दुबई : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण वातावरणात भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी आमनेसामने येणार आहेत. आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील 'अ' गटात भारत-पाक लढतीने मैदानातील महायुद्ध प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेला चार महिने शिल्लक असताना भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ भिडणार असल्याने या लढतीला वेगळेच महत्त्व आहे. मोठ्या कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान सामना रविवारी होत आहे. दरवेळी असलेला चाहत्यांमधला उत्साह या सामन्यात मात्र कमी असल्याचे दिसते.
शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा, फिरकीपटू कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांसारखे तगडे खेळाडू भारतीय संघात आहेत. पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय संघ बलाढ्य वाटत आहे. नवा कर्णधार सलमान अली आगाच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये अनपेक्षित गोष्टी घडतात. परंतु सध्याचे दोन्ही संघ पाहिल्यास पाकिस्तानने भारताला पराभूत करण्याची शक्यता फारच कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानच्या ताफ्यातही प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. सलामीवीर सैम अयुब, मधल्या फळीतील फलंदाज हसन नवाज, फिरकीपटू अब्रार अहमद, सुफीयान मुक्कीन आणि मोहम्मद नवाज यांच्यावर संघाची मदार आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत या नव्या खेळाडूंवर संघाला विजयी करण्याची जबाबदारी आहे.
फलंदाजी क्रम ठरवणे भारतासमोरील आव्हान
गिल, अभिषेक, संजू सॅमसन, सूर्यकुमार, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे हे भारताचे तगडे फलंदाज आहेत. त्यामुळे पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय आहे. योग्य फलंदाजी क्रम ठरवणे हे भारतासमोरील आव्हान असेल. फिरकी गोलंदाजांवर हल्ला करण्यासाठी भारतीय फलंदाजांचा क्रम कसा असेल हे महत्त्वाचे ठरणार आहे.
चाहत्यांची पाठ :
जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारील देशांतील संबंध ताणले आहेत. लष्कराची कारवाई आणि जनतेचा रोष यामुळे भारत-पाक लढतीबाबत चाहत्यांमध्ये फारसा उत्साह दिसत नाही. शनिवारपर्यंत हजारो तिकिटांची विक्री झालेली नव्हती. तसेच शुक्रवारी भारतीय संघाचा सराव पाहण्यासाठी फारच कमी प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर भारताकडून बहिष्काराच्या मागण्या झाल्या. त्यामुळे बीसीसीआयचे किती अधिकारी मैदानावर उपस्थित राहतील, याबाबत अनिश्चितता आहे.
फिरकीपटूंमध्ये लढत
भारत-पाकिस्तान सामना म्हटले की वेगवान गोलंदाजांमध्ये लढत पाहायला मिळते. मात्र यावेळी दोन्ही संघांतील फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतील. जसप्रीत बुमरा आणि शाहीन शाह आफ्रिदी हे प्रमुख वेगवान गोलंदाज असतील.
आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १९ वेळा लढत झाली आहे. त्यातील १० सामन्यांत भारताने बाजी मारली आहे. पाकिस्तानने ६ सामने जिंकले आहेत. ३ सामने अनिर्णित राहिले आहेत.
'क्रिकेटवर लक्ष केंद्रित करा'
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार टाकण्याची मागणी चाहत्यांसह राजकीय नेत्यांमार्फत केली जात आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करा, असा संदेश दिला आहे. त्याचा पुनरुच्चार क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनीही केला आहे. ते म्हणाले की, आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची भावना अत्यंत संवेदनशील आहे. मात्र, संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि भारत सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी सामने न खेळण्याची मागणी देशभरात जोर धरू लागली आहे. त्यावर डोशेट म्हणाले की, खेळाडूंनाही जनतेच्या भावना समजतात. आम्ही संघाच्या बैठकीत चर्चा केली आहे. खेळाडू इथे फक्त क्रिकेट खेळण्यासाठी आले आहेत. आम्ही सरकारच्या निर्देशांचे पालन करत आहोत, असे टेन डोशेट म्हणाले. आमचं म्हणणं आहे की, खेळ आणि राजकारण वेगळे ठेवा. आम्हाला भावना समजतात, पण आम्ही बीसीसीआय आणि सरकारच्या आदेशांप्रमाणेच काम करत आहोत. आम्ही केवळ त्यांच्या सूचनांनुसार चालतो, असे डोशेट म्हणाले.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जितेश शर्मा, हर्षित राणा, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंह, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान : सलमान आगा (कर्णधार), अब्रार अहमद, फहीम अशरफ, फखर झमान, हॅरिस रौफ, हसन अली, हसन नवाझ, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासिम, साहिबझादा फरहान, सय्यम अयुब, शाहीन आफ्रिदी.