भ्रम -विभ्रम
डॉ. अस्मिता बालगावकर
गतिमंद किंवा मनोरुग्ण अशा व्यक्तींच्या अंगात अद्भुत शक्ती आहे, दैवी संचार आहे, ते विदेही अवलिया आहेत, असे म्हणण्याची पद्धत आहे. अशा दिव्यांग लोकांचे नातेवाईक किंवा सोबतचे लोक त्यांचा वापर करून भोंदूगिरीचा व्यवसाय सुरू करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात पूज्य भाव उत्पन्न होतो.
भोंदू बाबा-बुवा यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण करावयाचे झाल्यास यामध्ये प्रामुख्याने दोन टोके दिसून येतात. एक तर हे लोक अत्यंत धूर्त, चतुर व विज्ञान तंत्रज्ञान अभिनय वक्तृत्व यात पारंगत असतात. परंतु त्याचा दुरुपयोग करून लोकांना फसवणारे असतात. अन्यथा दुसऱ्या टोकाचे लोक गतिमंद किंवा मनोरुग्ण असतात. अशा दिव्यांग लोकांचे नातेवाईक किंवा सोबतचे लोक त्यांचा वापर करून भोंदूगिरीचा व्यवसाय सुरू करतात. जी व्यक्ती मनोरुग्ण आहे किंवा गतिमंद आहे, अशा व्यक्तीला अनेकदा त्यांचे असे स्वतःचे मत नसते. त्यांना मुळातच सभोवताली काय चालले आहे याचे भानच नसते. त्यामुळे त्यांचा कोणीतरी वापर करून घेत आहे हेही त्यांना समजत नाही. अशा व्यक्ती अनेकदा स्वतःची शारीरिक स्वच्छता सुद्धा नीट ठेवू शकत नाहीत. सामाजिक नियम यांची जाण सुद्धा त्यांना नसते.
मात्र पारंपरिक भारतीय समाजात अशा व्यक्तींच्या अंगात अद्भुत शक्ती आहे, दैवी संचार आहे, ते विदेही अवलिया आहेत, असे म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात पूज्य भाव उत्पन्न होतो. याचा वापर करून अशा दिव्यांग व्यक्तीला बाबा, बुवा वा माता बनविले जाते. अशा व्यक्तीच्या पाया पडणे, पूजणे सुरू होते. हळूहळू त्या व्यक्तीसमोर दक्षिणा, नारळ, हार, फुले ठेवली जातात. त्यांना एक हात वर करून आशीर्वाद द्यायला शिकवले जाते. कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावर पाय ठेवूनही आशीर्वाद द्यायला शिकवले जाते.
अशा दिव्यांग व्यक्तींचा वापर करून काही लोक बुवाबाजीचा धंदा सुरू करतात. यात मग त्या व्यक्तीचे नातेवाईक सुद्धा असू शकतात किंवा इतर लोकही असा फायदा उचलण्यासाठी त्या व्यक्तीला जवळ करतात. त्यांचा हेतू या दिव्यांग व्यक्तीचा वापर करून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेणे हाच असतो. स्वतःच्या तुंबड्या भरण्याची एक मोठी यंत्रणाच ही हितसंबंधी टोळी तयार करीत असते. अशा बाबांना ते मनोरुग्ण असले, तरी ते मनोरुग्ण आहेत, असे म्हणणे हा फार मोठा श्रद्धेवरचा आघात आहे, असा कांगावा केला जातो.
परमेश्वर अवतार घेतो, अशी हिंदू धर्मात कल्पना आहे. बुवाबाजीला लोकमान्यता मिळवून देण्यासाठी या कल्पनेचा आधार भोंदूगिरीत केला जातो. अनेकदा नीट निरीक्षण केले असता असे दिसून येते की, अशा बाबाच्या चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत असंबद्ध असतात. त्यांच्या शारीरिक हालचाली सुद्धा अत्यंत विकृत असतात. जसे की, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेली व्यक्ती काही शारीरिक हालचालींची वारंवार पुनरावृत्ती करते. हात विशिष्ट पद्धतीने हलवणे किंवा अंग हलवणे, काही विचित्र हालचाली करणे, झुलणे, एकाच ठिकाणी टक लावून पाहणे इ. असंख्य लक्षणे या भोंदू बाबांमध्येही दिसून येतात. मनोविकारतज्ज्ञ किंवा मानसोपचार तज्ज्ञ व्यक्तींना हे निरीक्षणाने लगेच कळून येते. सर्वसामान्य माणसांना सुद्धा पाहिल्यावर खरे पाहता हे समजते. परंतु दिव्य व्यक्ती अशाच असतात, त्यांचे देवाशी संभाषण चालू असते, म्हणून त्या तशा वागतात, अशी समजूत काढून त्यांच्या दैवी शक्तीवर काही लोक विश्वास ठेवतात.
