राजकीय

नोट घोटाळ्याची जेपीसी चौकशी करा, काँग्रेसची मागणी

८८ हजार कोटी रुपयांच्या नोटा कोणाच्या खिशात?

नवशक्ती Web Desk

मुंबई : २०१६-१७ या वर्षात सरकारी छापखान्यात ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आल्या. परंतु रिझर्व्ह बँकेकडे मात्र यापैकी ७२५० दशलक्ष नोटाच पोहचल्या. ८८ हजार कोटी रुपये मूल्य असलेल्या १७६ कोटी नोटा रिझर्व्ह बँकेकडे पोचल्याच नाहीत. माहिती अधिकारात नोटा गायब झाल्याची माहिती उघड झाली असून, या नोटा कोणाच्या खिशात गेल्या? याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केली.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी नोट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपचा दावा खोटा असून, मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. या सरकारचा आणखी एक घोटाळा आता उघडकीस आला आहे. नाशिक, देवास आणि बंगलोरच्या सरकारी छापखान्यात नोटा छापल्या जातात. नाशिक व देवास येथील नोटा छापणारे सरकारी छापखाने केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अखत्यारित येतात. सरकारी छापखान्यातून थेट रिझर्व्ह बँकेकडे जातात व नंतर ते चलनात येतात. २०१६-१७ या वर्षात सरकारी छापखान्यात ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आल्या. परंतु रिझर्व्ह बँकेकडे मात्र यापैकी ७२५० दशलक्ष नोटाच पोहचल्या. ८८ हजार कोटी रुपये मूल्य असलेल्या १७६ कोटी नोटा रिझर्व्ह बँकेकडे पोचल्याच नाहीत. ५०० रुपयांच्या या नवीन नोटा कोणी व कशा गायब केल्या? ८८ हजार कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले? याचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, असे पटोले म्हणाले.

जुन्या नोटांमध्येही घोळ

नोटबंदी हा सुद्धा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे राहुल गांधी यांनी उघडकीस आणले होते. नोटबंदी केल्यानंतर ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आल्या होत्या. नोटबंदी केली तेव्हा १६६० कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या, पण त्यापेक्षा २ लाख कोटी रुपयांच्या अधिकच्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा झाल्या होत्या. या जास्तीच्या नोटा कोठून आल्या होत्या? नोटबंदीनंतर किती नव्या नोटा छापण्यात आल्या? रिझर्व्ह बँकेकडे यातील किती नोटा पोहचल्या? या सर्व बाबीची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य