलगा अचानक पक्ष सोडून दुसरीकडून उभा राहिला म्हणून म्हणून आम्ही तुमचे तिकिट कापतो, असे वडिलांनाही सांगितले गेलेले नाही.

वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, मेहुणे वेगवेगळ्या पक्षाकडून उभे असल्याचे अचाट आणि अफाट दृश्य महाराष्ट्रात दिसत आहे. लोकशाहीची कोणती मुल्यं हे असे उमेदवार व त्यांच्या पाठीशी उभे असलेले पक्ष पाळताहेत हे यातून दिसत नाही. पण मतदारांना मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन हेच उमेदवार करणार आहेत. कट्टर उजवी विचारसरणी असलेला संध्याकाळी डाव्या विचारांच्या आणि डाव्या विचारसरणीचा तत्काळ उजव्या विचारसरणीच्या बाजूला जातोय. त्यांना ते सर्व चालतेय आणि जनता दिग्मुढ होऊन पाहत आहे.

सर्व प्रमुख पक्ष निवडणुका जवळ आल्या की बैठकांचे सत्र सुरू करतात. तालुका, जिल्हा येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदारसंघनिहाय आढावा घेतात. निवडणुकीसाठी कशी ताकद लावायची याचा विचार करतात. मग अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली की पक्ष मजबूत करणारे हे पदाधिकारी, नेते टुण्णकन दुसऱ्या पक्षात कसे काय उडी मारतात, हा अचंबित करणारा मुद्दा आहे.

याचा अर्थ सर्वसामान्य लोकांनी, मतदारांनी लोकशाहीची मुल्ये जोपासावीत, आम्ही मात्र आमचे पाहू, असा यांचा पवित्रा आहे. कालपर्यंत अमूक एका पक्षाचा आहे असे सांगणारा प्रत्यक्ष निवडणुकीत भलतेच चिन्ह दाखवत मते मागतोय, असे मतदारांना थक्क करणारे चित्र या निवडणुकीत दिसत आहे. एकेका पक्षाला ४०-४० बंडखोरांवर कारवाई करावी लागत आहे.

हे झाले त्या त्या पक्षापुरते. मात्र दुसरे एक दृश्य विचित्र आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या प्रमुख राजकीय समीकरणातील पक्षही एकामेकांविरोधात लढताहेत. आजवर त्या त्या युती, आघाडीची बाजू मांडणारेच उमेदवार म्हणून एकामेकांविरोधात उभे आहेत. याचा अर्थ असा की सत्तेत अथवा विरोधात असलेल्या त्या त्या पक्षांचाच एकामेकावर विश्वास उरलेला नाही. निकालानंतरचे चित्र कसे असेल याची बहुदा कोणालाही खात्री वाटत नाही. निवडणूक जणू जुगार या अर्थाने खेळली जात आहे, हेच वास्तव आहे.

ravikiran1001@gmail.com

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले