संग्रहित छायाचित्र 
संपादकीय

हाची नेम आता न फिरे माघारी

नवशक्ती Web Desk

- मत आमचेही

ॲड. हर्षल प्रधान

राजकारणात पूर्ण वेळ कोणी शत्रू किंवा मित्र नसतो असे म्हणतात. मात्र शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी थेट घोषणा करून पुन्हा भाजप वा एनडीएसोबत जाणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. उपस्थित पदाधिकारी आणि जनतेच्या समोर त्यांनी भाजपसोबत जायचे की नाही असा प्रश्न उपस्थित केला आणि उबाठा शिवसैनिकांकडून ‘नाही’ असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी ‘हाची नेम आता, न फिरे माघारी’ असा निर्धार जाहीर करून टाकला. उद्धव ठाकरे यांनी असे का म्हटले, ते मोदी-शहा यांच्या भाजपवर एवढे का नाराज झाले आहेत, हे गेल्या पाच-दहा वर्षांतील घटनांची उजळणी केली तर सहज लक्षात येईल.

उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे हिंदुत्वासाठी देशभरातील भाजपच्या नेत्यांसोबत कायम चांगले संबंध जोपासले. २०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तोपर्यंत उद्धव ठाकरे भाजपच्या खांद्याला खांदा लावून मोदींना पंतप्रधान करण्यासाठी झटत होते. मात्र मोदींना २०१४ मध्ये बहुमत मिळाले आणि भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेतृत्वात अचानक बदल जाणवू लागले. गोपीनाथ मुंडे यांचे अकस्मात निधन झाले. नितीन गडकरी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली, मनोहर पर्रिकर असे एकापेक्षा एक ठाकरे यांचे समवयस्क आणि जवळचे संबंध असणारे नेते भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातून हळूहळू धुसर होऊ लागले. नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर तर पकड घेतली होतीच, पण त्याचपाठोपाठ अमित शहा यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करून त्यांनी पक्षावरही मजबूत पकड घ्यायला सुरुवात केली आणि एनडीएमधील एक एक पक्ष हळूहळू दुरावत गेले.

२०१४ पूर्वीची भाजपप्रणित एनडीए

काँग्रेसला सत्तामुक्त करायचे आणि देश आपल्या हाती घेऊन तो भ्रष्टाचारमुक्त करायचा आणि देशाला उज्ज्वल भवितव्याकडे न्यायचे या एकाच ध्येयाने पछाडलेला एनडीए तेव्हा पूर्णपणे वेगळा होता. त्यात भाजप आणि सहयोगी पक्षांच्या युतीचा इतिहास बघता शिवसेना व अकाली दल वगळता इतर सर्व पक्ष भाजपची केंद्रातली सत्ता गेल्यावर भाजपला सोडून गेले. शिवसेना भाजपसोबत सत्ता नसतानाही राज्यात, केंद्रात सोबत होती. याउलट भाजपचा इतिहास तपासणे गरजेचे आहे. भाजपप्रणित ‘एनडीए’तून २००२ ते २०१४ या १२ वर्षांच्या काळात काही मतभेदांमुळे १४ पक्ष बाहेर पडले. जम्मू-कश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (२००२), समता पार्टी (२००३), द्रमुक (२००४), हरयाणा विकास पार्टी (२००४), इंडियन फेडरल डेमॉक्रॅटिक पार्टी (२००४), तृणमूल काँग्रेस (२००७), जनता दल सेक्युलर (२००७), इंडियन लोकदल (२००९), बिजू जनता दल (२००९), तेलंगणा राष्ट्र समिती (२००९), कामतापूर प्रोग्रेसिव्ह पार्टी - बंगाल (२०१०), उत्तराखंड क्रांती दल (२०१२), राष्ट्रीय लोक दल (२०१२), झारखंड मुक्ती मोर्चा (२०१२ ) अशी त्यांची नावे. मात्र २०१४ च्या नंतर हरयाणा जनहित काँग्रेस (२०१४ ), एमडीएमके (२०१४), रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी केरळ (२०१६), स्वाभिमानी पक्ष (२०१७), जम्मू-कश्मीर पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (२०१८), राष्ट्रीय लोक समता पार्टी (२०१८), तेलुगू देसम (२०१८), गोरखा जनमुक्ती मोर्चा बंगाल (२०१९), प्रवासी निवासी पार्टी केरळ (२०१९), शिवसेना (२०१९), शिरोमणी अकाली दल (२०२०), राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष राजस्थान (२०२०), बोडोलँड पीपल्स फ्रंट (२०२१), डीएमडीके (२०२१), गोवा फॉरवर्ड पार्टी (२०२१), महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (२०२१), लोक इन्साफ पार्टी (२०२२) असे १७ पक्ष अवघ्या आठ वर्षांत भाजपची साथ सोडते झाले.

भाजपची मित्रांबाबत अयोग्य धोरणे

२०१९ मध्ये शिवसेनेला शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत निवडणुकीनंतर सत्तेत समसमान वाटा देण्याचे आश्वासन देण्यात आले. शिवसेना आणि अकाली दल जुने सहकारी असूनही पाठीत वार केले. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पाडली, चिन्ह गोठवले. अकाली दल १९९८ ते २०२० दरम्यान भाजपबरोबर एनडीएचा भाग होता. कृषी कायद्यांविरोधात अकाली दल बाहेर पडला. भाजपसोबत जे जे गेले त्यांना संपवण्याचा कार्यक्रम भाजपने राबवला. गरज सरो वैद्य मरो, हेच या नव्या भाजपचे राजकारण आहे. आजपर्यंत भाजपसोबत युती केलेले पक्ष पाहा आणि आठवा ते सध्या कुठे आहेत. गोव्यात म. गो. पक्षाशी युती, काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती, मायावतींच्या पक्षाशी युती, ममता बॅनर्जींशी युती, नितीशकुमार यांच्याशी युती, हरयाणात बिश्नोई यांच्याशी युती, कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांची फसवणूक करणारी युती, पासवान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाची फसवणूक करणारी युती यांचे पुढे काय झाले? बाळासाहेब असेपर्यंत अतिशय गोड वागणारे भाजपचे नेते बाळासाहेब कैलासवासी झाल्यावर मात्र एकदम पलटले आणि शिवसेना संपवा आणि महाराष्ट्र काबीज करा, या हेतूने झपाटले आणि त्यातूनच पुढील कारवाया झाल्या. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युती केली, मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तोडली. त्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी एकट्याच्या जीवावर ६३ आमदार निवडून आणले, तेव्हा भाजपला जाणवले की महाराष्ट्रात जनता उद्धव ठाकरे यांनाच महत्त्व देत आहे. कदाचित तेव्हाच उद्धव ठाकरे यांचे महत्त्व कमी करण्याचा हा डाव आखला गेला. भाजपने उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांना नामोहरम करण्याची एकही संधी सोडली नाही.

नकली संतान म्हटले आणि सगळे संपले

निवडणुकीच्या राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण त्यातही एक पातळी अपेक्षित असते. मात्र नरेंद्र मोदी जाहीर भाषणात उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक अतिशय वेदनादायी वाक्य बोलले. ‘बाळासाहेब की नकली संतान’ असे ते वाक्य होते. या एका वाक्याने समेटाच्या सर्व शक्यता समाप्त झाल्या आणि उद्धव ठाकरे आता कधीच भाजपसोबत जाणार नाहीत, यावर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांनीही चांगलाच समाचार घेतला. ते पंतप्रधान मोदींना ‘बेअकली’ म्हणाले.

मोदी आणि शहांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडले

शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या भविष्याबाबत भूमिका स्पष्ट करताना ‘आता पुन्हा कधीही भाजपसोबत जाणे नाही’ हे स्पष्ट केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आमच्यावर आरोप केला जातो. शिवसेनेला मराठी मते पडली नाहीत. हिंदू मते पडली नाहीत. मुस्लिम मते पडली. हो पडलीत. सर्व देशभक्तांची मते शिवसेनेला पडली आहेत. त्यात मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध सारेच आले. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असे म्हणतात, का तर आम्ही काँग्रेससोबत गेलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मते दिली. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आहे. तुम्ही २०१४, २०१९ चा एनडीएचा फोटो पाहा आणि २०२४ चा पाहा. आज त्यांच्यासोबत जे चंद्राबाबू आणि नितीश कुमार बसलेत, ते हिंदुत्ववादी आहेत का? चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात मुस्लिम समाजाला आश्वासने दिलीच आहेत. आमच्याकडे चोरीमारी नाही आहे. मुस्लिम समाजाला माहिती आहे की, आम्ही वार केले तर समोरून करू, यांच्यासारखे पाठीमागून नाही.’

तुम्ही भगव्यामध्ये भेद केला

ठाकरे पुढे म्हणाले की, ‘मी नम्र आहे. तुम्ही प्रेमाने वागा, आम्हीही प्रेमाने वागू. पण तुम्ही पाठीत वार कराल, तर आम्ही वाघनखं काढू. गद्दार मानसिकतेचे तुम्ही. भगव्याशी गद्दारी करणारे तुम्ही. भगव्याशी बेईमानी करणारी औलाद तुमची. छत्रपतींच्या भगव्यावर कोणतेही चिन्ह नव्हते, पण तुम्ही भगव्यामध्ये भेद केला. याचे चिन्ह छापा, त्याचे चिन्ह छापा. म्हणून आपल्या भगव्या झेंड्यावर आपले चिन्ह टाकायचे नाही. आपला भगवा शिवरायांचा पवित्र भगवा आहे. तो भगवाच असला पाहिजे. मशालीचा प्रचार वेगळा करा. छत्रपतींच्या भगव्याला त्यांनी जो कलंक लावलाय, त्याला आपल्याला गाढायचे आहे. म्हणून भगव्यावर कोणतेही चिन्ह टाकू नका.’ आता भविष्यात ही लढाई भाजप विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी अधिक टोकदार होईल आणि भाजपच्या सोबत असणारे सर्व उद्धव ठाकरे विरोधक आणि ‘एक अकेला सबपे भारी’ ठरणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे निष्ठावंत शिवसैनिक अशी रंगतदार लढत येत्या विधानसभेत पाहायला मिळेल. (लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.)

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन