सह्याद्रीचे वारे
अरविंद भानुशाली
सुनेत्रा पवारांचे मौन, पार्थ-जय पवार यांची महत्त्वाकांक्षा आणि पटेल-तटकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या मनातील अस्वस्थता यामुळे राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आहे हे नक्की! याचा लाभ कोणता पक्ष उठवणार हे औत्सुक्याचे ठरेल.
महायुतीमधील राष्ट्रवादीचे अजित पवार गेल्यानंतर जे राजकारण सुरू आहे त्यामुळे त्या पक्षाचे काही खरे नाही. अजितदादा यांनी प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष व सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष केले होते. आता त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी राष्ट्रवादीची सूत्रे हाती घेतल्याने पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. याचा फायदा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी घेतला असल्यास काही नवल नाही. ठाण्यातील माजी खासदार आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या २२ आमदारांना घेऊन पटेल, तटकरे हे भाजपमध्ये जाणार अशी आवई राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी उठवली आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या कथित विलीनीकरणाच्या चर्चेचे नाट्य तीन महिने चालले. अजितदादांची राष्ट्रवादी हाती घेण्यासाठी शरद पवार गटाची ती खेळी होती. त्यावर पटेल, तटकरे, भुजबळ, धनंजय मुंडे यांनी एका रात्रीत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करून मात केली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तो डाव उधळून लावला. परंतु त्यानंतर पार्थ-जय पवार यांचे जे राजकारण सुरू झाले त्यामुळे अस्वस्थता वाढली आहे. शरद पवार यांच्या पक्षात बंड करून अजितदादा ४०-४२ आमदारांना घेऊन महायुतीत सामील झाले. स्वतः उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी अनेकांना मंत्रिपदे, महत्त्वाची खाती मिळवून दिली. २०२४च्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या लोकसभा निवडणुकीला उभ्या होत्या. त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांनी लढत दिली. परंतु त्यांचा पराभव झाला. त्यावेळी शरद पवार यांनी घरच्यांना मते द्या, परक्यांना देऊ नका, असा प्रचार केला होता. सुनेत्रा पवार या पवार कुटुंबाच्या सुनबाई असताना त्या परक्या कशा झाल्या? अजितदादांनी हेतुपुरस्सर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवले. सुप्रिया सुळे यांच्यासमोर सुनेत्रा यांना उभे करणे आवश्यक नव्हते हे अजितदादांनी कबूल केले हा त्यांचा दिलदारपणा होता.
अजितदादांनी राष्ट्रवादी सोडली तेव्हा त्यांच्या समवेत ४०-४२ आमदार होते. शरद पवारांचे दिल्लीमधील उजवे हात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अनेक वर्षे शरद पवारांचे सहाध्यायी असलेले दिलीप-वळसे-पाटील हेही अजितदादांबरोबर आले. २०२४ची विधानसभेची निवडणूक अजित पवारांनी महायुतीच्या झेंड्याखाली लढवली आणि आपले सर्व ४० आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात आतापर्यंत इतिहास पाहिल्यास बंड करणाऱ्या नेत्यांबरोबर गेलेले आमदार पुन्हा निवडून आलेले नाहीत. अशा स्थितीत अजितदादांचे ४० आमदार महायुतीच्या झेंड्याखाली निवडून आले. दस्तुरखुद्द शरद पवारांना त्यावेळी मोठा धक्का बसला, त्यांचे जेमतेम १० आमदार निवडून आले. अजितदादांच्या नियोजनामुळे हे शक्य झाले. रोहित पवार कसेबसे काठावर उत्तीर्ण झाले. अजितदादा विरोधात प्रचारास गेले नाही म्हणून रोहित पवार विजयी झाले. अजितदादांनी रोहित पवारांना एका कार्यक्रमात तसे सुनावलेही होते. सध्या भोंग्याची जागा रोहित पवार घेऊ इच्छितात. राज्याच्या, देशाच्या राजकारणावर रोहित पवार हे बोलत असतात. पार्थ पवार हे राज्यसभेवर खासदार म्हणून गेले आहेत. आता सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. तेथे जय पवारांनी जावे म्हणजे पवार घराण्याचे एक राजकीय वर्तुळ पूर्ण होईल. मुख्यतः या दोन्ही भावांना राष्ट्रवादी आपल्या ताब्यात घ्यायची आहे. वंशपरंपरेने पक्ष व सत्ता ही पवार घराण्याकडेच राहिली पाहिजे, ही भूमिका असावी. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे पाहिजेत कशाला, या भावनेतून त्यांना बाहेर काढण्याचे उद्योग या दोन्ही बंधूंनी चालवले आहेत. त्यामुळे एक निश्चित की, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे अस्तित्व धोक्यात येणार आहे हे निर्विवाद सत्य आहे. हे सगळे सुरू असताना सुनेत्रा पवार मात्र मूग गिळून बसल्या आहेत. त्यामुळे संशय अधिक वाढत आहे. अजितदादांच्या नावाचे वलय आहे तोपर्यंत ठीक आहे, ज्यावेळी हे वलय संपेल तेव्हा परिस्थिती मुंडे कुटुंबासारखी होईल. गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यावेळी अशीच परिस्थिती होती. पंतप्रधान-गृहमंत्री यांनी येऊन जाहीर सभा घेतल्या तरी शेवटच्या त्यावेळी पंकजा मुंडे यांना हार पत्करावी लागली. मुंडेंचे पार्थिव परळीत आले त्यावेळी चाहत्यांची बरीच गर्दी होती. अजितदादांवरील अंत्यसंस्काराच्या वेळी देखील गर्दी होती. परंतु वडिलांचे वलय संपल्यानंतर मुंडे कन्या पराभूत झाल्या. त्यामुळे वडिलांचे वलय संपल्यानंतर आपले काय होईल याचा विचार पार्थ व जय यांनी करणे आवश्यक आहे. उद्या अशीच परिस्थिती राहिल्यास राष्ट्रवादीमधील मोठा गट भाजपकडे जाऊ शकतो. शेवटी सत्ता ही महत्त्वाची आहे. सत्तेशिवाय सध्याचे राजकारणी जगू शकत नाहीत. अशोक चव्हाण यांच्यासारखे मुख्यमंत्री राहिलेले आज भाजपमध्ये आहेत. पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पार्थ-जय पवार हे पक्षातील असंतोषाकडे व अस्वस्थतेकडे लक्ष देणार नसतील तर राष्ट्रवादीचा अस्त होण्यास उशीर लागणार नाही हे कटू सत्य आहे. मुख्यमंत्र्यांकडे अर्थ खाते गेल्याने राष्ट्रवादी आमदारांमध्ये निधीवरून चलबिचल सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही व्यथा अलीकडेच कळवली आहे. निधीचे समान वाटप होणे आवश्यक आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची अलीकडेच भेट घेतली. त्या भेटींबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठकही झाली. या बैठकीत पार्थ व जय पवार यांच्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा झाली. आता ही चर्चा प्रसिद्धी माध्यमांसमोर सुरू झाली. या सर्व बाबींमध्ये सुनेत्रा पवारांची भूमिका ही महत्त्वाची असून त्याही पुत्रप्रेमामुळे याकडे कानाडोळा करत असतील तर पक्षाची स्थिती आणखी वाईट होईल.
राष्ट्रवादीमधील पहिला संघर्ष सुरू झाला तो शरद पवारांमुळे, त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर. वयाच्या ८३ व्या वर्षी शरद पवार यांनी राजीनामा दिल्याबद्दल अजितदादांनी त्यांचे स्वागत केले होते. आता त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, अशी भूमिका दादांनी घेतली होती. परंतु त्यानंतर ज्या घटना घडल्या त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. शरद पवार हे भाजपविरोधी आघाडीत राहण्याबाबत ठाम होते, तर अजितदादा हे सत्तेच्या सोबत जाण्यासाठी उत्सुक होते. पक्ष मजबूत व्हायचा असेल तर सत्ता ही महत्त्वाची आहे. ही भूमिका घेऊन अजितदादांनी पहाटेचे बंड केले. या बंडाची पार्श्वभूमी ही महत्त्वाची होती. शरद पवार यांच्या मध्यस्थीनेच हे बंड झाले होते. भाजपसोबत एकत्र बसून मंत्रिमंडळात किती मंत्री असावेत, कोणती महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे पाहिजेत, याशिवाय पालकमंत्रिपदाचे वाटपही झाले होते.
परंतु अजितदादांच्या शपथविधीनंतर शरद पवार यांनी पलटी मारली. त्यानंतर अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी होती. परंतु त्यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड करून माविआचे सरकार पाडले. उद्धव ठाकरे यांनी तर विधिमंडळाला सामोरे न जाता आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अखेर ठरल्याप्रमाणे शिवसेना फुटीर गट व भाजपचे सरकार स्थापन झाले. मग त्यापाठोपाठ अजितदादाही ४२ आमदार घेऊन महायुतीत सामील झाले. ही सर्व पार्श्वभूमी पाहता आता परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार वयोमानाने थकले आहेत. अजितदादांनी राष्ट्रवादी सत्तेत सामील केली आहे. पुढे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा आघाडीवर आला. अजितदादा महायुतीबरोबर मंत्रिमंडळात सामील झाले. महत्त्वाचे अर्थमंत्रीपद त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्याकडे ठेवले आणि अशा स्थितीतच त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या या निधनानंतर विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू झाल्या. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, परंतु त्याचा फारसा उपयोग पुणे वगळता अन्य कुठेही झाला नाही. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करूनही जर सत्तेच्या जवळ जाता येणार नसेल तर दोन्ही राष्ट्रवादीतील बहुतांश सुभेदार विलीनीकरणापेक्षा अन्य पक्षात जाण्याचा पर्याय स्वीकारतील. परांजपे यांनी त्याची सुरुवात केली. अशावेळी पक्षांतराकरिता सर्वात आकर्षक पर्याय हा भाजप असेल. त्यानंतर शिंदेसेनेचा पर्याय असेल. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व उद्धव सेना यांच्याकडे असलेला कुठला विधानसभा, लोकसभा मतदारसंघ महायुतीत कुठल्या पक्षाकडे जाईल हे हेरून पक्षांतराचे निर्णय होतील. सुनेत्रा वहिनींचे मौन, पार्थ-जय पवारची महत्त्वाकांक्षा आणि पटेल-तटकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या मनातील अस्वस्थता यामुळे राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आहे हे नक्की!