अहमदनगर : गतविजेत्या भारतीय रेल्वेसह, उत्तर प्रदेश, चंदीगड, राजस्थान यांनी ‘७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी’ स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. वाडिया पार्क क्रीडा संकुलातील मॅटवर सुरू असलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशने दिल्लीचा प्रतिकार ४७-३० असा मोडून काढला. महाराष्ट्राने विदर्भचा ४८-२४ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
महाराष्ट्राने शनिवारी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत विदर्भला ४८-२४ असे हरवले. उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राची लढत कर्नाटक संघाशी होईल. कप्तान अस्लमने पहिल्याच चढाईत गुण घेत महाराष्ट्राचा इरादा स्पष्ट केला. ८व्या मिनिटाला लोण देत महाराष्ट्राने ११-०३ अशी आघाडी घेतली. पुन्हा दुसरा लोण देत ही आघाडी २६-०६ अशी वाढविली. उत्तरार्धात महाराष्ट्राने ३ अव्वल पकडी करत आपला बचावदेखील भक्कम आहे हे दाखवून दिले. अस्लम इनामदार, आकाश शिंदे, आदित्य शिंदे यांच्या तुफानी चढायांना विदर्भकडे उत्तर नव्हते. शंकर गदई, मयूर कदम यांनी महाराष्ट्राचा बचाव भक्कम राखला. विदर्भ कडून आकाश पिकलमुंडे, अभिषेक निंबाळकर, जावेद खान यांनी बऱ्यापैकी लढत दिली.
चंदीगडने चुरशीच्या लढतीत गोव्याचा प्रतिकार ४४-४० असा संपुष्टात आणला. पवन कुमार हा खेळत असूनही चंदीगडला विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागला. सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना ४०-४० अशी बरोबरी होती. गोव्याने ५ अव्वल पकड करीत सामन्याची रंगत वाढविली. नरेंदर, राकेश यांच्या जोशपूर्ण चढाया, तर विशाल भारद्वाजचा भक्कम बचाव यामुळेच चंदीगड यशस्वी झाले. भारतीय रेल्वेने पंजाबचे आव्हान ४३-२२ असे संपुष्टात आणले. राजस्थानने हिमाचल प्रदेशवर ४४-३७ अशी मात केली.