महाराष्ट्रनामा
गिरीश चित्रे
महाराष्ट्रातील नद्या अतिक्रमण, प्रदूषण आणि नियोजनशून्य शहरीकरणामुळे धोक्यात आल्या आहेत. मिठी नदीप्रमाणे अनेक नद्यांची स्थिती बिकट आहे. नद्यांचे पुनरुज्जीवन ही काळाची गरज असून, जनजागृती, अंमलबजावणी आणि स्थानिक सहभाग अत्यावश्यक आहे.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यातील विविध भागांसाठी या नद्या जीवनदायी ठरत होत्या. मात्र, मानवी वस्त्यांचे नदीकाठावर वाढलेले अतिक्रमण सुरू झाल्यानंतर नद्यांचे रूप हळूहळू नाल्यांमध्ये बदलले. अतिक्रमण, प्रदूषण आणि नियोजनशून्य शहरीकरण यांमुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मिठी नदीचे उदाहरण केवळ मुंबईपुरते मर्यादित नाही, तर राज्यातील अनेक नद्यांची अवस्था आज बिकट झाली आहे. योग्य जलव्यवस्थापन, अतिक्रमणमुक्तीची कडक अंमलबजावणी, स्थानिक स्वराज्य संस्थांचा सक्रिय सहभाग आणि जनजागृती यांच्या मदतीनेच नद्यांचे पुनरुज्जीवन शक्य आहे. म्हणूनच, महाराष्ट्रातील नद्या पुनर्जीवित करणे ही काळाची खरी गरज आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत २६ जुलै २००५ रोजी आलेल्या महापुरानंतर मिठी नदीचे अस्तित्व जगासमोर प्रकर्षाने आले. पवई आणि विहार तलावातून उगम पावणारी ही नदी महापालिका हद्दीतून वाहत जाऊन अखेर अरबी समुद्रात मिळते. सुमारे १६.२ किलोमीटर लांब असलेली मिठी नदी, पावसाळ्यात मुंबईतील पाणी सामावून घेण्याचे मोठे कार्य करते. परंतु गेल्या दोन दशकांत नदीपात्रावर आणि काठावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली. झोपडपट्ट्या, औद्योगिक गाळे, गोदामे, बेकायदा बांधकामे यांनी तिचा नाला केला असून सांडपाणी आणि औद्योगिक दूषित पाणी सरळ नदीत सोडले जाते.
हे चित्र केवळ मिठीपुरते मर्यादित नाही. राज्यातील सावित्री, गोदावरी, कृष्णा, भीमा, पंचगंगा, वारणा, मुळा-मुठा, ताप्ती, वैनगंगा, पेंच, कन्हान, इंद्रायणी, उल्हास, वशिष्ठी अशा अनेक लहान-मोठ्या नद्या आज अशाच संकटात आहेत. शासनाचे दुर्लक्ष, तसेच घरातील कचरा व प्लास्टिक थेट नदीत फेकण्याची वाईट सवय आपण सगळेच बाळगत आहोत. यामुळे नद्यांचे प्रदूषण वाढत आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता, नद्यांचे पुनरुज्जीवन ही जबाबदारी केवळ सरकारची नव्हे, तर आपली सगळ्यांची आहे.
नदी हा केवळ पाण्याचा स्रोत नसून, ती एक संपूर्ण परिसंस्था आहे. जलचर, स्थलचर, पक्षी, आणि मानव यांच्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. पावसाचे पाणी साठवणे, भूजलपातळी वाढवणे, किनारी शेतीसाठी पाण्याचा पुरवठा, मत्स्य व्यवसायास चालना, पर्यटन आणि सांस्कृतिक परंपरा जपणे हे सगळे नदीशी निगडित आहे.
पण अतिक्रमण, वाळूचे अवैध उत्खनन आणि जंगलतोड यामुळे नद्यांचा नैसर्गिक प्रवाह खुंटू लागला आहे. म्हणूनच स्थानिक पातळीवर जनजागृती मोहिमा राबवणे, नदी स्वच्छता मोहिमा घेणे, प्लास्टिक व घनकचरा काढणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारणे, जैविक खतांचा वापर वाढवणे हे उपाय गरजेचे आहेत. याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करण्यास हिरवा कंदील दिला. नद्यांचा नैसर्गिक प्रवाह राखणे आणि पुनरुज्जीवन करणे यासाठी हे प्राधिकरण महत्त्वाचे ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, ही घोषणा केवळ बोलण्यापुरती न राहता थांबता प्रत्यक्षात अंमलात आणली गेली पाहिजे. अन्यथा ‘घोषणा करायची आणि अंमलबजावणी फक्त कागदावरच’ असा प्रकार नद्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ठरेल.
राज्यातील नद्या टिकून राहाव्यात यासाठी ‘नदी संवर्धन प्रकल्प’ व ‘जलसंपदा योजना’ अशा उपक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून देणे राज्य सरकारसाठी अत्यावश्यक आहे. नद्यांचे पुनरुज्जीवन ही केवळ पर्यावरणीय गरज नाही, तर आपल्या अस्तित्वाची शाश्वती देखील आहे.
पाणी हा मर्यादित स्रोत आहे आणि त्याची काळजी घेणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छ, नितळ आणि प्रदूषणमुक्त नद्या या आपल्या शाश्वत विकासाची खरी पायाभूत गरज आहेत. आज जर आपण पाऊल उचलले नाही, तर उद्या पाणी मिळवणे हीच मोठी लढाई ठरेल. म्हणूनच “नदी वाचवा, जीवन वाचवा” हा संदेश केवळ घोषणेपुरता न राहता, आचरणात यायला हवा. हे राज्य सरकारसह आपण सगळ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
वातावरणीय बदलांमुळे मागील काही वर्षांत पावसाचा स्वभाव लहरी झाला आहे. कधी प्रचंड उकाडा, तर कधी पावसातही कोरडेपणा, हे महाराष्ट्रासाठी चिंतेचे कारण आहे. पाणी हे अमूल्य आहे आणि आजची बचत हीच उद्याची गरज ठरणार आहे.
जर पावसाने पाठ फिरवली, तर ‘जलबिन मछली’प्रमाणे माणसांची अवस्था होण्यास वेळ लागणार नाही. महाराष्ट्रात जलस्रोत आधीच मर्यादित आहेत आणि नवीन जलस्रोत निर्माण करणे तात्पुरते तरी अशक्य आहे.
‘पाणी जिरवा, पाणी वाचवा’ ही केवळ घोषणा राहिल्यामुळे अंमलबजावणी कागदावरच आहे. पावसाची गरज सर्वांनाच आहे, पण वेळेत तो येत नाही किंवा अपेक्षेपेक्षा कमी पडतो. याला थोड्याफार प्रमाणात आपण सर्वच जबाबदार आहोत. म्हणून भविष्यातील पाणीटंचाईची काळजी आज घेतली पाहिजे. त्यासाठी पाण्याची बचत आणि नद्यांचे संवर्धन करणे हे आता अपरिहार्य झाले आहे.
gchitre4@gmail.com