मत आमचेही
केशव उपाध्ये
आपण राजकारणातील कच्चे लिंबू असल्याचा दावा उद्धव ठाकरे करीत असले तरी वास्तव तसे नाही. त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेतल्यावर महाभारतातील खलनायक म्हणून ओळखली जाणारी पात्रे डोळ्यासमोर येतात.
उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपताना भाषणाद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. या भाषणाची सांगता उद्धव ठाकरेंनी सुरेश भट यांच्या कवितेने केली. या कवितेतून त्यांनी आपल्याला राजकारणातील गणिते कळली नाहीत, आपल्याला राजकारणातील छक्के-पंजे कळत नसल्याने अनेकांनी आपला छळ केला, अशा पद्धतीचा सूर लावला. उद्धव ठाकरे हे टोमणे सम्राट आहेत, कोणालाही न कळणारे विनोद करण्यात त्यांचा हातखंडा आहे, हे माहीत होते. मात्र ते स्वत:ला राजकारणातले कच्चा लिंबू समजतात, हे ठाऊक नव्हते. आपण राजकारणात फारच कच्चे असल्याचा आव आणत उबाठांनी आपला आणखी एक नवा चेहरा दाखवला आहे. आपण राजकारणात कच्चे आहोत या म्हणण्यावर आपल्या कुटुंबातील मंडळीही विश्वास ठेवणार नाहीत, हे ठाऊक असूनही उद्धव ठाकरेंनी स्वत:ला निष्पाप, निरागस संबोधण्याचा अट्टाहास का करावा, हा संशोधनाचा विषय आहे. संसद, विधीमंडळ सदस्यत्वाची मुदत संपल्यावर होणाऱ्या निरोप समारंभात काय बोलायचे याचे अलिखित संकेत आहेत. निरोपाच्या भाषणात आरोप-प्रत्यारोप, कटुता असू नये हा सर्वसाधारण शिष्टाचारही उबाठांना पाळता आला नाही. असो. मुद्दा होता तो 'उबाठां' च्या राजकारणातील वर्तनाचा. उद्धव ठाकरेंच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेतल्यावर महाभारतातील खलनायक अशी ओळख असलेली अनेक पात्रे डोळ्यासमोर येतात. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा तेजस्वी, प्रखर राष्ट्रवादी आणि कसलीही लपवा-छपवी, दगाबाजी न करणाऱ्या नेत्याचा आदर्श खरे तर उद्धव ठाकरे यांनी आचरणात आणायला हवा होता.
मुळात त्यांचा राजकारणातील प्रवेश ते राजकारणात किती कसलेले आहेत, हे दर्शवणारा होता. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे निष्ठावंत शिलेदार शिवसेनेच्या उभारणीसाठी संघर्ष करीत असताना या वाटचालीत पुतण्या राज ठाकरे याच्या विद्यार्थी सेनेतील योगदानाची त्यांना साथ लाभली. १९९० व १९९५ या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा झंझावात निर्माण केला. भाजपा आणि शिवसेना युतीत हिंदुत्व हा महत्वाचा वैचारिक धागा होता. १९८९ मध्ये भाजपा-शिवसेना युती झाली. १९८९ पासून वंदनीय बाळासाहेब हयात असेपर्यंत म्हणजे २०१२ पर्यंत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात निवडणुकीतील जागावाटपासह अनेक मुद्यांवर मतभेद झाले होते. मात्र हे मतभेद तुटेपर्यंत ताणायचे नाहीत याची जाणीव बाळासाहेब ठाकरे यांनी आणि भाजपाच्या त्यावेळच्या नेतृत्वाने नेहमीच ठेवली. १९९२ ची मुंबई महापालिका निवडणूक वगळता भाजपा-शिवसेनेने २०१२ पर्यंतच्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका युती म्हणून एकत्रित लढल्या.२००७ आणि २०१२ या वर्षी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत वंदनीय बाळासाहेबांनी भारतीय जनता पार्टीपेक्षा वेगळी भूमिका घेत काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ही वेगळी भूमिका घेताना बाळासाहेबांनी भाजपा नेतृत्वाला विश्वासात घेतले होते.
देशाच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक काळ टिकेलेली युती म्हणून भाजपा-शिवसेना युतीची नोंद होईल. बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात कधीच दगाबाजी केली नाही. भाजपा नेतृत्वाबरोबरचे मतभेद त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवले. सत्तेसाठी आपल्या तत्वांना आणि विचारांना कधीच तिलांजली न देणाऱ्या बाळासाहेबांना राजकारणातील गणिते ठाऊक होती. त्यामुळेच सहकारी पक्षाबरोबरचे मतभेद एका मर्यादेपर्यंत न ताणण्याचा धोरणीपणा बाळासाहेबांनी अनेकदा दाखवला. १९९८ ते २००४ या काळात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला अधिकचा वाटा मिळावा, यासाठी कधीच हट्ट केला नाही. आक्रमक परंतु तितकेच परिपक्व राजकारण बाळासाहेबांनी केले.