आपल्या देशात अशा अनेक दिव्यांग लोकांना बाबा बनवून अनेक दुकाने, धंदे थाटले गेले आहेत. या दिव्यांग व्यक्ती नीट संभाषण सुद्धा करू शकत नाहीत. काहीही बडबड करीत असतात. ती बडबड अनेकदा अर्थहीन असते. परंतु अशा वेळी ते देवाशी बोलत आहेत, असा अर्थ काढला जातो किंवा ते जे काही वारंवार बडबड करतात, त्याचा ओढूनताणून काहीतरी विपर्यास करून अर्थ काढला जातो आणि भक्तांना तो त्यांचा दिव्य संदेश आहे, असे सांगितले जाते.
असे बुवा, बाबा, माता या त्यांच्या दरबारात काहीही करत असतात. एक बाबा सापासारखी जीभ हलवून फूस-फूस आवाज काढून शरीरसुद्धा सापाप्रमाणे डोलवत असे. अशी एक माता होती जी एकाच वेळी अनेक विडी घेऊन धूम्रपान करत भक्तांना आशीर्वाद द्यायची. एक बाबा झाडपाल्याने समोरच्याला जोरजोरात मारायचा आणि लोक ते सर्व आशीर्वाद समजून घ्यायचे. त्यामुळे जे लोक सारासार विचार, तार्किकदृष्ट्या काहीही विचार न करता अंधपणे समोरच्याचे ऐकतात ते अशा मनोविकृत भोंदू बाबांच्या आहारी जातात.
दिव्यांग व्यक्तींना योग्य उपचार पुनर्वसन यांची नितांत गरज असते. त्यामुळे अशा व्यक्तींचा कोणी भोंदूगिरीत वापर करीत असेल, तर ते अत्यंत अमानवी आणि चुकीचे आहे. दिव्यांग मुलांच्या संस्थांमध्ये अन्नदान करून, आर्थिक सहाय्य करून, त्यांना सहकार्य सत्कर्म करणे जास्त विवेकी ठरेल. म्हणून लोकांनी अशा दिव्यांग व्यक्तीचा वापर जर कोणी भोंदूगिरीत करीत असेल, तर त्यांची तक्रार करून त्या दिव्यांग व्यक्तीची सुटका केली पाहिजे.
खरे पाहता मनोविकृत लोकांमध्ये दिव्य शक्ती असते, असा समज करूनच त्यांना दिव्यांग असे संबोधले गेले. २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग शब्द न वापरता दिव्यांग असा शब्द रूढ केला. परंतु युनायटेड नेशन्स कमिटी ऑन द राइट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीजने ‘दिव्यांगजन’ हा शब्द विवादास्पद आणि ‘मानसिकदृष्ट्या आजारी’सारख्या अपमानजनक शब्दांप्रमाणेच असल्या कारणाने त्यावर आक्षेप घेतला. काही अपंगत्व अधिकार कार्यकर्त्यांनी हा शब्द निंदनीय आणि अपमानास्पद असल्याची टीका केली आहे.
मानसिक विकलांग व्यक्तीला अलौकिकता बहाल करून फसवणूक करणे हे ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३’ अंतर्गत कायदेशीर गुन्हा आहे. एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये अमानवी शक्ती असल्याचे भासवून त्याद्वारे अन्य व्यक्तींची लुबाडणूक करणे हे या कायद्यानुसार गुन्हेगारी वर्तन ठरते. सदर कायद्याबद्दल जागरूकता येणे अत्यंत गरजेचे असून, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या विषयावर अनेक ठिकाणी कार्यक्रम घेऊन, पुस्तिका काढून, व्याख्याने देऊन प्रबोधन करीत असते.
स्वतःचे प्रश्न काय आहेत, ते कसे सोडवायचे, ते कुठेपर्यंत सुटू शकतात याचे भान आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद याचा वापर करून येते. संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तीच्या सहाय्यानेच समस्या सोडविणे गरजेचे असते. तरच समाज बुवाबाजीपासून दूर राहू शकेल. साडेतीनशे वर्षांपूर्वी तुकोबांनी परखडपणे लिहिले आहे.
ऐसे कैसे झाले भोंदू,
कर्म करोनी म्हणती साधू
अंगा लावूनिया राख,
डोळे झाकुनी करती पाप
दावून वैराग्याची कळा,
भोगी विषयाचा सोहळा
तुका म्हणे सांगू किती,
जळो तयांची संगती।
लेखिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या आहेत.