संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

यंदा पदकाचा रंग सोनेरी करण्याचे लक्ष्य: सिंधू ; वेध पॅरिस ऑलिम्पिकचे...दिवस उरले फक्त सहा

Swapnil S

नवी दिल्ली : गेल्या दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केल्यावर आता आगामी पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदकाचा रंग सोनेरी करण्याचेच मुख्य लक्ष्य असेल, असे मत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने नोंदवले.

२६ जुलैपासून ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे. आतापर्यंत फक्त अभिनव बिंद्रा (२००८) आणि नीरज चोप्रा (२०२०) यांनाच ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकता आले आहे. २९ वर्षीय सिंधूला या यादीत समाविष्ट होण्याची उत्तम संधी आहे. सिंधू यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या महिला एकेरीत भारताकडून खेळणारी एकमेव खेळाडू असेल. सिंधूला २०२३पासून एकही स्पर्धा जिंकला आलेली नाही. २०२२मध्ये तिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक काबिज केले होते. मात्र नंतर दुखापत, गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यामुळे ती कोर्टपासून दूर राहिली. तरीही तिने क्रमवारीत अव्वल १६ खेळाडूंत स्थान टिकवून ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. २०२४मध्येही तिने फक्त मलेशिया मास्टर्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

“पॅरिसमध्ये ऑलिम्पिक कारकीर्दीतील तिसरे पदक मिळवण्यासाठी मी उत्सुक आहे. यंदा सुवर्णपदकाचेच माझे ध्येय आहे. अन्य स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये खूप फरक आहे. ऑलिम्पिकला वेगळेच महत्त्व आहे आणि या स्पर्धेत मी नेहमीच माझे २०० टक्के देऊन खेळते. २०१६ आणि २०२०च्या स्पर्धेतील प्रवास अविस्मरणीय होता. या दोन्ही स्पर्धांत पदकापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. आता पॅरिस येथे होणारी स्पर्धाही याला अपवाद ठरणार नाही. मी नव्या जोमाने या स्पर्धेत उतरेन आणि काहीही झाले तरी १०० टक्के देऊनच खेळेन,” असे सिंधू म्हणाली.

सिंधूव्यतिरिक्त, पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन, महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रॅस्टो तर पुरुष दुहेरीत सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे खेळाडू बॅडमिंटनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. यंदा बॅडमिंटनमधून भारताला किमान दोन पदके अपेक्षित आहेत.

सीन नदीवरील सुरक्षेत वाढ

ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या दृष्टीने पॅरिसमधील सीन नदीवरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पॅरिस पोलीस आणि फ्रेंच सैन्याने कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी सीन नदीच्या किनारी विशेष परिघ तयार केले आहे. पॅरिसवासीय आणि पर्यटकांसाठी एक किलोमीटर लांबचे क्षेत्र सील करण्यात आले आहे. ज्यांनी ऑलिम्पिकच्या पाससाठी अर्ज केला नाही, अशांना सीन नदीपासून दूर ठेवले जात आहे.

ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच स्टेडियमऐवजी एका नदीवर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. आयफेल टॉवरच्या शेजारून वाहणाऱ्या सीन नदीवर हा उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यासाठी आता या नदीवरील आणि आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीन नदीच्या किनारी जाण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून पासची मागणी केली जात आहे. तसेच सैन्याकडून सीन नदीला गस्त घातले जात आहे. दहशतवादी घटना किंवा अन्य कोणताही विपरीत प्रकार येथे घडू नये असा यामागचा हेतू आहे. ऑलिम्पिक सुरक्षितरीत्या पार पडावे यासाठी ४५ हजार पोलीस आणि १० हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे एकूणच आता पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटनाचे सर्वांना वेध लागले आहेत.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?