सह्याद्रीचे वारे
अरविंद भानुशाली
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रारंभापासून ‘बेरजेचे राजकारण’ केले. गेल्या काही दिवसांत राजकीय अस्थिरतेमुळे पवारांच्या तिरक्या चालीने उबाठाच काय, काँग्रेसही घायाळ झालेली आहे.
शरद पवार हे आजही तिरकी चाल खेळून स्वपक्षीयांना व विरोधकांना घायाळ करीत आहेत. उबाठाचे प्रमुख विरोधक शिवसेना मात्र शरद पवार विरोधकांकडे जाऊन जोरबैठका घेतायेत, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या प्लॅटफॉर्मवरून भाजप सरकार पाडलेच पाहिजे अशी भाषा करणारे शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटत आहेत. एवढेच कशाला, त्यांचे खासदारही मोदींची भेट घेऊन चर्चा करीत असल्याने काँग्रेस आघाडीत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शरद पवार यांचे १९७८ सालापासूनचे राजकारण पाहिल्यास आजपर्यंत त्यांची तिरकी चाल कधी चुकली नाही. सन २०१४ च्या पूर्वी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्य बँकेची चौकशी सुरू केल्याबरोबर राष्ट्रवादीने आपला पाठिंबा काढून घेतला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. विशेष म्हणजे त्या काळात राज्यपालांकडे सर्व सूत्रे असल्याकारणाने त्याचा फायदा भाजपला मिळाला. पहिल्या फेरीत १२६ जागा भाजपने मिळविल्या, मग शरद पवार काय चाल खेळणार? भाजपला बहुमत नव्हते, शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी त्यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. पाच वर्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी राहिले. त्यावेळी त्यांचा होरा अखंड शिवसेनेला भाजपपासून तोडण्याचा होता ते त्यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले होते. पुढे २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजप हे एकत्रपणे लढले. त्यावेळी शरद पवारांना भाजपचे राज्य येऊ द्यायचे नव्हते. म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. काँग्रेसचा विरोध असतानाही ते स्वतः जाऊन दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांना भेटले आणि पुढे अडीच वर्षे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहिले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा उद्देश शरद पवारांनी बरोबर ओळखला आणि त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी बंड करून ३९ आमदारांना आपल्यासोबत सुरतमार्गे गुवाहाटी, गोवामार्गे मुंबई येथे आणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. हे करत असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले. मात्र त्यानंतर शरद पवारांनी फिरकी घेतली व अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला. त्याचा परिणाम राष्ट्रवादीची दोन शकले होण्यात झाला. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ४२ आमदारांसह महायुतीत सामील झाले. इकडे शिवसेनेचा पक्ष फुटला आणि जवळ जवळ ८० ते ८५ टक्के आमदार, खासदार हे एकनाथ शिंदेंबरोबर गेले. इकडे अजित दादांबरोबरही तेवढीच गणती झाली. हे होत असताना शरद पवार स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी मधल्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामतीमध्ये आणले. मिष्ठान्न भोजन एकवेळ नाही तर दोनवेळा दिले. तोच काँग्रेसने दिल्लीमध्ये २३ पक्षांची इंडिया आघाडी बनवली. मग पवार त्यांच्याबरोबर न जाणे हे कितपत सोयीस्कर होते? ते आघाडीत सामील झाले आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याच विरोधात शड्डू ठोकले. पवारांची विश्वासार्हता त्याचवेळी महायुतीच्या लक्षात आली आणि राज्य बँकेच्या चौकशीमध्ये शरद पवार यांचे २९ नंबरवर नाव आल्याने ईडीने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पवारांनी ईडीच्या खटल्याचा उपयोग खुबीने केला. ईडीच्या कार्यालयात जाणार असे जाहीर केले. अखेर ईडीला तो खटला मागे घ्यावा लागला.
