संपादकीय

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

मुंबईच्या लोकलमधील दैनंदिन प्रवास आता सुरक्षित राहिलेला नाही, हे मालाड स्थानकातील घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. क्षुल्लक वादातून जीव जाणे ही प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासनाच्या अपयशाची धोक्याची घंटा आहे.

तेजस वाघमारे

आपले महानगर

तेजस वाघमारे

मुंबईच्या लोकलमधील दैनंदिन प्रवास आता सुरक्षित राहिलेला नाही, हे मालाड स्थानकातील घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. क्षुल्लक वादातून जीव जाणे ही प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासनाच्या अपयशाची धोक्याची घंटा आहे.

मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या लोकल ट्रेनमध्ये सीटवरून, दरवाजात उभे राहण्यावरून होणारे वाद मुंबईकरांसाठी नवे नाहीत. महिला प्रवाशांच्या भांडणाचे व्हिडीओ तर नित्याचे झाले आहेत. पण आता लोकलमधील वाद खून करण्यापर्यंतच्या टोकाला जाऊ लागले आहेत. मालाड स्थानकात लोकलमध्ये झालेल्या खुनाने प्रशासनासोबतच लोकांचेही डोळे उघडले आहेत. लोकलमध्ये होणाऱ्या वादामुळे प्रवासी असुरक्षित समजू लागले आहेत की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. यामध्ये रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेचे अपयश यानिमित्ताने पुढे आले आहे. लोकल प्रवासादरम्यान प्रवासी चाकू, सुरे घेऊन प्रवास करत असतील तर याला रोखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांची आहे. मात्र नियोजनशून्य कारभारामुळे ‘आवो-जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था लोकल प्रवासाची झाली आहे.

उपनगरीय लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांची सुरक्षा तपासणी करणे मोठे कठीण काम आहे. याचा प्रत्यय २६ नोव्हेंबर २००८ मधील मुंबई हल्ल्यानंतर आला. मुंबई हल्ल्यानंतर प्रमुख रेल्वे स्थानकात मेटल डिटेक्टर आणि स्कॅनिंग मशीन लावण्यात आले. काही महिन्यांतच ही यंत्रणा ठप्प झाली. यामुळेच मुंबई लोकलमधून प्रवास करताना प्रवासी सोबत कोणतीही वस्तू सहज बाळगून प्रवास करू लागला असल्याचे मालाड घटनेतून समोर आले. मालाड घटनेपूर्वी लोकलमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. यानंतरही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसत आहे.

नोव्हेंबर २०२४ मध्ये मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर स्थानकात सीटवर बसण्याच्या वादातून एका तरुणाने ३५ वर्षीय प्रवाशाची हत्या केली होती. या घटनेतील आरोपी अल्पवयीन होता. अशीच घटना कल्याण स्थानकात घडली होती. गर्दीत धक्का लागल्याने मुंब्रा येथील एका तरुणाने तीन प्रवाशांवर चाकूने हल्ला केला होता. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले होते. डिसेंबर २०२५ मध्ये वाशी स्टेशनजवळ सीएसएमटी पनवेल लोकलमध्ये हल्लेखोराने १९ वर्षीय तरुणावर हल्ला केला होता. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेला होता. २०२२ मध्ये पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकामध्ये तरुणीवर ब्लेडने हल्ला केला होता. अशा अनेक घटना लोकल प्रवासादरम्यान घडल्या आहेत.

मुंबईतील मेट्रो मार्गावर प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांची आणि बॅगची तपासणी होते. यामुळे मेट्रो मार्गावरील प्रवास सध्यातरी सुरक्षित मानला जात आहे. अशीच यंत्रणा उपनगरीय रेल्वे मार्गावरील संवेदनशील आणि प्रमुख स्थानकात निर्माण केल्यास अशा घटनांना पायबंद घालता येऊ शकतो. सकाळ आणि सायंकाळी लोकलला प्रचंड गर्दी असते. यावेळी प्रवाशांमध्ये सीटवरून, उभे राहण्यावरून वाद होतात. हे वाद रोखणे अशक्य असले तरी यासाठी प्रशासनाने एक पाऊल तरी पुढे टाकले पाहिजे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे गट तयार झाले आहेत. ते आपल्या गटातील प्रवाशांसाठी जागा अडवून ठेवतात. अशा ग्रुपच्या दादागिरीला प्रशासनाने लगाम घालण्याची वेळ आली आहे.

सध्या रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीवर भर देत आहे. सीसीटीव्हीमुळे गुन्हेगार पकडणे शक्य होऊ लागले आहे. मात्र रेल्वे स्थानकात संशयित रेल्वे प्रवाशांची बॅग तपासणे, अंगझडती घेताना पोलीस कुठेच निदर्शनास येत नाहीत. तिकीट नसतानाही प्रवासी वातानुकूलित लोकल, फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करत आहेत. तिकीट तपासणी मोहिमेत लाखो प्रवाशांवर कारवाई होते. मात्र यानंतरही अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास बिनदिक्कतपणे करतात. हार्बर, ट्रान्स हार्बर मार्ग, मध्य रेल्वेवर ठाण्यापुढील स्थानके, तर पश्चिम रेल्वेवरील स्थानकावर तिकीट तपासणीस दिसतच नाहीत. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी बिनदिक्कतपणे वावरतात. तिकीट तपासणीसांनी तिकीट विचारल्यास विनातिकीट प्रवासी त्यांच्यावरच हात उचलत आहेत.

रेल्वे पोलिसांचा जरब नसल्याने प्रवासी वाटेल तसे वर्तन करू लागले आहेत. लोकलमध्ये तृतीयपंथी आजही प्रवाशांना लाखोली वाहून पैसे वसूल करत आहेत. फेरीवाले स्थानकामध्ये आणि गाड्यांमध्ये बिनदिक्कत व्यवसाय करत आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्षच नाही. प्रशासन गाढ झोपल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. प्रवासी बॅगेत वाटेल ती वस्तू घेऊन प्रवास करू लागले आहेत. याकडे लक्ष देण्यास प्रशासनाकडे मनुष्यबळ नसल्याचे कारण तयार आहे. निवृत्तीच्या प्रतीक्षेत असलेले रेल्वेचे प्रमुख अधिकारी उपनगरीय व्यवस्था सुधारण्याकडे हवे तसे लक्ष देत नाहीत. यातच रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांबाबत राजकीय अनास्था असल्याने प्रवासी अनेक त्रासांना सामोरे जाऊन संयम राखत प्रवास करत आहेत. त्यामुळे राजकीय पटलावर आणि रेल्वे प्रशासनाला लोकल प्रवासात सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन खरंच काही उपाययोजना करतेय की, ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे कारभार सुरू ठेवतेय हे लवकरच दिसणार आहे.

tejaswaghmare25@gmail.com

राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखेत बदल; 'या' दिवशी होणार मतदान

अजित दादा पंचतत्त्वात विलीन! शोकाकूल वातावरणात पार्थ आणि जय पवारांनी दिला मुखाग्नी; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

"दादांना म्हणालो होतो रात्रीच कारने जाऊ, पण..."; अजित पवारांच्या चालकाला 'त्या' रात्रीची आठवण सांगताना अश्रू अनावर

Ajit Pawar death : अपघाताची बातमी दादांच्या आईने पाहिली तेव्हा..."मला दादांना भेटायचे आहे!"

'दादा'ला I Love You सांग...; अजित पवारांवर अंत्यसंस्कारापूर्वी बारामती मेडिकल कॉलेजबाहेर कार्यकर्त्याने फोडला हंबरडा, भावूक Video