दुबई : शफाली वर्मा (३९ चेंडूंत ५९ धावा) आणि उपकर्णधार स्मृती मानधना (३९ चेंडूंत ६८ धावा) यांच्या आक्रमक अर्धशतकांनंतर फिरकीपटू श्री चरणीने (२० धावांत ४ बळी) केलेल्या चमकदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने रविवारी श्रीलंकेचा ७२ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय महिला संघाने विक्रमी आठव्यांदा आशिया चषक टी-२० स्पर्धेचे जेतेपद काबिज केले. मात्र भारताच्या विजेत्यापेक्षा त्यांनी केलेल्या कृतीचे देशभरातून कौतुक होत आहे.
भारतीय पुरुष संघाचा कित्ता गिरवतानाच महिला संघानेही आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्याकडून आशिया चषक स्वीकारण्यास नकार दर्शवला. भारतीय महिला संघाने दिलेला नकार हा देशातील परिस्थिती आणि भावना लक्षात घेऊन बीसीसीआयने घेतलेला संस्थात्मक निर्णय होता, असे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवाजित सैकिया यांनी सोमवारी दिले. २०२५मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात आशिया चषक जिंकल्यावर भारतीय पुरुष संघानेही नक्वी यांच्याकडून चषक न स्वीकारताच आभासी स्वरूपाचे सेलिब्रेशन केले होते.
रविवारी दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा ७२ धावांनी पराभव करत आठव्यांदा विजेतेपद पटकावले. मात्र, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारण्याची भूमिका कायम ठेवली. बीसीसीआयने सर्व परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतला होता आणि याबाबतची कल्पना एसीसीला आधीच देण्यात आली होती, असे सैकिया यांनी सांगितले.
“देशातील सद्यस्थिती आणि जनतेच्या भावना पाहता अशा प्रकारे ट्रॉफी स्वीकारणे योग्य ठरणार नाही, असे मंडळाला वाटले. हा निर्णय कोणत्याही खेळाडूविरुद्ध किंवा खेळाविरुद्ध नसून मंडळाची ठाम भूमिका दर्शवणारा होता,” असेही सैकिया यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लष्करी संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले असून बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडू हस्तांदोलन न करण्याचे धोरण पाळतात.
बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणे आणि ट्रॉफी स्वीकारणे या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे सांगत सैकिया म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वचनबद्धतेचे पालन करत भारतीय संघ या स्पर्धेत खेळला. भारतीय महिला संघाने मैदानावर चमकदार कामगिरी करत आशिया चषक जिंकला असून देशाला या कामगिरीचा अभिमान आहे.” अंतिम सामन्यानंतर श्रीलंका संघाने उपविजेतेपदाचा धनादेश नक्वी यांच्याकडून स्वीकारला. भारतीय संघाचे लक्ष आता जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा बचाव करण्यावर केंद्रित असल्याचे सैकिया यांनी नमूद केले.
एकूणच भारतीय महिला संघाने केलेल्या या कृत्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. आता यावर नक्वी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणेही रंजक ठरेल.
अंतिम सामन्यात काय घडले?
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर शफालीने ६८ आणि स्मृतीने ५९ धावा करत अवघ्या १२.५ षटकांत १२९ धावांची भागीदारी रचली. शफालीने २४ चेंडूंत केलेले अर्धशतक हे महिला आशिया चषकातील सर्वात जलद ठरले. तिने स्मृतीचा २०२२ मधील २५ चेंडूंतील अर्धशतकाचा विक्रम मोडीत काढला.
या भागीदारीनंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत मधल्या फळीला रोखले. भारताने २० षटकांत ५ बाद १८३ धावांपर्यंत मजल मारली. अंतिम षटकांत गुणालन कामलिनीने ५ चेंडूंत १५ धावांची उपयुक्त खेळी केली.
१८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २० षटकांत १११ धावांत गारद झाला. श्रीलंकेची कर्णधार चामरी अटापटू (३६) आणि विश्मी गुणरत्ने यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावा जोडल्या.
मात्र, १०व्या षटकात अनुभवी ऑफ-स्पिनर दीप्ती शर्माने या दोन्ही फलंदाजांना बाद करत श्रीलंकेच्या आशांवर पाणी फेरले. त्यानंतर डावखुरी फिरकीपटू श्री चरणीने २० धावांत ४ बळी घेत श्रीलंकेची दाणादाण उडवली. भारतीय संघाने क्षेत्ररक्षणात ५ झेल सोडले होते.