राजकीय

...त्यांच्या गळ्यात गळे घालायला मी ''देवेंद्र फडणवीस'' नाही, अंजली दमानियांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Swapnil S

छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याची पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी रात्री सोशल मीडियावर टाकली होती. त्यावर बोलताना, “आमच्या पक्षाचे निर्णय आम्हीच घेत असतो, अंजली दमानिया आमचे निर्णय घेत नाहीत. मला वाटतंय अंजली दमानिया अलीकडच्या काळात सुप्रिया सुळेंच्या जास्त संपर्कात आहेत, त्यामुळे त्या असे ट्विट करत असतील पण छगन भुजबळ त्यांच्या पक्षात आहेत, आम्ही आमच्या पक्षात आहोत” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना दिली. त्यानंतर आता अंजली दमानिया यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

ज्यांच्या विरुद्ध लढलो, ज्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या गळ्यात गळे घालायला मी "देवेंद्र फडणवीस" नाही, अशी पोस्ट दमानिया यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकली आहे.

"ज्यांच्या विरुद्ध लढलो, ज्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या गळ्यात गळे घालायला मी “देवेंद्र फडणवीस“ नाही. मी सुप्रिया सुळेंच्या संपर्कात डोरीन फर्नांडिस च्या विषयाच्या वेळी होते, त्यांना मी तीनदा भेटले, पण ते फर्नांडिस कुटुंबाला घेऊन. त्यांनी देखील राजकारण बाजूला ठेऊन मदत केली त्याबद्दल त्यांचा आदर. त्या केस मधे तुम्हाला आणि शिंदेना पण भेटले होते. सगळ्याच राजकारणातल्या लोकांच्या संपर्कात तुम्ही लोक असता. आम्ही फक्त लोकांना होईल तेवढी मदत करतो आणि उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार आणि किळस्वाणी राजकारण पाहवत नाही म्हणून लढतो", असे दमानिया यांनी लिहिले आहे.

आधी काय म्हणाल्या होत्या दमानिया?

'भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप", अशी पोस्ट दमानिया यांनी केली होती.

एकूणच अंजली दमानिया यांनी गुरुवारी रात्री केलेली एक सोशल मीडिया पोस्ट आता चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!