मत आमचेही
केशव उपाध्ये
गेल्या साडेसहा वर्षांत उबाठाने आपण केलेल्या राजकारणाचा ताळेबंद मांडण्याचा प्रयत्न केला तर जमा बाजूला मोठ्या शून्याशिवाय काहीच दिसणार नाही. साहजिकच त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे आहे.
मुंबईच्या महापौरपदी भारतीय जनता पक्ष- महायुतीच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांनी अलीकडेच आपल्या पदांचा कार्यभार स्वीकारला. मुंबईवर भाजप-महायुतीचा भगवा मोठ्या डौलाने फडकला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातीने उपस्थित होते. ४४ वर्षांनी मुंबईचे महापौरपद भारतीय जनता पक्षाला मिळाले आहे. १९८२ मध्ये डॉ. प्रभाकर पै हे भाजपतर्फे महापौरपदी निवडून आले होते. रितू तावडे यांच्या निवडीने भारतीय जनता पक्षाची, ‘मुंबईचा महापौर हिंदूच होईल आणि मराठी व्यक्तीच होईल,’ ही घोषणा प्रत्यक्षात आली आहे. मुंबईच्या महापौर-उपमहापौर निवडीनंतर दुसऱ्याच दिवशी परभणीच्या महापौरपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत उबाठाचे सलीम जाफर हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले. १९९० च्या दशकात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात, ‘खान हवा की बाण हवा’, असे वक्तव्य केले होते. वंदनीय बाळासाहेबांचे हे उद्गार संपूर्ण मराठवाड्यात परिणामकारक ठरले. संभाजीनगर, परभणी, हिंगोली अशा लोकसभेच्या जागांवर शिवसेनेला सातत्याने विजय मिळाला. त्याच परभणीत उबाठांनी खान महापौर करावा, याला काय म्हणावे?
मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी आपली होती नव्हती तेवढी पुण्याई पणाला लावली होती. विधानसभा निवडणुकीत दणकून पराभूत झालेल्या उबाठांना मुंबई महापालिकेचाच आधार उरला होता. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेल्या प्रसारमाध्यमातील, समाजकारणातील प्रभावशाली मंडळींनी उबाठांना ही निवडणूक जिंकावी, यासाठी देव पाण्यात घातले होते. वेगवेगळ्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अत्यंत विखारी प्रचार केला गेला. तरीही भाजप-महायुतीने मुंबई महापालिका निवडणूक जिंकलीच. अनेक महापालिकांमध्ये उबाठांना आपले खातेही उघडता आलेले नाही. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये उबाठांना ५० जागाही जिंकता आलेल्या नाहीत. २०२२ मध्ये मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर व २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही मुंबई महापालिका आपलीच आहे, या भरवशावर उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिलेदार होते. कोणत्याही परिस्थितीत मुंबई जिंकायचीच या ईर्षेने उबाठांनी राज ठाकरेंशीही हातमिळवणी केली. त्याही पुढे जाऊन कट्टर मुस्लिम संघटनांना मुस्लिम महापौर करण्याचे आश्वासनही देऊन टाकले. न्यूयॉर्कच्या महापौरपदी मुस्लिम व्यक्तीची निवड झाल्यानंतर भारतविरोधी शक्तींना प्रचंड आनंद झाला होता. भारतातील हिंदू-मुस्लिम धर्मीयांमध्ये आणखी फूट पाडून धार्मिक अशांतता निर्माण करण्याच्या देशविरोधी शक्तींच्या हालचालींना मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गती आली होती. मुंबई भाजप अध्यक्ष आ. अमित साटम यांनी भाजप-महायुतीला बहुमत मिळाल्यास हिंदू-मराठी व्यक्तीच महापौर होईल, असे जाहीर केले होते. उद्धव ठाकरेंनीही असे आश्वासन द्यावे, असे आव्हान आ. साटम यांनी दिले होते. मात्र उबाठांनी व संजय राऊतांनी हे आव्हान स्वीकारले नाही. उबाठाला बहुमत मिळाल्यास हिंदू व्यक्ती महापौर होईल, मुस्लिम होणार नाही, असे जाहीरपणे सांगण्याचे धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवले नाही. मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी उबाठांनी ठेवली होती, हे यातून दिसले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उबाठा आणि काँग्रेसला व्होट जिहादमुळेच भाजप-महायुतीपेक्षा अधिक जागा मिळाल्या. उबाठांना व्होट जिहादच्या प्रयोगामुळेच महापालिका निवडणुकीतही मुंबईत यश मिळवण्याची स्वप्ने पडत होती. आपल्या वडिलांनी म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या मुस्लिम लांगूलचालनाच्या राजकारणाविरोधात सातत्याने प्रहार केले, याचा विसर उद्धव ठाकरेंना पडला होता. काँग्रेस आणि शरद पवारांच्या मदतीने उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळवले, पण त्या बदल्यात उद्धव ठाकरेंनी आपले प्रचंड नुकसान करून घेतले. अर्थात उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य व महाविद्वान सल्लागार संजय राऊत यांना आपण काय चूक केली हे कळणार नाही.
भाजपच्या साथीत २०१९ मध्ये निवडणूक लढवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मतांचा जोगवा मागून उबाठा आणि संजय राऊतांनी भाजपचा नव्हे, तर मतदारांचाही विश्वासघात केला. निकाल लागल्यानंतर भाजप नेतृत्वाशी संपर्क तोडून टाकला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते, असे धादांत खोटे सांगत उद्धव ठाकरेंनी आपल्या विश्वासघाताचे समर्थन करण्याचा लंगडा प्रयत्न केला. या विश्वासघाताची मोठी किंमत उद्धव ठाकरेंना मोजावी लागत आहे. मुंबईतला मराठी मतदार आपल्याशिवाय कोठे जात नाही, या भ्रमात वावरणाऱ्या उद्धव ठाकरेंना मतदारांनी जागेवर आणले. मराठी मतदारांना भावनिक आवाहन केले गेले, भाजपचा महापौर झाल्यास तुम्हाला मुंबईबाहेर काढले जाईल, अशी भीती दाखवली गेली. तरीही मुंबईच्या मतदारांनी उद्धव ठाकरेंना सत्ता दिली नाही. मुंबईचा मतदार महायुती सरकारने मुंबईत केलेल्या रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो यासारख्या सुविधांमुळे होणाऱ्या फायद्यांचा अनुभव घेत आहे. यामुळेच मुंबईकरांनी भाजप-महायुतीला आपला कौल दिला. परभणी व्यतिरिक्त एकही महापौरपद उबाठांच्या वाटणीला आले नाही. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मागे काँग्रेस तसेच देशातील सर्व शहरी नक्षलवादी गटांनी आपली ताकद उभी केली. मात्र त्याचा उबाठांना उपयोग झाला नाही. कारण बहुसंख्य मतदार उबाठांपासून दूर गेले.
आणखी काही महिन्यांनी विधान परिषद निवडणूक होणार आहे. २०२० मध्ये उद्धव ठाकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले होते. आता उबाठांकडे फक्त २० आमदार शिल्लक आहेत. एवढ्या आमदारांच्या बळांवर त्यांना पुन्हा विधान परिषदेत जाता येणार नाही. अर्थात तेथे जाऊन उबाठा फार मोठे दिवे लावणार आहेत, असेही नाही. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या कामकाजात अपवादानेच सहभागी झाले. मुंबईचे महापौरपद ही आपली मक्तेदारीच आहे, अशा गुर्मीत वावरणाऱ्या उबाठांना मतदारांनी सणसणीत चपराक दिली. विश्वासघाताचे राजकारण फार काळ चालत नाही आणि त्याचे फायदे काही काळ टिकतात. याचा अनुभव उद्धव ठाकरे सध्या घेत आहेत. यातून ते काही शिकतील, अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. गेल्या साडेसहा वर्षांत उबाठांनी आपण केलेल्या राजकारणाचा ताळेबंद मांडण्याचा प्रयत्न केला तर जमा बाजूला मोठ्या शून्याशिवाय काहीच दिसणार नाही.
मुख्य प्रवक्ते, भाजप