मत आमचेही
ॲड. श्रीनिवास बिक्कड
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. कायदा-सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी आहे आणि त्यात अपयश आल्यास नैतिक जबाबदारीही त्यांनाच स्वीकारावी लागेल. महाराष्ट्राला सक्षम गृहमंत्री हवा आहे.
विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि पुरोगामी विचारांची भूमी म्हणून जगभर ओळख असलेल्या पुण्याची ओळख आता कोयता गँग आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे बदलत आहे. पुण्यनगरीचे रूपांतर कोयतानगरीत होत असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र सत्तेच्या खुर्चीत बसून कायदा-सुव्यवस्थेचा तमाशा पाहत आहेत. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर गोळीबार होतो, कोयत्याने हल्ला केला जातो आणि सहा जण मिळून एका व्यक्तीचे दोन्ही हात छाटतात. ज्या न्यायालयाच्या परिसरात न्याय मिळण्याची अपेक्षा असते, त्याच ठिकाणी गुन्हेगार बेधडक हिंसाचार करतात, यापेक्षा गृहखात्याचे मोठे अपयश कोणते?
ही परिस्थिती केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही. ठाण्यात प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. भरवस्तीत राजकीय पदाधिकाऱ्याची हत्या करण्याइतके गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार आणि कटामागील कारणांचा शोध घेण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृताच्या कुटुंबीयांना तपासाबाबत समाधान नसेल आणि त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागत असतील, तर पोलीस तपासाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. ठाण्यातील हे हत्याकांड आणि पुण्यातील न्यायालयाच्या दारात झालेला हिंसाचार महाराष्ट्रातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचे विदारक चित्र दर्शवतात.
बुधवारी एकाच दिवशी राज्यात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या. राज्यात असा एकही दिवस जात नाही की हिंसाचाराच्या गंभीर घटना समोर येत नाहीत. बंदुका, कोयते आणि धारदार शस्त्रे घेऊन गुन्हेगार सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करत आहेत. सामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षिततेऐवजी भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात कायद्याचे नाही तर गुन्हेगारांचे राज्य आले आहे, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
पुण्यात कोयता गँगचा हैदोस अनेक वर्षांपासून सुरू आहे. किरकोळ वादातून हल्ले, वाहनांची तोडफोड, नागरिकांना धमक्या आणि रस्त्यांवर दहशत निर्माण करण्याचे प्रकार सातत्याने सुरु आहेत. त्यात ड्रग्जच्या वाढत्या जाळ्याची आणि अवैध शस्त्रांच्या विक्रीची भर पडली आहे. तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असताना पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे? गुन्हेगारांना शस्त्रे आणि अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा पर्दाफाश का होत नाही? या अवैध धंद्यांना कोणाचे संरक्षण आहे, याची उत्तरे गृहमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिली पाहिजेत.
पुण्यात भाजपचे खासदार, आठही आमदार आणि शंभरहून अधिक नगरसेवक आहेत. शहराच्या राजकारणावर भाजपचे वर्चस्व आहे. पुण्याचे पोलीस आयुक्तही मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील असल्याचे बोलले जाते. एवढे राजकीय बळ आणि प्रशासनावर नियंत्रण असल्याचा दावा करूनही पुण्यात गुन्हेगारी रोखता येत नसेल, तर भाजपच्या सत्तेचा उपयोग काय? सत्ता केवळ पदे मिळवण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी आहे की नागरिकांना सुरक्षितता देण्यासाठी, याचा खुलासा भाजपने केला पाहिजे.
गेल्या काही वर्षात राज्यातील पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस प्रशासनावर गृहमंत्र्यांचा वचक राहिलेला नाही. पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हप्तेखोरी व वसुलीचे आरोप होत आहेत. पुण्यात दोन कोटी रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलीस उपनिरीक्षकाला अटक झाल्याची घटना या व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचे गांभीर्य अधोरेखित करते. गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस यंत्रणेतील काही घटकच भ्रष्टाचारात गुंतले असतील, तर कायद्याच्या अंमलबजावणीची अपेक्षा कोणाकडून करायची?
दुर्दैवाने, पोलीस यंत्रणेचा वापर राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी होत आहे. सोशल मीडियावर भाजप सरकारविरोधात मत व्यक्त करणाऱ्या नागरिकांवर तातडीने कारवाई होते; मात्र उघडपणे दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई होताना दिसत नाही. सरकारवर टीका करणारा नागरिक पोलिसांना लगेच सापडतो, पण कोयते आणि बंदुका घेऊन फिरणारे गुन्हेगार का सापडत नाहीत? पोलिसांनी राजकीय दबावापासून मुक्त होऊन कायद्याच्या चौकटीत काम करणे अपेक्षित आहे. पोलीस दलाचा वापर सत्ताधाऱ्यांच्या राजकीय हितासाठी नव्हे, तर जनतेच्या संरक्षणासाठी झाला पाहिजे.
संघटित गुन्हेगारीचे वाढते जाळे ही आणखी चिंतेची बाब आहे. बिष्णोई टोळीच्या नावाने देशभरात दहशत निर्माण केली जात आहे. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत झालेली हत्या ही राज्याच्या गृहखात्यासाठी मोठी नामुष्की होती. प्रसिद्ध व्यक्तींना धमक्या, सार्वजनिक ठिकाणी गोळीबार आणि टोळ्यांचे वाढते धाडस यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या नावाखाली सामान्य नागरिक आणि महिलांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना धमकावून वसुली करणाऱ्यांवरही सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे.
राज्यात खून, बलात्कार, दरोडे, गोळीबार, अमली पदार्थांची तस्करी आणि महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. मात्र, सत्ताधारी पक्षाचे नेते जनतेच्या सुरक्षेच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्याऐवजी बेताल वक्तव्ये आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांत गुंतलेले आहेत. सरकारची प्राथमिकता काय आहे, हा खरा प्रश्न आहे. नागरिकांचे प्राण वाचवणे आणि गुन्हेगारी रोखणे की राजकारण करणे?
देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले आहे. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची संपूर्ण प्रशासकीय जबाबदारी त्यांची आहे. पोलीस दलाला सक्षम करणे, गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे, संघटित गुन्हेगारीचा बीमोड करणे आणि नागरिकांना निर्भय वातावरण देणे हे गृहमंत्र्यांचे कर्तव्य आहे. राज्यात गुन्हेगारी सातत्याने वाढत असेल आणि प्रशासन त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असेल, तर त्या अपयशाची नैतिक जबाबदारी त्यांना स्वीकारावीच लागेल. पद आणि अधिकार स्वतःकडे ठेवायचे, पण अपयशाची जबाबदारी मात्र झटकायची, हे चालणार नाही.
गुन्हेगारीवर नियंत्रण कसे ठेवायचे आणि पोलीस प्रशासनाचा दरारा कसा निर्माण करायचा, याचा धडा देवेंद्र फडणवीस यांनी माजी गृहमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यपद्धतीतून घ्यावा. गृहमंत्री म्हणून केवळ आदेश देणे पुरेसे नसते, तर त्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्याचीही जबाबदारी असते. पोलिसांना राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त करून निष्पक्षपणे काम करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कोयता गँग, अवैध शस्त्रांची विक्री आणि ड्रग्ज तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाचा निष्पक्ष आणि कालबद्ध तपास करून मुख्य सूत्रधारांसह सर्व आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत. पोलीस दलातील भ्रष्टाचारावर कारवाई करावी आणि राजकीय दबावाखाली होणाऱ्या कारवाया थांबवाव्यात.
महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि क्रांतिकारकांची भूमी आहे. पुण्याची ओळख विद्येचे माहेरघर म्हणूनच राहिली पाहिजे, कोयता गँगचे केंद्र म्हणून नव्हे. ठाणे आणि मुंबईची ओळख दहशत व राजकीय हत्यांनी होणे ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे.
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर यांची हत्या होते, पुण्यात न्यायालयाच्या दारात गोळीबार होतो आणि राज्यभर गुन्हेगारांचा धुडगूस सुरू असतो. अशा परिस्थितीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. कायदा-सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी आहे आणि त्यात अपयश आल्यास नैतिक जबाबदारीही त्यांनाच स्वीकारावी लागेल. महाराष्ट्राला सक्षम गृहमंत्री हवा आहे; केवळ गृहखाते स्वतःकडे ठेवून गुन्हेगारीचा तमाशा पाहणारा मुख्यमंत्री नको!