सन २०१९च्या विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेना, भाजप युती म्हणून लढल्या. त्यावेळी भाजपला १०५ व शिवसेनेला ६२ जागा प्राप्त झाल्या. शिवसेनेने त्यावेळी तिरकी चाल खेळली. मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेलाच पाहिजे अशी भूमिका घेतली. शिवसेना-भाजप युती ही १९८९ पासून राज्यात होती; मुख्यमंत्रीपद शिवसेनेलाच मिळाले पाहिजे अशी जाहीर भूमिका घेतली. प्रारंभी शिवसेनेने आपला गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची एकमताने निवड केल्याचे जाहीर केले. तसे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले. परंतु तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ते सरकार बनविण्यास नकार दिला. शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादी आमदारांच्या सह्यांचे पत्र आवश्यक आहे, ते पत्र न मिळाल्याने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. शरद पवारांनी भाजपला शह द्यायचा म्हणून आणि शिवसेनेचे खच्चीकरण करायचे म्हणून एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. सोनिया गांधी यांचा शिवसेनेबरोबर जाण्यास विरोध होता, परंतु पवारांनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेतली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे सांगितले. पुढे शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार बनवताना एक संयुक्त करारनामा तयार करण्यात आला. त्यामध्ये शिवसेनेला हिंदुत्व सोडायला लावून सर्वधर्म समभाव हे धोरण स्वीकारायला लावले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वावर १९९५ च्या निवडणुका जिंकल्या होत्या; परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व सोडले. ही चाल शरद पवारांनी पद्धतशीरपणे अंमलात आणली. शिवसेनेमधील एका गटाने (एकनाथ शिंदे) या अडीच वर्षांनंतर विरोध केला. दरम्यान अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना कोरोना आला. ते त्या काळात मातोश्री सोडून बाहेर पडलेच नाहीत. मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, अशी प्रतिमा तयार झाली. शिवसेनेचे ३९ आमदार व १३ खासदार मुख्य शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. भाजपने ही खेळी पवारांवर उलटवावी यासाठी एकनाथ शिंदे यांना मदत केली आणि राज्यात काँग्रेस व शिवसेनेच्या नाकावर टिच्चून शिंदे यांना मुख्यमंत्री केले. हा इतिहास यासाठी सांगायचा की ही शिवसेनेच्या विघटनाची दुसरी पायरी होती. पुढे अजित पवार या मंडळींना सत्तेशिवाय राहणे असह्य वाटू लागले. त्यांनी शरद पवारांना आव्हान देऊन पक्ष फोडला आणि ते महायुतीमध्ये सामील झाले. शरद पवार स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी अत्यंत धूर्तपणे पुढची खेळी खेळली. सन २०२४ मध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत महायुतीचे पानिपत झाले आणि पुढे राष्ट्रवादी शप, काँग्रेस हे एकत्र येऊन विधानसभेची निवडणूक लढले. मात्र त्यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला.
साधारणपणे राजकीय पक्षातून बंड करून निवडणूक लढवणारे कधीच यशस्वी होत नसतात हे छगन भुजबळ यांच्या निवडणुकीने स्पष्ट झाले होते. छगन भुजबळ यांचा एका साध्या शिवसैनिकाने पराभव केला. भुजबळ यांनी आपला मुंबईतील बोऱ्याबिस्तरा हलवून नाशिक जिल्ह्यात ठाण मांडले आणि येवल्यामधून निवडणूक लढवून विधानसभेत आले.
एकूण शरद पवार यांची खेळी पाहा कशी होती. १९७८ मध्ये वसंतदादा यांचे सरकार पाडले आणि काँग्रेस, शिवसेना, जनसंघ, समाजवादी, शेकाप व डाव्या कम्युनिस्टांसह आघाडी करून पुलोद स्थापन केले. पुढे सोनिया गांधी या परदेशी म्हणून ते काँग्रेसमधून १९९९ मध्ये बाहेर पडले. त्याच काँग्रेसबरोबर पवारांनी युती करून काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार बनवले. तरुण रस्त्यावर उतरल्यावर स्वतः जंतरमंतरवर अभिजीत दीपके व सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आवाज उठवला आणि आठ दिवस होत नाहीत तोच पवारांचे एकेक भिडू मोदी यांना भेटू लागले. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याकरिता पवार सतत अशा तिरक्या चाली करून गोंधळाचे वातावरण निर्माण करतात व स्वार्थ साधतात. उबाठा व काँग्रेस हे मात्र तोंडघशी पडतात.