शरद पवार 
राजकीय

मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न केंद्राने सोडवावा; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे प्रतिपादन

Swapnil S

पुणे : “महाराष्ट्रात मराठा, धनगर आदी समाजाच्या आरक्षणाच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे केंद्राने बघ्याची भूमिका न घेता प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्राला कायद्यात बदल करावा लागेल. असे सांगतानाच दोन्ही समाजाचे आंदोलन एका मर्यादेच्या बाहेर जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यात सामाजिक ताणतणाव निर्माण होऊ नये, याची जबाबदारी सगळ्यांची आहे. आम्ही यात राजकारण आणू इच्छित नाही. पण येथे केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही,” असा सल्लावजा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लगावला.

शरद पवार यांनी बारामती, इंदापूर आदी ठिकाणी दौरा पूर्ण केला. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पवार बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी युगेंद्र पवार त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार

दरम्यान, मराठा व धनगर आरक्षणाबाबतचा निर्माण होणारा सामाजिक तणाव कमी होणे, पुणे जिल्ह्यातील जनाई-शिरसाई योजना, पुरंदर उपसा आणि या योजनांच्या वीजबिलाचा प्रश्न आणि खर्चाच्या तुलनेत दुधाचा दर शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी मी मुख्यमंत्र्यांची पत्राद्वारे वेळ मागितली आहे. याबाबत आज संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी मी आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. विधानसभेत जेथे जेथे आम्ही जागा लढविणार आहोत, त्याठिकाणी जाऊन लोकांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर उमेदवारीबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. पाण्याबरोबर दुधाचा धंदा महत्त्वाचा आहे. असे सांगून पवार म्हणाले, "दुधाची किंमत ही खर्चाच्या तुलनेत असावी. शासनाचे पाच लिटर दुधाला अनुदान मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा काढण्याचा माझा प्रयत्न असणार आहे."

आम्ही महाराष्ट्र जिंकण्यासाठी काळजीने पावले टाकणार

महाराष्ट्रात भाजपचा पराभव आरएसएसने गांभीर्याने घेतला आहे. परंतु, सामान्य जनता महाविकास आघाडीकडे झुकली आहे. यावर पवार म्हणाले, “भाजप आणि मोदी सरकार यांच्या विश्वासाला जनतेमध्ये तडा बसला आहे. मोदी साहेबांची गॅरंटी राहिली नाही. लोकसभेच्या ४८ जागा होत्या, त्यापैकी आमच्या तीन पक्षांनी ३० ते ३१ जागा जिंकल्या. विधानसभेच्या मतदारसंघांचा विचार केला, तर १५५ मतदारसंघांमध्ये आमचा विजय झाला. २८८ जागांच्या विधानसभेत त्यातील १५५ मतदारसंघांत विरोधकांना बहुमत मिळते. याचा अर्थ जनतेचा कल हा महायुतीकडे आहे. त्या दृष्टीने आम्ही महाराष्ट्र जिंकण्यासाठी काळजीने पावले टाकणार आहोत.” छगन भुजबळ आपल्याकडे परतण्याचे संकेत दिसतात का, यावर पवार यांनी नकारार्थी भूमिका मांडली व माझी त्यांची अलीकडच्या काळात भेट झाली नसल्याचे सांगितले.

मोदी हे मोदी आहेत, ते कोणाचे ऐकतील असे वाटत नाही

इंडिया आघाडीचा विरोधी पक्षनेता कोण असणार, असे विचारले असता पवार म्हणाले, "संसदेचे कामकाज २६, २७ जूनला सुरू होत आहे. त्यावेळी बसून विरोधी पक्षनेता निवडीबाबत चर्चा करणार आहे. काँग्रेसच्या लोकसभेत सर्वाधिक जागा आल्याने त्यांना विरोधी नेतेपद मिळेल, त्यांच्या निर्णयाला आमची सहमती असेल.

लोकसभा अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाला जाते, उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला येईल का, या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, "मोदी साहेबांनी मागच्या वेळी हा संकेत पाळला नव्हता. त्यामुळे याबाबत चर्चा होईल, परंतु त्यामधून काही यश येईल असे मला वाटत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत जनेतेने त्यांना जागेवर आणले असले, तरी मोदी हे मोदी आहेत ते कोणाचे ऐकतील असे वाटत नाही."

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?