मत आमचेही
ॲड. हर्षल प्रधान
मुंबईतील रखडलेले पूल आणि ट्रॅफिक जाम हे विकासातील मोठे अडथळे आहेत. गोखले ब्रिजसारख्या विलंबांनी आणि एल्फिन्स्टनसारख्या घटनांनी लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. सध्या 'मुंबई वाहतूक कोंडीत कावली! जीवाची होतीया काहिली!' अशी अवस्था सामान्यांची झाली आहे.
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असली, तरी तिच्या पायाभूत सुविधांमध्ये पूलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शहराच्या गर्दीच्या वाहतूक व्यवस्थेत पूल हे रेल्वे, नद्या आणि रस्त्यांना जोडणारे प्रमुख घटक आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (एमएसआरडीसी), रेल्वे आणि इतर यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पूल आहेत. मुंबईत एकूण ५४३ पूल आहेत. यात व्यावसायिक आणि सार्वजनिक पूलांचा समावेश आहे, बंदरावरील पूल, रस्ते पूल आणि इतर. मुंबईतील रेल्वे नेटवर्कवर ५० हून अधिक फ्लायओव्हर आणि ओव्हर ब्रिज आहेत. उदाहरणार्थ, मुंबई ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट मेगा प्रोजेक्ट अंतर्गत ५० फ्लायओव्हर बांधले गेले आहेत. बीएमसी, एमएसआरडीसी आणि रेल्वेच्या एकत्रित आकडेवारीनुसार मुंबईत ५०० ते ५५० हून अधिक पूल असावेत. २०२५ मध्ये बीएमसीने १०० नवीन पुलांची घोषणा केली असली तरी, एकूण संख्या वाढत आहे, पण जुने पूल धोकादायक ठरत आहेत. मुंबईतील पूलांची वयं ही शहराच्या इतिहासाशी निगडित आहे. बहुसंख्य पूल ब्रिटिश काळातील असून, त्यांची देखभाल अपुरी असल्याने ते रखडलेले आहेत. शहरातील अनेक पूल १९व्या शतकातील आहेत. एल्फिन्स्टन रोड रेल ओव्हर पूल हा ११२ वर्षे जुना आहे जो १९१३ च्या आसपास बांधला होता. करीरोड पूल आणि टिळक पूल हे देखील शतकाहून अधिक जुने आहेत. २०२५ मध्ये बीएमसीने अशा पाच शतक-जुने पुल पाडून नवीन बांधायचे ठरवले, ज्यात सायन, विक्रोळी आणि कर्नाक ब्रिज यांचा समावेश आहे. एका अहवालानुसार, मुंबईत ५० हून अधिक पूल १०० वर्षांहून अधिक जुने आहेत, आणि त्यांची रचना वाढत्या वाहन भाराला तोंड देण्यासाठी अपुरी आहे. २०२३ च्या ऑडिटमध्ये १७० पूल किरकोळ दुरुस्तीची आणि १०१ पूल प्रमुख दुरुस्तीची गरज असल्याचे नमूद आहे. यात ४१ पूल पूर्णपणे पाडून बांधायचे आहेत. मुंबईतील पुलांच्या वयांची सरासरी ५० ते ७० वर्षे आहे, पण ब्रिटिश काळातील पुल १८००च्या उत्तरार्धापासून हे २०टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. एका सरकारी अहवालानुसार, कोणत्याही एजन्सीने सर्व पुलांची वय आणि दुरुस्तीची पूर्ण नोंद ठेवलेली नाही, ज्यामुळे एल्फिन्स्टनसारख्या घटना घडतात. जुने पूल शहराच्या वाहतूक व्यवस्थेला धोका ठरत आहेत. २०१९मध्ये सीएसएमटी जवळील फुटओव्हर ब्रिज कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला, आणि २०२३ मध्ये ४१ पुल पाडून नवीन बांधायचे ठरले. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईत दोन कोटीहून अधिक लोक आणि वाहनसंख्येमुळे दररोज एक कोटी वाहने जुने पूल भार वाहत जात आहेत. महाराष्ट्रात २००० नंतर १०० हून अधिक पूल कोसळले, ज्यात मुंबईचे काही आहेत. उपाय म्हणून, बीएमसीने स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य केले आहे. २०२५ मध्ये १०० नवीन पुलांची योजना आहे, आणि आयआयटी बॉम्बे सारख्या संस्था तज्ज्ञ सल्ला देत आहेत; मात्र, समन्वयाचा अभाव आणि विलंब समस्या वाढवत आहेत.
ट्रॅफिक जामचा त्रास आणि जीवाची काहिली
या शहराच्या विकासाच्या वेगाला पूरक नसलेली पायाभूत सुविधा, विशेषतः जुने आणि रखडलेले पूल, हे शहरवासीयांसाठी मोठा त्रास ठरले आहेत. एल्फिन्स्टन ब्रिजच्या अलीकडील १२ सप्टेंबर २०२५ पासून हाती घेतलेल्या पाडकामाने शहराच्या मध्यवर्ती भागात ट्रॅफिक जामचा प्रचंड उद्रेक झाला आहे. १२ सप्टेंबर २०२५ रोजी या पुलावरून वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली. या बंदीमुळे मध्य मुंबईत ट्रॅफिकचा गोंधळ उडाला आहे. १३ सप्टेंबर २०२५ रोजी एल्फिन्स्टन ब्रिज बंद झाल्यापासून मध्य मुंबईत ट्रॅफिकचा प्रचंड गोंधळ झाला. दादर-लोअर परळ भागातील आठ रस्ते पूर्णपणे बंद झाले आणि पर्यायी मार्गांवर करी रोड पूल , टिळक पूल आणि गोखले रोडवर प्रचंड गर्दी झाली. सामान्यतः १५ मिनिटांचा प्रवास आता एक तासापेक्षा जास्त लांबत आहे. नवी मुंबईतून परळपर्यंतचा ४५ मिनिटांचा प्रवास दोन तासांपर्यंत वाढला आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी १०० वॉर्डन आणि ५० अतिरिक्त पोलीस तैनात केले, पण प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, समन्वयाचा अभाव आणि अपुरी व्यवस्था यामुळे समस्या वाढल्या. या जाममुळे लोकांना होणारा त्रास असह्य आहे. सामान्य दिवशी दादर ते परळ १० मिनिटांत पोहचता येत असे, आता एक तास लागतो. कार्यालयात उशीर होतो, आणि रस्त्यावरील गर्दीमुळे आरोग्यावर परिणाम होतो. गोखले ब्रिजच्या बंदीमुळे अंधेरीतही अशाच समस्या होत्या. २०२२ ते २०२५ पर्यंत हा पूल बंद असल्याने पूर्व-पश्चिम भागातील वाहतूक विस्कळीत झाली. प्रवासी विलंबित होत होते, आणि आर्थिक नुकसान होत होते. एका अहवालानुसार, मुंबईत ट्रॅफिक जाममुळे दरवर्षी १ लाख कोटी रुपयांचे नुकसान होते, ज्यात इंधन, वेळ आणि उत्पादकतेचा समावेश आहे. या प्रवासात जीवाची काहीली होते ती वेगळीच. मुंबईकरांची अवस्था तशीही मुकी बिचारी कुणीही हाका अशीच झाली आहे. मुंबईकरांच्या कामकाजाच्या वेळा लक्षात न घेता मुंबईतील पायाभूत सेवा, सुविधा न पाहता कामाला लावतात आणि मुंबईकरांचा अंत पाहतात.
१६७ कोटींचा डबलडेकर ब्रिज सामान्य माणसांच्या काय उपयोगाचा?
एल्फिन्स्टन ब्रिजचा नवा डबल-डेकर पूल १६७.३५ कोटी रुपयांच्या खर्चाने बांधला जाणार आहे. हा मुंबईचा पहिला डबल-डेकर रेल्वे ब्रिज असेल, ज्यात खालच्या स्तरावर चार लेन आणि वरच्या स्तरावर अटल सेतू आणि कोस्टल रोडशी जोडणी असेल. याचा अर्थ हा पूल श्रीमंतांसाठीच बांधला जातोय. त्यांचा वेळ वाचावा म्हणून त्याचे बांधकाम अगदी डबल डेकर स्वरूपात केलं जातंय पण त्याचा सामान्य माणसांना काय उपयोग होणार? उलट आधी हा जुना पूल बांधून पूर्ण करून वाहतूक व्यवस्था व्यवस्थित करायला हवी होती. या बंदीमुळे रुग्णवाहिकांना उशीर होत आहे, ज्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका आहे. प्रभादेवीतील रुग्णालयांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागत आहे, आणि लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दादर-लोअर परळ भागातील रस्ते चोक झाले आहेत, आणि शाळा, कार्यालये आणि रुग्णालये प्रभावित झाली आहेत. प्रवाशांच्या तक्रारींनुसार, हे सर्व खराब नियोजनाचे परिणाम आहेत. मुंबईत पूल बंदीमुळे ट्रॅफिक जाम, आणि लोक वेठीस धरले जात आहेत. एल्फिन्स्टन बंदीमुळे दादर ते परळ दोन तास लागतात, आणि रुग्णालयात उशीर होतो. मुंबईत अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. २०१९ मध्ये सीएसएमटी जवळील फुटओव्हर ब्रिज कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला, आणि ३० हून अधिक अपघात झाले. अशा घटना लोकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. बीएमसी आणि महारेलने पुलांच्या देखभालीसाठी बजेट वाढवले आहे, पण अंमलबजावणी कमकुवत आहे. त्यात आता एमएमआरडीएचे प्रकल्प डोक्यावर आहेत.
एमएमआरडीएच्या प्रकल्पांमुळे मुंबईत वाहतूक व्यवस्था विस्कळीत
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) हे शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जबाबदार आहे, ज्यात मेट्रो लाइन, रस्ते, पूल आणि इतर वाहतूक प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र, या प्रकल्पांच्या बांधकामादरम्यान रस्ते बंदी, खोदकाम आणि वाहतूक बदलांमुळे शहरात प्रचंड ट्रॅफिक जाम होतात. २०२५ च्या सप्टेंबर महिन्यात एमएमआरडीएच्या अनेक प्रकल्पांमुळे मुंबईत वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. विशेषतः सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड, आकुर्ली अंडरपास, मेट्रो लाईन तीन, मोनोरेल बंद झाल्याने होणारे काम, प्रभादेवी पूल, वाकोला फ्लाय ओव्हर अशी कामे एमएमआरडीए कडूनही सुरु आहेत त्यामुळे आधीच वाहतूक कोंडी होत असते. एकीकडे सायन रेल्वे वरील पूल कधी पूर्ण होणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईकरांना मोठा त्रास होत आहे. एमएमआरडीएचे २०२५-२६ साठी ४०,१८७ कोटी रुपयांचे बजेट आहे, ज्यात मेट्रो आणि रिंग रोड्सचा समावेश आहे. हे प्रकल्प दीर्घकाळात कोंडी कमी करतील, पण चालू कामांसाठी पर्यायी व्यवस्था सुधारणे आवश्यक आहे. एमएमआरडीएचे सुमारे ५ ते ७ प्रकल्प मुंबईतील वाहतूक कोंडीस मुख्य कारणीभूत आहेत, ज्यात एससीएलआर एक्सटेंशन, मेट्रो लाइन आणि पश्चिम दृतगती महामार्गांवरील कामांचा समावेश आहे. हे प्रकल्प शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे असले तरी, बांधकामादरम्यान ट्रॅफिक मॅनेजमेंट सुधारणे गरजेचे आहे. शासनाने डिजिटल ट्रॅफिक कंट्रोल आणि सार्वजनिक वाहतूक वाढवून त्रास कमी करावा. अन्यथा, मुंबईची वेगवान जीवनशैली आणखी बाधित होईल. माझ्या मुंबईची वाहतूक कोंडी मुळे झाली दैना आणि मुंबईकरांचा त्रास काही केल्या पाहावेना ! अशी परिस्थिती आहे.
प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष