नागोया : भारताच्या वाढत्या क्रीडा क्षमतेची खरी परीक्षा शनिवारी सुरू होणाऱ्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत होणार आहे. पुढील एका दशकात जागतिक स्तरावर पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळवण्याच्या मोठ्या ध्येयाने भारतीय खेळाडू या स्पर्धेत उतरत आहेत. ४५ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत तब्बल ४३ खेळांचा समावेश असून ११ हजार खेळाडू आमनेसामने येणार आहेत. भारताचे ४९६ खेळाडूंचे भव्य पथक या स्पर्धेत आपले आव्हान सादर करणार आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय खेळाडूंना निवासाच्या नियोजनातील गोंधळाचा सामना करावा लागला. दीर्घ प्रवासानंतर नागोया शहरात पोहोचलेल्या खेळाडूंना राहण्यासाठी खोल्या मिळण्यासाठी कित्येक तास ताटकळावे लागले. खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या खोल्या अपुऱ्या आणि सोयी-सुविधांचा अभाव असलेल्या असल्याचे समोर आले आहे. खर्चात कपात करण्यासाठी पारंपारिक क्रीडा ग्राम उभारण्याऐवजी कंटेनरच्या धर्तीवर घरे, क्रूझ जहाजे आणि हॉटेल्समध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
२०२२च्या हांगझो येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १०६ पदकांची ऐतिहासिक कमाई केली होती. यामध्ये २८ सुवर्ण, ३८ रौप्य व ४० कांस्यपदकांचा समावेश होता. भारताने त्यावेळी पदकतालिकेत चौथा क्रमांक पटकावला होता. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत अपेक्षांचे प्रमाण वाढले आहे. भारताने २०३६ पर्यंत जगातील अव्वल १० क्रीडा राष्ट्रांमध्ये आणि २०४७ पर्यंत अव्वल ५ मध्ये स्थान मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे.
नेमबाजीत मनूवर मदार
भारताच्या या मोहिमेचे नेतृत्व ॲथलेटिक्स आणि नेमबाजी पथक करेल. दोन ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकर हिच्या नेतृत्वाखाली ३० सदस्यांचे नेमबाजी पथक मैदानात उतरेल.
ॲथलेटिक्सकडून अपेक्षा
दोन वेळेचा आशियाई विजेता नीरज चोप्रा दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होऊ शकलेला नाही. असे असले तरी ७४ सदस्यांच्या ॲथलेटिक्स पथकात तेजिंदरपाल सिंग तूर, मुरली श्रीशंकर, गुलवीर सिंग, रोहित यादव आणि तेजस्विन शंकर या खेळाडूंकडून पदकांच्या अपेक्षा आहेत. हांगझो येथे भारताने ॲथलेटिक्समध्ये ६ सुवर्णांसह २९ पदके जिंकली होती.
क्रिकेटमध्ये दुहेरी सुवर्ण?
क्रिकेटमध्ये भारताचे महिला संघ आणि पुरुष संघ सुवर्णपदकाचे दावेदार आहेत. हरमनप्रीत कौर आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी या स्पर्धेला २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकची पूर्वतयारी मानले आहे.
बॅडमिंटनमध्ये कसोटी
सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदकासाठी शर्यतीत असेल, तर पी. व्ही. सिंधू आणि नवोदित उन्नती हुड्डा यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
हॉकीत आव्हान
हॉकीमध्ये हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील पुरुष संघ आपले विजेतेपद कायम राखत लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचे थेट तिकीट निश्चित करण्याचा प्रयत्न करेल, तर महिला संघ गेल्या वेळी मिळालेले रौप्यपदक सुवर्णात बदलण्यासाठी उत्सुक आहे. याशिवाय तिरंदाजी, बॉक्सिंग आणि कबड्डीमध्येही भारतीय खेळाडू पदकांची लूट करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
उद्घाटन सोहळा : दुपारी २.३० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : सोनी टेन वाहिनी आणि सोनी लाईव्ह ॲप