क्रीडा

फलंदाजांकडे लक्ष, आघाडीचे लक्ष्य! भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी आजपासून; लढतीवर पावसाचे दाट सावट

‘टुटा है गाबा का घमंड, जीत गयी है मुकाबला भारत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जाएगी गावस्कर के देश...’ जानेवारी २०२१मध्ये गॅबा म्हणजेच ब्रिस्बेन येथे भारताने निर्णायक चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर समालोचक विवेक राजदान यांच्या मुखातून निघालेले हे शब्द आजही तमाम क्रिकेटप्रेमींना स्मरणात आहेत.

Swapnil S

ब्रिस्नेन : ‘टुटा है गाबा का घमंड, जीत गयी है मुकाबला भारत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जाएगी गावस्कर के देश...’ जानेवारी २०२१मध्ये गॅबा म्हणजेच ब्रिस्बेन येथे भारताने निर्णायक चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर समालोचक विवेक राजदान यांच्या मुखातून निघालेले हे शब्द आजही तमाम क्रिकेटप्रेमींना स्मरणात आहेत. आता जवळपास ४ वर्षांनी पुन्हा एकदा याच ब्रिस्बेनवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील जुगलबंदीचा नव्या अध्याय लिहिला जाईल.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ शनिवारपासून तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी गॅबाच्या मैदानात उतरेल. त्यावेळी सर्व देशवासीयांचे भारताच्या फलंदाजांकडे लक्ष लागून असेल. गेल्या काही सामन्यांपासून भारताच्या फलंदाजांचा कसोटीत धावांसाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे या सामन्यात रोहितसह विराट कोहली या अनुभवी खेळाडूंवर चाहत्यांच्या नजरा असतील. त्याशिवाय या सामन्यात विजय मिळवून ५ लढतींच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याचे भारताचे लक्ष्य असेल.

बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी उभय संघांत खेळवण्यात येणाऱ्या या मालिकेतील पहिल्या लढतीत भारताने जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला २९५ धावांनी धूळ चारली. मग दुसऱ्या सामन्यात रोहितच्या पुनरागमनानंतरही गुलाबी चेंडूपुढे भारताची तारांबळ उडाली. ट्रेव्हिस हेडचे शतक व मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर कांगारूंनी भारताला १० गडी राखून नामोहरम केले. त्यामुळे तूर्तास ही मालिका १-१ अशा बरोबरीवर आहे. जूनमध्ये रंगणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याकरिता दोन्ही संघांना ही मालिका जिंकणे अनिवार्य आहे. अशा स्थितीत नेमका कोणता संघ बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.

या लढतीसाठी खेळपट्टी नेहमीप्रमाणे वेगवान गोलंदाजांना पोषक असेल. मात्र ब्रिस्बेनमध्ये डिसेंबरमध्ये पावसाळी वातावरण असते. या कसोटीच्या चार दिवसांवर पावसाचे सावट असू शकते. त्यातील पहिल्या दिवशी ५३ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल लागण्यासाठी वरुणराजाची कृपा आवश्यक आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे ५.५० वाजता ही लढत सुरू होणार असल्याने चाहत्यांनाही ऐन थंडीत लवकर उठण्याची मेहनत करावी लागणार आहे.

रोहित पुन्हा सलामीला, राहुल मधल्या फळीत?

३७ वर्षीय रोहितने यंदाच्या हंगामातील ७ सामन्यांत फक्त एका अर्धशतकासह १५१ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी अवघी ११.८३ इतकी आहे. स्विंग होणाऱ्या चेंडूसमोर रोहितचे सातत्याने त्रिफळाचीत होताना दिसतो. सलामीला उतरून आक्रमक सुरुवात करणेच त्याच्यासाठी सोयीचे ठरू शकते. त्यामुळे गेल्या कसोटीत मधल्या फळीत फलंदाजी करणारा रोहित पुन्हा सलामीला परतू शकतो. अशा स्थितीत के. एल. राहुल सहाव्या स्थानी फलंदाजी करेल. विराटलाही पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातील शतक सोडले, तर गेल्या २-३ महिन्यांत संघर्षच करावा लागला आहे. गेल्या ५ वर्षांत विराटने कसोटीत तीनच शतके झळकावली आहेत. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल या युवांना खेळ उंचवावा लागणार आहे. नितीश रेड्डीने आतापर्यंत लक्षवेधी कामगिरी केली आहे.

बुमरावर दडपण; आकाश, सुंदरचे पुनरागमन?

गोलंदाजी विभागाचा विचार करता प्रामुख्याने बुमरावरच भारताची भिस्त आहे. २ कसोटींमध्ये बुमराने १२ बळी मिळवले आहेत. त्याला मोहम्मद सिराजची प्रभावी साथ लाभलेली नाही. तसेच तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हर्षित राणाच्या जागी आकाश दीप संघात येईल, असे शुक्रवारी झालेल्या सरावावरून समजते. प्रसिध कृष्णाचा पर्यायही भारताकडे उपलब्ध आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने गोलंदाजी तसेच फलंदाजीत अपेक्षित योगदान देऊ न शकल्याने वॉशिंग्टन सुंदरचे पुनरागमन पक्के मानले जात आहे. रवींद्र जडेजाला मात्र आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

हेझलवूड परतला, बोलंडला डच्चू

अनुभवी मध्यमगती गोलंदाज जोश हेझलवूड या कसोटीसाठी तंदुरुस्त असल्याने त्याचे स्कॉट बोलंडच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन झाले आहे. बोलंडने दुसऱ्या कसोटीत ५ बळी घेतले होते. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने अंतिम ११ खेळाडूंत अन्य बदल केलेला नाही. फलंदाजीत हेड धोकादायक लयीत असून मार्नस लबूशेनलाही सूर गवसला आहे. स्टीव्ह स्मिथ व उस्मान ख्वाजा या अनुभवी फलंदाजांची कामगिरी कांगारूंसाठी चिंतेचा विषय आहे. स्टार्क, कर्णधार पॅट कमिन्स व हेझलवूड यांचे त्रिकुट पुन्हा भारतीय फलंदाजांना नाचवण्यासाठी आतुर आहे. फिरकीपटू नॅथन लायनला दुसऱ्या कसोटीत फक्त १ षटक गोलंदाजी करावी लागली. मात्र गॅबामध्ये तो ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक ठरेल.

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या १०९ कसोटी सामन्यांपैकी भारताने ३३, तर ऑस्ट्रेलियाने ४६ लढती जिंकल्या आहेत. २९ कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत, तर एक सामना टाय झाला होता.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, नितीश रेड्डी, मोहम्मद सिराज, आकाश दीप, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिध कृष्णा, जसप्रीत बुमरा, अभिमन्यू ईश्वरन, सर्फराझ खान.

ऑस्ट्रेलिया (अंतिम ११) : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ॲलेक्स कॅरी, मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड.

वेळ : पहाटे ५.५० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, डीडी स्पोर्ट्स आणि हॉटस्टार ॲप

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक