हरीदेव पुष्पराज/मुंबई
पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचा ध्वजवाहक म्हणून माझी नेमणूक करण्यात आल्याचे समजताच मला अश्रू अनावर झाले. २२ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचे हे जणू फलित होते. गेली दोन दशके देशाचे प्रतिनिधित्व केल्यावर आता मी निवृत्त खेळाडू म्हणून आनंद लुटत आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने व्यक्त केली. ४२ वर्षीय शरथने सोमवारी फ्री प्रेस जर्नल समुहाला भेद दिली.
गतवर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उद्घाटन सोहळ्यातील संचलनात ४२ वर्षीय शरथ भारताचा ध्वजवाहक होता. शरथच्या कारकीर्दीतील ही पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा होती. कारकीर्दीतील चढउतार, आगामी आव्हाने, भारतातील बदलते क्रीडा क्षेत्र यांसारख्या विविध मुद्द्यांवर शरथने खास बातचीत केली.
“माझ्या कारकीर्दीतील पाचव्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पदक जिंकवून देण्याचे माझे मुख्य लक्ष्य होते. त्यामध्ये मला अपयश आले. मात्र यामुळे मी खचलो नाही. यापूर्वीच्या ऑलिम्पिकमध्ये अपयश आल्यावरही मी हार मानली नाही. अनेकदा दुखापती तसेच सुमार कामगिरीच्या गर्तेतही मी अडकलो. मात्र माझे प्रशिक्षक, कुटुंब, सहकारी या काळात माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे युवा पिढीनेसुद्धा संयम ढासळू न देता प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. यश कधी ना कधी मिळतेच,” असे शरथ म्हणाला.
२००२ मध्ये भारताकडून खेळणाऱ्यास प्रारंभ करणाऱ्या शरथने २००४, २००८, २०१६, २०२०, २०२४ अशा पाच ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. शरथच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरीत दोन सुवर्णपदके आणि एक कांस्यपदक जमा आहे. तसेच तीन वेळा सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता. आशियाई स्पर्धेतही शरथने सांघिक आणि मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शरथ हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात अनुभवी खेळाडू होता.
“२००२-०३ या काळात टेबल टेनिसला कोणीही फारसे गांभीर्याने घ्यायचे नाही. मात्र कालांतराने स्थिती बदलली. १९९८मध्ये जेव्हा मी टेबल टेनिस खेळाची निवड केली. सुरुवातीला मला राष्ट्रीय संघात स्थान मिळवतानाही संघर्ष करावा लागला. मात्र त्यानंतर प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे मी झेप घेतली,” असेही कमल म्हणाला.
२००६च्या राष्ट्रकुलमध्ये भारताने जिंकलेले टेबल टेनिसमधील सुवर्ण, तसेच २०१८च्या राष्ट्रकुलमधील पदके, आशियाई स्पर्धेतील यश यांसारख्या अनेक स्पर्धा कायम स्मरणात राहतील, असेही शरथने अखेरीस नमूद केले.