दुबई : एखादा संघ जिंकला आणि त्याला विजेतेपदाची ट्रॉफीच मिळालेली नाही, असे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला पाच विकेट्सनी धूळ चारल्यानंतर भारतीय संघ नवव्यांदा आशियाई विजेता ठरला. मात्र बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. भारतीय संघाप्रमाणेच नक्वीसुद्धा आपल्या भूमिकेवर अडून राहिले. त्यामुळे चॅम्पियन्स संघाला विजेतेपदाची ट्रॉफी न देता नक्वी ती ट्रॉफी घेऊन निघून गेले. त्यामुळे दीड तासांपेक्षा जास्त वेळ घडलेल्या या राड्यानंतर विजेत्या संघाला आशिया चषकाची ट्रॉफी आणि खेळाडूंची पदके मिळणार की नाहीत, तसेच आयसीसी या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाकिस्तानचे १४७ धावांचे आव्हान पार करताना भारताला शेवटच्या षटकांत १० धावांची आवश्यकता असताना तिलक वर्माने हॅरिस रौफला षटकार आणि चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. मात्र भारताच्या या विजयापेक्षा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानच्या मोहसीन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाचा करंडक स्वीकारण्याची घेतलेली भूमिका सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. पहलगाम हल्ल्यावरून दोन्ही देशांमधील संबंध विकोपाला गेले असतानाच, पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यापासूनच हस्तांदोलन न करण्यापासून ते अनेक गोष्टींमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये खटके उडत होते. त्यातच आशिया चषकाच्या बक्षीस वितरणाला सुरुवात होण्याआधीच वादाला सुरुवात झाली. विजेतेपदाचा करंडक पाकिस्तानचे मंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष नक्वी यांच्या हस्ते देण्यात येणार असल्यामुळे भारतीय खेळाडूंनी तो चषक त्यांच्याकडून स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली.
बक्षीस वितरणाला सुरुवात झाल्यानंतर सामन्याचा मानकरी ठरलेला तिलक वर्मा आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू अभिषेक वर्मा यांनी आपापले पुरस्कार स्वीकारले. हे पुरस्कार मोहसीन नक्वी यांच्याऐवजी दुसऱ्या पदाधिकाऱ्याने भारतीय खेळाडूंना सुपूर्द केले. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने उपविजेतेपदाचा चेक स्वीकारताच तो फेकून दिल्याने नवा वादंग निर्माण झाला.
आता विजेतेपदाचा चषक भारतीय संघाला देण्यात येण्याची वेळ आली होती. मात्र हा करंडक नक्वी यांच्या स्वत:च्या हस्तेच द्यायचा असल्याने तेही आपल्या भूमिकेवर ठाम होते. भारतीय खेळाडूंनी तो चषक स्वीकारण्यास नकार दिला. तब्बल १ ते दीड तास हा राडा रंगला. भारतीय खेळाडूंनी मात्र अखेरपर्यंत ही ट्रॉफी स्वीकारलीच नाही. क्रिकेटच्या मैदानावर पहिल्यांदाच विजेत्या संघाने चषक स्वीकारला नाही, अशी नोंद झाली. भारताचे खेळाडू वितरण सोहळ्यादरम्यान मैदानावर झोपून मोबाईलमध्ये रंगले होते. अखेर नक्वी ही ट्रॉफी घेऊन निघून गेल्याने भारतीय संघानेही ट्रॉफीविनाच सेलिब्रेशन केले.
सूर्यकुमारचा पहलगाम पीडितांना मदतीचा हात
आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्यावर भारतीय संघावर प्रचंड टीका सहन करावी लागली. मात्र यंदा तीन वेळा पाकिस्तानला धूळ चारत भारताने आशिया चषकावर कब्जा केला. मात्र तरीही देशवासीयांच्या भावनांना धक्का न पोहोचवता, कर्णधार सूर्यकुमारने या स्पर्धेतून मिळालेले २८ लाख रुपयांचे मानधन हे पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच भारतीय सशस्त्र दलांसाठी दिले आहेत.
बीसीसीआयकडून टीम इंडियाला २१ कोटींचे इनाम
आशियाई चषकावर नवव्यांदा नाव कोरल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ तसेच सपोर्ट स्टाफला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून २१ कोटी रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. “पाकिस्तानवर मिळवलेला विजय हा अभूतपूर्व असाच होता. याच जल्लोषाचा भाग म्हणून खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला २१ कोटी कुपयांचे बक्षीस जाहीर करत आहोत,” असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले. मात्र खेळाडूंना किती रक्कम मिळणार, याचे स्पष्टीकरण मात्र बीसीसीआयकडून देण्यात आले नाही.
बीसीसीआय आयसीसीकडे तक्रार करणार
भारतीय संघाच्या भूमिकेनंतर मोहसीन नक्वी यांनी इतर कोण्याच्या हस्ते ट्रॉफी देण्याचा पर्याय निवडला असता तर वाद झाला नसता. मात्र त्यांनी नियमांना डावलत थेट ट्रॉफी आणि मेडल्स स्वत: नेले. बीसीसीआय आता याविरोधात आयसीसीकडे तक्रार करणार आहे. नोव्हेंबर महिन्यात दुबईत आयसीसीची बैठक होणार आहे. या बैठकीत बीसीसीआय हा मुद्दा उपस्थित करू शकते.
पाकिस्तानी कर्णधाराने उपविजेतेपदाचा चेक फेकला
बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने स्वीकारलेला उपविजेतेपदाचा प्रतीकात्मक चेक फेकून दिल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सलमान आघाच्या या कृतीनंतर प्रेक्षकांकडून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे.
बक्षीस वितरणादरम्यान मोठा राडा झाल्यानंतर, सलमान अली आघाने ७५ हजार डॉलरचा प्रतीकात्मक चेक बक्षीस म्हणून स्वीकारला आणि फोटो काढण्यासाठी पोझ दिली. नंतर मागे वळून तो खाली ठेवण्याऐवजी त्याने तो चेक हवेत फेकला आणि हसत हसत निघून गेला.