शिवसेना भाजपाच्या साथीने १९९५ मध्ये सत्तेत येईपर्यंत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या घडामोडींपासून लांब होते. युती सत्तेत आल्यानंतर उद्धवरावांचा राजकारणातील रस वाढला. सत्तेचे मायावी जाळे किती प्रभावी असते हे पाहिल्यावर त्यांनी संपूर्ण पक्ष ताब्यात घेण्यासाठी पद्धतशीर पावले टाकली. तोपर्यंत राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे राजकीय वारसदार समजले जात होते. त्यांना बाजूला करत पक्ष आपल्या ताब्यात घेईपर्यंत उद्धव ठाकरेंनी केलेले दरबारी राजकारण शिवसेनेतील अनेक बुजुर्ग नेत्यांना अजूनही आठवत असेल. राज व उद्धव ठाकरे हे वेळप्रसंगी राजकारण सोडतील. परंतु नात्यांमध्ये वितुष्ट येऊ देणार नाही, असा बाळासाहेबांना विश्वास वाटत होता. मात्र उद्धव यांनी बाळासाहेबांच्या त्या विश्वासाला तडा जाणारे वर्तन केले.
शिवसेनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करवून घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विश्वासू आणि वजनदार नेत्यांचा पत्ता कट करण्यासाठी खेळ्या केल्या. या राजकारणाला वैतागून नारायण राणे यांच्या सारखा कडवट शिवसैनिक पक्षातून बाहेर पडला. शिवसेनेची सूत्रे हाती घेतल्यावर भाजपा नेतृत्वाबरोबरचा समन्वयही उद्धव ठाकरेंनी संपवून टाकला. राजकारणात चार पावले पुढे टाकताना दोन पावले मागे येण्याची तयारी ठेवावी लागते, याचे वंदनीय बाळासाहेबांना भान होते. उद्धव ठाकरेंनी ते ठेवले नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा नेतृत्वाने पूर्वीच्या सूत्रापेक्षा २५ अधिकच्या जागांची मागणी केल्यावर उद्धव ठाकरेंनी कमालीची ताठर भूमिका घेतली. या ताठर भूमिकेमुळे २५ वर्षांची भाजपा-शिवसेना तुटली.
विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढताना २०१४ मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपा नेतृत्वावर टीका करताना भाषेचे तारतम्य बाळगले नाही. त्यावेळी केंद्रातील मोदी सरकारमध्ये शिवसेनेचाही सहभाग होता. एकीकडे केंद्रातील सत्ता भोगत असताना सत्तेतील मुख्य भागीदारावरच टीकास्त्र सोडण्याचा अजब प्रकार उद्धव ठाकरेंमुळे अनुभवता आला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने सरकार स्थापन केल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही कडवी विरोधाची भूमिका घेत शिवसेना-भाजपा मनोमिलनाच्या सर्व शक्यता उद्धव ठाकरेंनी बंद केल्या. त्याही प्रसंगात भाजपा नेतृत्वाने मनाचा मोठेपणा दाखवत शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्यासाठी पुढाकार घेतला.
केंद्र आणि राज्यातली सत्ता उपभोगत असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोदी सरकार आणि भाजपाला विरोध करणे चालूच ठेवले. त्यातून तयार होणाऱ्या विरोधाभासाची पर्वा उद्धव ठाकरेंनी केली नाही. त्या पुढची पायरी उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये गाठली.
मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाबरोबरची निवडणूक पूर्व युती तोडत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी समझोता केला. त्यासाठी भाजपा नेतृत्वाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते, असा कांगावा केला. सत्ता व मुख्यमंत्रीपदाकरिता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या तडजोडी पाहता त्यांना वैचारिकतेपेक्षा, सत्ता व पद महत्वाचे वाटत आले हेच सिद्ध होते. सत्ता व पदाकरिता ते टोकाला जाऊ शकतात, हेच सिद्ध झाले आहे.
उद्धव ठाकरेंनी कविवर्य सुरेश भट यांच्या ज्या काव्यपंक्तीचा आधार घेतला त्याच काव्यपंक्तीचा वापर करीत उद्धव ठाकरेंच्या राजकीय प्रवासाचे, “मित्र कोण, शत्रू कोण, गणित साधे कळले नाही, नाही राहिला असा कोणी, ज्याला मी छळले नाही, असे वर्णन करता येईल.” यामुळेच ५० हून अधिक आमदार आणि खासदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले. आपले सहकारी आपल्याला का सोडून गेले व आपले संख्याबळ का घटले, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे. मात्र ते तसे करणार नाहीत.
प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा